
गुलाबराव वामनराव पाटील म्हणजे
गुल बकावलीच फुल
आपल्याला सोडून गेले!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 23/8/2023 :
आपल्याकडे जसा आपल्या पुराण कथेत कल्पतरू, कामधेनु आहेत. तसंच अरेबीयन नाईट मध्ये गुल बकावलीच फुल आहे. हे ज्याला मिळाले त्याला जगातील सर्वं सुख प्राप्त होतात. तुम्ही फक्त कल्पना करा ती वस्तू हजर. गुलाबराव पाटील खान्देश आणि अहिर भूमीपुत्र यांच्यासाठी मिळालेल एक गुलबकावलीचे फुल होत. साने गुरुजींचा सच्चा विद्यार्थी, खरां समाजवादी विचारसरणी असलेला नेता, शेतकऱ्यांचा खराखुरा कैवारी, अहिराणी भाषा पंडित, हजर जबाबी नेता, म्हणजे गुलाबराव वामनराव पाटील.हे आता आपल्यात नाहीत. त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्याला चीर शांती देवो.
सानेगुरुजींच्या विचाराने ओतप्रोत भरलेला नेता म्हणजे गुलाबराव पाटील. ज्यांनी जन आंदोलनात शिंगाडे मोर्चा प्रथम वापरात आणला. त्यातून प्रेरणा घेऊन मग नंतर अनेक मोर्चे आले, रुमणे, मोर्चा, लाटणे मोर्चा, हांडा मोर्चा. या सर्वांचे प्रेरणा स्थान म्हणजे गुलाबराव पाटील यांचा सिंगाडे मोर्चाच आहे. आमदार असताना त्यांनी सभागृहात आपल्या खरड्या वक्तृत्व कलेने कायम स्वरूप आत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघां कडून प्रचंड टाळ्या घेतल्या. असा गुलाबरावं पुन्हा होणार नाही. मला जेंव्हा जेव्हा त्यांचं भाषण ऐकायची संधी मिळाली तेंव्हा मी हातातील काम सोडून त्यांची भाषण ऐकायला जायचो. गुलाबराव पाटील यांचं भाषण म्हणजे उपमा, अलंकार आणि विचार लुटायची पर्वणीच असायची.
मी एकदा अकोल्यालां असताना प्रमिलाताई ओके सभागृहात एक व्याख्यान मालिका होती. तिथे गुलाबराव पाटील यांचं व्याख्यान मी ऐकलं होत. त्यांना विषय दिला होता,
“मी आणि माझी आमदारकी”
खूपच सुरेख भाषण झाले. मुंबईला आमदार निवांसातील त्यांच्या खोलीवर मुक्कामा रहायला येणाऱ्या इरसाल गावकऱ्यांचे मजेशीर किस्से त्यांनी मांडले होते. त्यात त्यानी रामायणातील कथा सांगत सध्याच्या भ्रष्टाचारा विषयी बोचरी टीका त्यांनी केली होती.
रावणाचा वध झाला. सीतेला घेऊन राम परतीच्या प्रवासाला निघाला. वाटेत पुन्हा राम सेतू लागला. रामाने वानरसेनेला सांगितले. हा पूल पाडून टाका. त्यावर माकडानी विचारले,
“का?”
तर त्यावर राम म्हणाला,
“अरे पूल नसताना रावणाने भारतातून एक सीता चोरून नेली. आता हां पूल झाला आहे तर रोज शेकड्यांनी राक्षस भारतात घुसतील आणि आपल्या पोरींना पळवून नेतील. म्हणून आपल्या मुलींच्या रक्षणासाठी हां पूल पाडा.”
त्यावर पुन्हा एक माकड म्हणाले,
“हे आधी नाही का सांगाच प्रभू! आम्ही कच्चा पूल बांधला असता म्हणजे तो पटकन पडला असता.”
त्यावर प्रभुरामचंद्र म्हणाले,
“वत्सां तुमची कच्चं बांधकाम करण्याची इच्छा कलियुगात नक्की पूर्ण होईल!”
