ताज्या घडामोडी

‘रायगडची रणरागिणी’ मिनाक्षीताई पाटील नाबाद ७५

‘रायगडची रणरागिणी’
मिनाक्षीताई पाटील नाबाद ७५

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 12/9/2023 :
रायगडची रणरागिणी १३ सप्टेंबरला अमृत महोत्सव साजरा करीत आहे. मिनाक्षीताई पाटील हे त्यांचे नाव. तीन वेळा आमदार, राज्यमंत्री, त्याहीपेक्षा त्या काळातील महिलांचे लढे, पाण्यासाठीचे लढे, रेवस बंदराचा लढा, जे. एन.पी.टी. चा लढा, सेझ विरोधातला लढा, रांजणखारच्या बंधाऱ्याचा निर्णय आणि पत्रकारांचा लढा… अशा अनेक लढ्यांत ज्या मिनाक्षीताई म्हणजे खरंतर…. आमची बेबी… ग्रामीण भागात लढत राहिली. मुंबईमध्ये महिलांचे लढे लढवणाऱ्या अहिल्याताई रांगणेकर किंवा मृणालताई गोरे यांच्या इतक्याच तडफेने, पोयनाडच्या नारायण नागू पाटील यांची नात. त्या घराण्याचे नाव दिगंत करून आजही जिद्दीने एका आजाराशी झुंजत आहे.
नारायण नागू पाटील यांच्या घरात १९५८ पासून मी वावरतोय… तेव्हा बेबी १० वर्षांची होती. पूर्वीचा कुलाबा जिल्हा आणि आताचा रायगड जिल्हा या जिल्ह्यात सर्वाधिक चार पिढ्यांनी गेली ८० वर्षे सामान्य माणसांचे प्रश्न कायमचे रस्त्यावर लढवले. असे आमच्या जिल्ह्यातील हे एकच पाटील घराणे आहे. नारायण नागू पाटील हे या घराण्यातील पहिले लढावू पुरूष. ते मुंबई राज्यात आमदार होते. शेतकऱ्यांचे नेते होते. पत्रकार होते. ‘कोकण कृषीवल’ हे साप्ताहिक त्यांनीच सुरू केले. मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना त्यांनी हे साप्ताहिक बंद करण्याचा प्रयत्न केला. नारायण नागू पाटील यांना त्या काळात ६ हजार रुपयांचा दंड केला. कारण आक्रमक भूमिका घेवून खोतीविरोधात, सावकारी विरोधात, बहुजन समाजाचा नेता म्हणून नारायण नागू यांनी कधीही तडजोड केली नाही. प्रखर पत्रकारिता हा त्यांचा सगळ्यात मोठा गूण. ‘मुंबई सरकारला माणुसकी आहे का?’ असे त्यांच्या एका अग्रलेखाचे शिर्षक होते. खारेपाटातील गरिब शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, या प्रश्नासाठी हा लढा होता…. १७ मार्च १९४१ च्या ‘कृषीवल’च्या अग्रलेखाचे शिर्षक होते… ‘शेतकऱ्यांची फसवणूक’ खारेपाटातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रमाणेच कुलाबा जिल्ह्यातील ठाकूर, वारली, कातकरी या सर्वांना संघटीत करून ८० वर्षांपूर्वी नारायण नागू म्हणजे आप्पांनी पेण येथे यांची पहिली सभा बोलावली. आप्पा शिक्षक होते. शिक्षकांचे पहिले संमेलन १९५१ साली मुरूड येथे त्यांनी बोलावले. चरीचे शेतकरी आंदोलन, धेरंडचे शेतकरी आंदोलन, जंगल सत्याग्रह हे त्यांचे प्रमुख लढे. लोकल बोर्डात निवडून आल्यावर आज ज्याला उड्डाणपूल म्हणतात तशाच पद्धतीचे पण लाकडी शेकडो साकव आप्पांनी बांधलेले आहेत. शहापूर आणि धाकटे शहापूर येथील मोठा पूल त्याकाळात आप्पांनीच बांधला. शहाबाजचा पूलही आप्पांच्या काळातीलच. हे घराणे अभिजनांसाठी नव्हते, बहुजनांसाठी आहे… त्यामुळेच आप्पांनी लोकल बोर्डामध्ये नोकर भरती करताना उच्चवर्गीयांच्या टक्केवारीप्रमाणेच बहुजन समाजातील गुणवत्ता असलेल्यांना भरती केलेच पाहिजे, हा आग्रह धरला. त्यात मागासवर्गीय, त्यावेळचे समजले जाणारे अस्पृश्य आणि मुसि्लम उमेदवारांनाही त्यांनी प्राधान्य दिले. हे सगळे सांगण्याचा उद्देश असा की, ‘नारायण नागू ते मिनाक्षी पाटील’ हा चार पिढ्यांचा इतिहास बहुजनांच्या लढ्याचा इतिहास आहे. आणि आजही रायगडमध्ये हे पाटील घराणे बहुजनांच्यासाठी लढत आहे.
