सहकार महर्षि कारखाना “ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025” पुरस्काराने सन्मानित

सहकार महर्षि कारखाना “ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025” पुरस्काराने सन्मानित
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 25/12/2025 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलूज या कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या आर्थिक हिताचे रक्षण करताना, ऊसाला दिलेला यथोचित व स्पर्धात्मक दर, कारखान्याचे सुयोग्य प्रशासन व पारदर्शकता, साखर उत्पादनातील तांत्रिक गुणवत्ता, उत्पादन खर्च बचत आणि कारखाना व्यवस्थापनातील विश्वासार्हता यांचा उत्तम संगम व समन्वय साधल्याने जागतिक सहकार वर्षानिमित्त कारखाना सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस को-ऑप बँक लि., यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्यास रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025 पुरस्काराने गौरविण्यात आले.

सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते-पाटील उर्फ काकासाहेब यांनी सन 1960 मध्ये या सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून माळशिरस तालुक्याचे नंदनवन केले तसेच याबरोबर विविध सहकारी संस्थांची व उद्योगांची उभारणी केलेली आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. या उद्योग समूहामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झालेली आहे त्यामुळे कुटुंबांना आर्थिक हातभार लावण्यास मदत झालेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे

चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून सहकारी कारखाना व संलग्न असणाऱ्या सर्व संस्थांमधून सर्व घटकांना सोयी, सवलती व सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न अविरतपणे करून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. तसेच विविध उपक्रमाचेही आयोजन करण्यात येत आहे.
सहकार महर्षि कारखान्याने सहकाराच्या माध्यमातून 33 मे.वॅट सहवीज निर्मिती प्रकल्प (वीज उत्पादन), प्रेसमड व बायो फर्टीलायझर, डिस्टिलरी, ईएनए, इथेनॉल, ॲसेटीक ॲसिड, बायोगॅस या उत्पादन प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी करून सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले आहेत याचे सहकारामध्ये शाश्वत विकासाचे रोल मॉडेल निर्माण केले आहे.
या सर्व उपक्रमाद्वारे सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, स्थानिक अर्थव्यवस्थेची मजबुती आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस मोठा हातभार लागला आहे. सहकार मूल्यांवर आधारित या प्रगत, पारदर्शक आणि समाजाभिमुख कारखाना व्यवस्थापनाच्या गुणांचा अभ्यास करून राज्यातील नामवंत सहकारी साखर कारखाना म्हणून कारखान्यास सदरचा पुरस्कार कॉसमॉस बँकेच्या सहकार सभागृहात महाराष्ट्र राज्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
सदरचा पुरस्कार कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्याचे साखर आयुक्त विजय कोलते व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई प्रशासक विद्याधर अनास्कर व काॅसमाॅस को-ऑपरेटिव्ह बॅक लि, अध्यक्ष ॲड.प्रल्हाद कोकरे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कारखान्याच्या वतीने व्हाईस चेअरमन शंकरराव रामचंद्र माने-देशमुख व सेक्रेटरी अनिल काटे यांनी उपस्थित राहून तो स्वीकारला. या पुरस्काराने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून संचालक मंडळ व्यवस्थापनावरील विश्वास सार्थ झाला आहे.
कारखान्यास पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्व सभासद शेतकरी, अधिकारी, कामगार हितचिंतक यांच्यामध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