त्यावर माकडानें पुन्हा विचारले “ती कशी प्रभू? ”
कलियुगात तुम्ही सर्वं बंदर लोक पुन्हा जन्माला याल, तुमची बंदरं अँड कंपनी अस्तित्वात येईल. या बंदर अँड कंपनीचा शॉर्ट फॉर्म असेल” बी अँड सी” ही बंदर अँड कंपनी म्हणजे बी अँड सी सर्वं सरकारी बाधकामे कच्ची बांधतील. ती धडाधड पडतीली किंवा पहिल्याच पावसात वाहून जातील. अशा प्रकारे तुमची कच्च बांधकाम करण्याची इच्छा पूर्णत्वास जाईल. अशी बोचरी टीका तें सरकारच्या भ्रष्टाचारावर करत.
चाळीसगाव येथे तिसरे अहिराणी संमेलन होते. तिथं त्यांचं अहिराणी भाषण पहिल्यांदा ऐकायला मिळाल. हां माणूस खरां खान्देशी रत्न आणि अस्सल अहिराणी हिरा होता. तें मराठी भाषा जेवढे अस्खलीत बोलत तेवढेच अहिराणी अस्सल बोलत. त्यातून अहिराणी भाषा आणि खान्देशी संस्कृतिचे येथेच्च दर्शन घडे. या भाषाणत त्यांनी खान्देशातील संस्कृतीचे अनेक किस्से अहिराणीत सांगितले.
खेळात जेंव्हा दोन गट एकमेकां सोबत खेळतात. त्यावेळी एका गटावर राज्य असतें. या राज्य शब्दाला अहिराणीत राम शब्द आहे. हां राम न देता ज्यांच्या वर राज्य आहे तो गट खेळातून बाहेर आला तर राज घेणारा गट राम कोसतो तो असा,
आमना राम रामबोडी राम बोडी.
चमार भाऊनी कांबोडी कांबोडी!
चमार ग्या हागाले हागाले.
जो राज्य बुडवतो त्याचं नावं घेऊन म्हणायचे,
सिरप्या ग्या………..
हे गुलाबराव पाटील यांनी साभिनय करून बोलून दाखविले.
खांदेशात कोणी व्यक्ती वारला तर तिथे बायका त्याच वर्णन करून करून यमक साधून रडतात, त्याचा किस्सा गुलाबरावानी सांगितला होता, त्यांची एक लांबच्या नात्यातील काकू होती. काका वारले आणि मग काकू रडायला लागली,
मना राम, मना राम कसा सोडी ग्याना बईन
मना राम
मना रामले कढी भलती आवडे व माय
मना राम
मन घर ताक नही ऱ्हायना व बईन
मना राम
मी तें आथाईन तथाई ताक मांगी लवू नां बईन
मनाराम
मी त्या मांगले ताकनी कढी करी देऊ व माय
मना राम
राम कसा वरपी वरपी कढी खाय व माय
मना राम.
अशा या त्यांच्या भाषणानें मंडपातील लोक लोट पोट होऊन हसत असत. प्रसंग बघा मृत्यूचा पण त्यातूनही त्यांनी विनोद साधला. त्यातून भाषा, संस्कृती, रूढी परंपरा तें उभी करत असत.
गुलाबरावं पाटील हजर जबाबी होते. प्रसंग पाहून तें चालता बोलता कोट्या करत असत. त्याचा एक प्रसंग सांगतो. अंमळनेर विधानसभा हां त्यांचा मतदारसंघ तें समाजवादी पक्षाचे उमेदवार असायचे. त्यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाचे अमृत वामन पाटील. आणि हे गुलाब वामन पाटील. योगा योगाने दोघांच्या वडिलांचे नावं वामनचं. यावर तें अमृत आप्पानां बोलायचे, आरे अमृत तू निवडी येवो का मी निवडी येवो. वामन्यांनाज पोऱ्या आमदार व्हई हाई पक्क.
असा अहिराणी भाषेचा महामेरू आज आपल्याला सोडून गेले. त्यांचं वय सुद्धा बरेच झाले होते शरीर थकले होते त्यामुळे त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातून संपूर्ण निवृत्ती घेतली होती. आज पृथ्वी वरूनही निवृत्त होत तें आपल्या प्रिय साने गुरुजींना भेटायला निघून गेले. अहिराणी भाषेच्या शीर पेचातील गुलबकावलीचे फुल निखळून पडलं. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
बापू हटकर