आप्पांच्या नंतर दत्ता पाटील पाचवेळा आमदार. १९८९ ला विरोधी पक्षनेते. सीमा प्रश्नासाठी जत्ती सरकारच्या तुरुंगात दहा महिने सक्त मजुरी. याखेरिज शेतकऱ्यांचे असंख्य लढे आणि त्यात तुरुंगवास… तीच गोष्ट त्यांचे धाकटे बंधू प्रभाकर पाटील यांची. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. पण पदावर असतानाही सामान्य माणसावरचा अन्याय सहन न होणे त्या विरोधात आक्रमक होणारे प्रभाकर पाटील अनेकवेळा त्यांनी शिक्षा भोगली. तडजोड त्यांना कधी माहिती नव्हती. त्यांचीच मुलगी मिनाक्षीताई. म्हणजे आमची बेबी…. तिचा 13/9/2023 ला ७५ वा वाढदिवस आहे. त्यामुळे गेल्या ७५ वर्षांतील या घराण्याचा सगळा लढा असा डोळ्यांसमोरून गेला. बेबी आज असाध्य अशा आजाराशी झुंजत आहे. पण ती हिम्मत हरलेली नाही. तिला फोन केला… ‘१३ तारखेला भेटायला येतो…’ ती पटकन म्हणून गेली, ‘मधुकाका, तुम्ही आता दादांच्या (वडील प्रभाकर पाटील )जागेवरच आहात.’
नारायण नागूंच्या घराण्याचा वारसा आमदार असताना किंवा नसताना या मिनाक्षीताईंनी तितक्याच ताकतीने लढवला. मुंबई, पुण्यात लढणाऱ्या स्त्रियांना प्रचंड प्रसिद्धी मिळते. त्या काळात प्रसिद्धी माध्यमे ग्रामीण भागाकडे आपल्या लेखण्या वळवत नसत. पण पत्रकार आजोबा आणि पत्रकार वडील यांचा वारसा, बेबीने असा काही आक्रमकपणे चालवला…. त्यावेळच्या बिहारधील जगन्नाथ मिश्रा सरकारने पत्रकार विरोधातील एक अत्यंत कठोर कायदा आणला. उभ्या महाराष्ट्रात या कायद्याविरोधात रायगड जिल्ह्यात पत्रकारांनी सर्वात मोठे आंदोलन केले. मिनाक्षी पाटील या लढ्यात उतरल्या. म्हसळ्याचा त्यांचा लढा गाजलेला आहे. त्यांना त्यात सहा महिने शिक्षा झाली. औरंगाबदच्या हरसूल जेलमध्ये टाकण्यात आले. त्यांची आणि त्यांच्या बराेरच्या सहकाऱ्यांची सुटका झाली. तेव्हा तुरुंगातील सर्व पत्रकारांचे स्वागत करायला लोकमतचे त्यावेळचे संस्थापक, संपादक जवाहरलाल दर्डा, राजेंद्र दर्डा तुरुंगाच्या दरवाजावर स्वागताला उभे होते. बाबूजी मिनाक्षीताईंना म्हणाले, ‘तू झाशीची राणी आहेस…’
मिनाक्षी पाटील यांनी दिलेल्या लढ्यांची यादी खूप मोठी आहे. जेव्हा दारूबंदी विरोधात गावातील ५० टक्के महिलांनी दारूच्या दुकांनाना विरोध केला तर ते दुकान बंद करण्याचा कायदा आला. त्या कायद्याचा आधार घेवून रायगड जिल्ह्यात सगळ्यात मोठी चळवळ आणि महिला संघटन मिनाक्षी पाटील यांनी केले. अशाच एका आंदोलनात माजी आमदार श्याम सावंत यांच्या मालकीचे असलेले दारूचे दुकान बंद करण्याच्या विरोधात महिलांनी ठराव केला. दुकान काही बंद होईना. मिनाक्षीताईंनी तो लढा अंगावर घेतला. आणि त्यावेळच्या कलेक्टरना विधानमंडळात त्यांनी खेचले. त्यावेळचे त्या खात्याचे मंत्री प्रकाश मेहता यांनी शेवटी मिनाक्षीताईंच्या बाजूने निर्णय दिला. ते दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय करावा लागला. आमदार असाे किंवा नसो… त्याहीपेक्षा राज्यमंत्री असतानासुद्धा ‘सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी लढणारी रणरागिणी’ हेच खरे मिनाक्षीताईंचे विशेषण आहे. त्यांच्याकडे बंदर आणि मत्सव्यवसाय ही खाती होती. या खात्याचे काम करताना सागराला उधाण येवून उद्धवस्त होणाऱ्या गावांना मोठे बंधारे बांधून संरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळच्या खात्याच्या सचिव मालिनी शंकर यांनी या धोरणाला विरोध केला. त्यांना मिनाक्षीताईंनी ठणकावले. ‘तुम्ही सचिव आहात… मी मंत्री आहे… निर्णय अंमलात आणावाच लागेल…’ हे प्रकरण मुख्यमंत्री विलासराव यांच्यापर्यंत गेले. मिनाक्षीताईंनी मंत्रीपद सोडायची तयारी ठेवली. शेवटी रांजणखार आणि अन्य मोठे बंधारे बांधून उधाणाने उद्धवस्त होणाऱ्या गावांना संरक्षण देण्याचा निर्णय मान्य झाला.


