ताज्या घडामोडी

रानभाजी – कोरला

रानभाजी – कोरला
इतर नावे : कोरळ, कोल्हेरी, फांग

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक29/9/ 2024 : पावसाळ्याच्या दिवसात बाजारात बऱ्याच विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या रानभाज्या येतात. डोंगरउतारावर, नदिकिनाऱ्यावर,ओढा-विहीर, रानवाटांवर, कधी कधी शेतांच्या बांधावर तर कधी कधी घरामागच्या परसात या भाज्या आपोआप उगवतात तेही रासायनिक खत, कीटकनाशक यांच्या वापराशिवाय. त्यामुळे त्या भाज्यांमधील पौष्टिक गुणधर्मात दुपटीने वाढ होते. परिणामी या रानभाज्या विविध आजारांवर, विकारांवर गुणकारी ठरतात म्हणून या भाज्या पौष्टिक असतात औषधी असतात. या भाज्या मिळाल्या तर आहारात त्याचा समावेष करून निरोगी राहावे. परंतु रानभाजी खात्रीपूर्वक ओळख पटल्याशिवाय आणि ती कशी बनवावी हे निश्चितपणे माहिती असल्या खेरीज खाऊ नये. या पावसाच्या दिवसात पोकळा, केनी, मायाळू, मोहाची फुलं, राजगिरा, आपट्याच्या पानांसारखी पण मऊ लुसलुशीत कोरलाची पानं, गवताप्रमाणे दिसणारी फोडशी, चिंचेच्या पानांप्रमाणे दिसणारा कोवळ्या पानांचा खुरासन, तेलपट, शेवळी, रानटी माठ, लोत, तोरणा, कोरळ, नारणवेल, घालवेल, धोरता, कुंडा, दिंडा, रानटोण, पेंढरा, मांड, रानमाठ, काटेमाठ, हादगा, हिरवामाठ, टेलपट, टाकळा, कुर्डू, लाल भोपळ्याची पानं, कंटोली, भोकर, चिघळ, घोळ, कुंजीर, तांदुळजा यांसारख्या भाज्या भरपूर प्रमाणात खाण्याचा हा महत्त्वाचा ऋतू आहे. मांसाहारी मंडळी या भाज्यांमध्ये ओली किंवा सुकी कोळंबी, तिसरे, सुके बोंबील टाकूनही या भाज्या बनवतात. रानभाज्यांमध्ये असणाऱ्या तंतुमय (फायबर) घटकांमुळे पावसात मंदावलेली पचनक्रिया अधिक गतिमान होते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कोरळ किंवा कोरल नावाच्या लहानशा झाडाला पालवी फुटते. ही कोवळी पान आपट्याच्या पानांसारखी पाने असलेली भाजी म्हणजे कोरलाची भाजी. हि पाने पालेभाजी म्हणून खाल्ली जातात. आपट्याच्या पानांसारखी ही पाने दिसतात आणि वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरणानुसार ही वनस्पती आपट्याच्या कुळातच गणली जाते. हि भाजी अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट लागते. आता पावसाळ्यात खाल्लेली या भाजीची चव जशीच्या तशी जिभेवर असते आणि जीभ वाट पाहत असते की पुढची पावसाची सुरवात कधी येईल आणि हि भाजी कधी मिळेल. अशी ह्या भाजीची चव वेगळीच अप्रतिम चविष्ट आहे. म्हणून आता सुरुवातीचा पाऊस आहे तोपर्यंत बाजारात जा आणि हि भाजी घेवून या आणि तिची अनोखी चव चाखा, पहा तुम्हालाही मजा येईल आणि ती चविष्ट भाजी खाल्ल्याचे समाधान मिळेल.
पाककृती
# साहित्य – भाजीच्या कोवळ्या पानांचे ३ वाटे. कडक देठ असतील तर काढून टाका. फक्त कोवळी पान व कोवळे देठ खुडून घ्या. ५-6 हिरव्या मिर्चीचे तुकडे, ५ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, अर्धा कप मटकीची डाळ, ४-५ चमचे तेल, चवीपुरतं मीठ
# कृती – मध्यम आचेवर भांड ठेवा, ते तापले की त्यात तेल घाला. आता त्या तेलात मिरची घालून परता, नंतर त्यात कांदा घालून थोडा गुलाबी होई पर्यंत परता. आता त्यात भाजीची पानं टाका, हवी असल्यास पानं चिरूनही घालू शकता. पानं परतून झाली की त्यात मटकीची डाळ घाला आणि त्यात मीठ घालून परता आणि झाकण ठेवा. २ ते ३ मिनिट तशीच ती भाजी वाफेवर शिजवून घ्या. तयार भाजी भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खा.

Shilpa Gadahire
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button