ताज्या घडामोडी

विदर्भातील निसर्गरम्य प्रदेशातील अष्टविनायक दर्शन

विदर्भातील निसर्गरम्य प्रदेशातील अष्टविनायक दर्शन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State , India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 22/9/2023 :
अष्टविनायक म्हटले की, मोरगांव, लेण्याद्री, पाली ही पवित्र महाराष्ट्रातील ठिकाणं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. त्यांची दोन दिवसात केलेली यात्रा, मग त्याला शास्त्रोक्त यात्रा असे जोडले गेलेले संदर्भ हे आपल्या परिचयाचे असतात. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्ग संपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ होय. मोठी प्राचीन परंपरा लाभलेला हा प्रदेश वाकाटक, कलचूरी अशा बलाढ्य राजसत्ता या प्रदेशी नांदल्या. त्यांच्या समृद्धीचे अवशेष आजही उत्खननातून बाहेर येतात. विदर्भ या सर्वगुण संपन्न अशा प्रदेशात देखील मोठ्या प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. गणपतीच्या २१ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी बरीच ठिकाणे विदर्भात आहेत. त्याचबरोबर विदर्भातले अष्टविनायक सुद्धा खास बघण्याजोगे आहेत. त्याच्याशी सुद्धा विविध कथा, दत्तकथा जोडल्या गेलेल्या आहेत. काही खास वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तिथे पाहायला मिळतात. मुद्दाम वेळ काढून या गणपतीचे, त्या रम्य परिसराचे दर्शन घ्यावे, असे वाटते. शक्यतो नागपूरच्या टेकडी गणपतीपासून या अष्टविनायकांच्या दर्शनाला सुरुवात करतात. नागपूर मध्यवर्ती ठेवून या सर्व ठिकाणी आपल्या सोयीनूसार यात्रा करावी. विदर्भाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे.


१) टेकडी गणपती, नागपूर
टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन गणपती मंदिर आहे. हे नागपूरातील लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे १८ व्या शतकात हे मंदिर बांधले असल्याचे समजते.
२) शमी विघ्नेश, आदासा(जि. नागपूर)
विदर्भातील अष्टविनायकापैकी हे स्थान प्रथम क्रमांकावर आहे. येथे टेकडी वरील गणेश मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीला “शमी विघ्नेश” म्हणतात. ती महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेश मूर्ती आहे. ही जवळपास ६ मीटर उंच आहे. या मंदिराचं बांधकाम हेमांडपंती वाटते. येथील शंकराच्या मंदिरात असलेली पिंड दक्षिणाभिमुख आहे. इतर पिंडी उत्तराभिमुख असतात. गणेश पुराणात वर्णन केलेल्या मूर्तीपैकी ही एक आहे. येथील गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. मंदिर टेकडीवर वसलेले असल्याने तेथून आजूबाजूचा परिसर नयनरम्य दिसतो. मंदिरात गणेशाची देखणी अशी भव्य स्वयंभू गणेश मूर्ती आहे.
३) अष्टदशभुज, रामटेक (जि. नागपूर)
विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात तेलीपुरा भागात असलेले एक मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ किमी. अंतरावर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला अठरा हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात अंकुश, पाश, त्रिशुळ इत्यादी आयुधे आहेत. ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली आहे.
४) भृशुंड, मेंढा (जि. भंडारा)
विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेले एक मंदिर. हे गाव भंडारा पासून सुमारे ३ किमी. अंतरावर आहे. तेथे घुमटीत गणेश प्रतिमा आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून लाल रंगाच्या दगडात कोरलेली ही मूषकारुढ प्रतिमा आहे. हातात पाश, अंकुश ही आयुधे व मोदक आहे. नेसलेले वस्त्र, जानवे, कंबरपट्टा दिसतो.
५) सर्वतोभद्र, पवनी (जि. भंडारा)
विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील एक स्तंभ आहे. याला गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणाऱ्या श्री भट्ट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० सेंटीमिटर उंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. तर कर्णछेद रेषेवर प्रतिमा आहे. असा वैशिष्ट्यपूर्ण गणपती विदर्भातील अष्टविनायकापैकी एक समजल्या जातो. पवनी हे पुरातन शहर आहे. शहराच्या उत्तर दिशेला दगडी तटबंदी आहे.
६) सिद्धी विनायक, केळझर (जि. वर्धा)
विदर्भात अष्टविनायकापैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धी विनायकासाठी प्रसिद्ध आहे. येथील गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती ४ फूट उंचीची आहे. केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे असे म्हणतात. या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा गणेश असे म्हणतात.
७) चिंतामणी, कळंब (जि. यवतमाळ)
विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ किमी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपातळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसतो. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.
८) वरदविनायक, भद्रावती (जि. चंद्रपूर)
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर आहे. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ किमी. अंतरावर आहे. येथे टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली ही मूर्ती विहीरी सारख्या खोल गाभाऱ्यात आहे. हे मंदिर हेमांडपंती पध्दतीचे आहे. मंदिराचे बांधकाम १२ व्या शतकातले आहे पण मूर्ती त्याहून प्राचीन आहे.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button