जे. एन. पी. टी. च्या लढ्यात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मिनाक्षीताई रस्त्यावर उतरल्या… त्यांना शिक्षाही झाली. येरवडा जेलमध्ये त्यांना त्यांच्या छोट्या मुलाची आठवण होऊन त्या हळव्या झाल्या होत्या. माजी आमदार दत्ता पाटील त्यांना भेटायला गेले… मिनाक्षीताईच्या डोळ्यात पाणी आले. त्यावेळी दत्ता पाटील म्हणाले, ‘बेबी, तू नारायण नागूंची नात आहेस…. लोखंडाचे चणे खावून आपण सामान्यांसाठी लढ्याचे व्रत स्वीकारलेले आहे… अशावेळी भावनेला जागा नसते….’ मिनाक्षीताईंनी अश्रू आवरले. दत्ता पाटलांनी ही गोष्ट मिनाक्षीचे वडील आणि दत्ता पाटील यांचे बंधू प्रभाकर पाटील यांना सांगितली. प्रभाकर पाटील मिनाक्षीताईंना भेटायला गेले…. ते काही बोलणार तोच मिनाक्षीताई एकच वाक्य बोलल्या… ‘दादा, तुम्ही का आलात मला माहिती आहे… मी हिम्मत हरलेली नाही… मी तुमचीच लेक आहे… पण, मी ‘आई’ आहे, एवढेही लक्षात ठेवा.’ आणि मग प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. समाजासाठी लढणारी ही माणसं कधीतरी त्यांच्यातला हळवा कोपरा जागा होतोच… पण, माशाचे अश्रू पाण्यात जसे दिसत नाहीत… तसेच जिद्दीने लढणाऱ्या या नेत्यांचे आहे. अशा नेत्यांची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर शेतकरी-कामगार यांनीच लढवला. आचार्य अत्रे, सेनापती बापट, डांगे, एस. एम. जोशी, क्रांतीसिंह नाना पाटील, प्रबोधनकार, अमरशेख, अण्णा भाऊ साठे, आत्माराम पाटील हे तर आघाडीवर होते. पण, महाराष्ट्रात अखंडपणे सामान्य माणसांसाठी लढणारे नेते घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून लढत होते. त्यांना काही मिळाले नाही…. त्यांनी काही मागितलेही नाही… त्यांच्यापैकी काहीजणांच्या पिढ्या कर्जबाजारी झाल्या होत्या. त्यात उद्धवराव पाटील आहेत…. उद्धवराव पाटील यांनी केलेले लाख-दोन लाखांचे त्यावेळचे कर्ज त्यांचा मुलगा धनंजय दहा वर्षे फेडत होता. या नेत्यांचा त्याग आणि समर्पण याची तुलना होऊ शकत नाही… दत्ता देशमुख आहेत… गणपतराव देशमुख आहेत… एन. डी. पाटील आहेत… विदर्भात जांबुवंतराव धोटे आहेत… कॅाम्रेड बर्धन आहेत… सुदाम देशमुख आहेत… मृणालताई गोरे, अहिल्याताई रांगणेकर, तारा रेड्डी, मिनाक्षी पाटीलही त्यातल्याच आहेत…
[सुदाम देशमुख यांचे नाव निघाले म्हणून…. विषयांतर होत असतानाही एक आठवण सांगतो…. सुदामकाका ७५ वर्षांचे झाले तेव्हा अमरावतीत त्यांचा सत्कार करावा, असे ठरले. मी नागपूर लोकमतला संपादक होतो. श्रीमती प्रतिभाताई पाटील, रा. सू. गवई, कॅाम्रेड बर्धन आणि मी आम्ही पुढाकार घेवून हा सत्कार घडवला. पण, नेहरू मैदानावर सुदामकाका येवू शकले नाहीत… म्हणून आम्ही चौघे कॅन्सरशी झुंजणाऱ्या सुदामकाकांना मानपत्र द्यायला घरी गेलो. त्यांना बोलता येत नव्हते… घशात नळी घातली होती. आम्हाला पाहून त्यांनी हातानेच बसण्यासाठी खूण केली. मला जवळ बोलावले… तिथे एक पाटी-पेन्सील होती… पडल्या पडल्या पाटी समोर धरून त्यांनी त्यावर लिहिले… ‘मेळघाटातील कुपाेषणाविरुद्ध लोकमतमध्ये आवाज उठवित रहा… आता मी थकलो आहे…’ दुसऱ्या दिवशीच सुदामकाका गेला…. अशा निष्ठेची माणसं आता महाराष्ट्रात होणार आहेत का?]
