ताज्या घडामोडी

⚧‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

⚧‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क

अकलूज दिनांक 12/11/2024 :
तीन वर्षांपासून रशियाचे युक्रेनबरोबर युद्ध सुरू आहे. अशातच आता रशियाला एका नवीन समस्येचा सामना करावा लागत आहे आणि ती समस्या आहे देशातील घटता जन्मदर. देशाच्या घटत्या जन्मदराला तोंड देण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष युद्ध पातळीवर धोरणे लागू करण्याच्या तयारीत आहेत. कामाच्या ठिकाणी लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यापासून ते डेटवर जाण्यापर्यंतच्या सर्वच बाबींसाठी रशिया आर्थिक प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. प्राप्त माहितीनुसार रशियन अधिकारी विचित्र प्रस्तावावर विचार करत आहेत. देशाच्या झपाट्याने कमी होत असलेल्या जन्मदरावर उपाय म्हणून आता रशिया ‘सेक्स मिनिस्ट्री’ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? खरंच रशिया ‘सेक्स मिनिस्ट्री’ स्थापन करणार का? याचा काय परिणाम होईल? त्याविषयी जाणून घेऊ.
घटत्या जन्मदरावर विचित्र उपाय
द मिररच्या मते, रशियन अधिकारी देशाची लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने विविध प्रस्ताव आणत आहेत. एका सूचनेमध्ये नागरिकांना रात्री १० ते पहाटे २ दरम्यान इंटरनेट आणि घरातील दिवे अशा दोन्ही गोष्टी बंद करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्याचीही अधिकार्‍यांची योजना आहे. जोडप्यांमध्ये जवळीक वाढवण्यासाठी अनेक मार्ग शोधले जात आहेत. दुसऱ्या प्रस्तावात, युगुलांना पहिल्या डेटवर जाण्यासाठी सरकारकडून पाच हजार रूबल (४,३०२ रुपये) द्यावयाची कल्पनाही सुचविण्यात आली आहे. आणखी एका शिफारशीत सुचविण्यात आले आहे की, नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी राज्याने निधी दिला पाहिजे. गर्भधारणेच्या संभाव्यतेस प्रोत्साहन देण्यासाठी हॉटेलचा खर्च २६,३०० रूबल (२२,६३२ रुपये) असावा, असेही त्यात नमूद आहे. यांसारखे अनेक विचित्र उपाय रशियन अधिकार्‍यांकडून सुचविले जात आहेत.
*‘सेक्स-ॲट-वर्कप्लेस’साठी प्रोत्साहन
या राष्ट्रीय रणनीतींबरोबरच, काही राज्ये यावर आपली स्वतःची धोरणे तयार करत आहेत. खाबरोव्स्कमध्ये १८ ते २३ वयोगटातील तरुणींना मूल होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ९८,०२९ रुपये देऊ केले जातात. दरम्यान, चेल्याबिन्स्कमध्ये प्रथम जन्मलेल्या मुलाला बक्षीस म्हणून ९.२६ लाख रुपये देऊ केले जातात. रशियन अधिकाऱ्यांनी आता महिलांवर त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल आणि मासिक पाळीबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली आहे. मॉस्कोमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना त्यांचे लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य, कौटुंबिक हेतू आणि बरेच काही तपासण्यासाठी प्रश्नावली दिली गेली. याद्वारे देशभरातील एक व्यापक डेटा संकलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. त्यापूर्वी प्रादेशिक आरोग्यमंत्री डॉ. येवगेनी शेस्टोपालोव्ह यांनी रशियन लोकांना त्यांच्या जीवनात ‘सेक्स-ॲट-वर्कप्लेस’ योजना लागू करण्यास सांगितले; ज्यामध्ये लंच आणि कॉफी ब्रेकदरम्यान बाळांना जन्म देण्यासाठी आवश्यक कृती करण्यास सूचित करण्यात आले होते.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कट्टर समर्थक व रशियन संसदेच्या कौटुंबिक संरक्षण समितीच्या प्रमुख असलेल्या नीना ओस्टानिना ‘सेक्स मिनिस्ट्री’ तयार करण्यासाठी वकिली करणाऱ्या याचिकेचे पुनरावलोकन करत आहेत. मॉस्कविच मासिकानुसार, ही याचिका ग्लाव्हपीआर एजन्सीने दाखल केली होती. त्यामध्ये असे प्रस्तावित करण्यात आले होते की, हे मंत्रालय देशाचा जन्मदर वाढविण्याच्या प्रयत्नांची जबाबदारी पार पाडेल.
स्त्रियांना त्या लैंगिकदृष्ट्या सक्रिय केव्हा झाल्या, त्या गर्भनिरोधकांचा वापर करतात की नाही, वंध्यत्वाचा अनुभव आहे का किंवा भूतकाळातील गर्भधारणा व येत्या वर्षात त्यांची मूल जन्माला घालण्याची योजना आहे का, असे विचारण्यात येत आहे. ज्या स्त्रिया प्रश्नावलीला प्रतिसाद देत नाहीत त्यांना डॉक्टरांच्या भेटींमध्ये उपस्थित राहणे आवश्यक करण्यात येत आहे, जेथे त्यांनी वैयक्तिकरीत्या समान प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. सरकारी सांस्कृतिक संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांनी ही वैयक्तिक माहिती एचआरला दिल्यामुळे त्यांंच्या पदरी निराशा आली होती. काहींनी रिकाम्या प्रश्नावली सादर करून, फक्त त्यांची नावे जोडण्यास सांगितले.
*२५ वर्षांतील सर्वांत कमी जन्मदर
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाचा जन्मदर हा २५ वर्षांतील आतापर्यंतचा सर्वांत कमी जन्मदर आहे. राष्ट्रीय सांख्यिकी एजन्सी Rosstat’च्या डेटावरून असे दिसून आले आहे की, रशियामध्ये २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ५,९९,६०० मुलांचा जन्म झाला आहे. १९९९ नंतरचा हा सर्वांत कमी आकडा आहे. जूनमध्ये जन्मदराची संख्या सहा टक्क्यांनी घसरून ९८,६०० वर आली. रशियन मीडियानुसार मासिक आकडा पहिल्यांदा एक लाखाच्या खाली आला. “हे राष्ट्राच्या भविष्यासाठी आपत्तीजनक आहे,” असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी जुलैमध्ये सांगितले.
ही लोकसंख्याशास्त्रीय मंदी युक्रेनबरोबरच्या प्रदीर्घ युद्धादरम्यान होत आहे. त्यामुळे लक्षणीय जीवितहानी झाली आहे. “तीन वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे आणि आता याचा थेट परिणाम रशियन प्रदेशांवर होत आहे. सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थिती अनिश्चित असल्याने, कुटुंबे मुले होण्याबाबत निर्णय घेण्यास उशीर करत आहेत,” असे रशियाचे विश्लेषक ॲलेक्स कोकचारोव्ह यांनी ‘युरो न्यूज’ला सांगितले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button