अशी ही लढाऊ घराणी. या घराण्यात जयंत प्रभाकर पाटील यांनी राजकारणाबरोबर रायगडात ‘सहकार’ उभा करण्याचा प्रयत्न केला आणि व्यवसायही यशस्वी केला. आज ‘गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा’ या सागरी मार्गावर चालणारी ‘पी. एन. पी.’ही जलसेवा जयंत पाटील यांचीच आहे. अर्थात सर्वच राजकारण्यांना व्यवसायात लक्ष घालता येत नाही… आणि यशही मिळत नाही. मिनाक्षीताईंच्या बाबतीत तर असे म्हणता येईल की, ती लढण्यासाठीच जन्माला आली. तिला संसारसुखही फारसे लाभले नाही. प्राध्यापक जयदेव पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला… पण, हा संसार फारकाळ टिकला नाही… लहानग्या पप्पूला घेवून त्या माहेरी आल्या. हिम्मत न हरता, व्यक्तीगत जीवनातील दु:ख पिवून, समाजाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरल्या. वेळप्रसंगी सरकारात असताना, मंत्री असतानाही न्याय्य प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांशीही वाद करायला त्यांनी कमी केले नाही. रेवस बंदर की मांडवा… विलासरावांशी त्यांचा मतभेद झाला होता आणि ती फाईल त्यांनी विलासरावांसमोर तशीच ठेवून… ‘तुम्ही मुख्यमंत्री आहात… हवा तो निर्णय घ्या…’ असे नम्रपणे सांगून त्या निघून गेल्या होत्या.
एकेकाळचे रेवस बंदर कायमचे मागे पडले. मुंबई, गोवा ही जलसेवाही कायमची बंद झाली. सागरी मार्गाचा पुरेपूर वापर कोकणवासियांना आजही होत नाही. आता गणेशोत्सवासाठी गावाला जाताना खड्डे चुकवता चुकवता या कोकणवासियांची दमछाक होणार आहे. या खड्यांमधून प्रवास करताना परवा एका भगिनीने बाळाला जन्म दिला… काय यातना झाल्या असतील तिला… त्याची कोणाला ना लाज ना लज्जा…. जेवढं बोलावं तेवढं कमीच… आज मिनाक्षीताई प्रकृतीने ठणठणीत असत्या तर कोकणच्या उद्धवस्त झालेल्या रस्त्यांच्या आंदोलनासाठी पदर खोचून रस्त्यावर उतरल्या असत्या. आज कोकणाला लढणारा नेता नाही. उभ्या महाराष्ट्रालाच नाही म्हणा… प्रश्न ढिगभर आहेत… वृत्तपत्रे ढिगभर आहेत… पण नसलेल्या प्रश्नांना ‘मोठा प्रश्न’ करून मुख्य प्रश्नावरून लक्ष उडवण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. अशा या काळात एक तर लढाऊ नेते नाहीत… आणि जे आहेत ते आजाराशी झुंजत आहेत… उद्याचा महाराष्ट्र कदाचित समृद्ध होईल… पण ती समृद्धी मुठभर लोकांची असेल… संयुक्त महाराष्ट्र ज्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या ताकतीवर उभा राहिला. १०६ हुतात्मे झाले. त्या लढ्यात या पाटील घराण्याचा सहभाग फार मोठा आहे. पण आज या शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी आवाज उठवणारा आहे कोण?….
मिनाक्षी, तू मला मुलीसारखी आहेस…. तू ज्या आजाराशी झूंजत आहेस, त्यातून तू सुखरूप बाहेर येशील… आयुष्यभर तू लढलीस… कधी पराभूत झाली नाहीस… आताही पराभूत होणार नाहीस…
७५ व्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!


– मधुकर भावे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button