नव्या प्रकारचा “इतिहास” लोकांच्या मनात रुजवला जातोय.

नव्या प्रकारचा “इतिहास” लोकांच्या मनात रुजवला जातोय.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 18/12/2025 :
आजच्या काळात इतिहासावरून राजकारण करणे हा एक प्रकारचा फॅशनच झाला आहे. कोणाचं योगदान कमी दाखवायचं, कोणाला देवत्व द्यायचं आणि कोणावर दोष टाकायचा हे सर्व ठरवून, सोशल मीडियाच्या पोस्ट्सच्या माध्यमातून एका नव्या प्रकारचा “इतिहास” लोकांच्या मनात रुजवला जातो आहे.
आजकाल एक नवीन फॅड दिसतो “नेहरूंनी देश बुडवला आणि सरदार पटेलांनी देश वाचवला” नेहरूंच्या नावाने बोटे मोडायची आणि पटेलांच्या नावाने देशभक्ती दाखवायची. पण हे सर्व इतकं सोपं असतं का?इतिहास हे व्हॉट्सअॅपच्या फॉरवर्ड मेसेजइतकं छोटं आणि सोपं नसतं.
पटेल आणि नेहरू — स्पर्धक नव्हे, सहकारी
नेहरू आणि पटेल हे दोघेही काँग्रेसचे प्रमुख नेते होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात दोघांनी वेगवेगळ्या भूमिका निभावल्या, पण उद्दिष्ट एकच होतं — भारताचा स्वातंत्र्य आणि एकात्मतेचा मार्ग सुरक्षित करणे.
सरदार पटेलांनी देशातील ५६५ संस्थानांचं विलीनीकरण करून भारत एकत्र केला. पंडित नेहरूंनी नव्या भारताचा आधुनिक पायाभूत विकास घडवून आणला. दोघेही देशासाठी झटले — एक प्रशासनाच्या माध्यमातून, तर दुसरे दृष्टीकोनाच्या माध्यमातून.
“नेहरूंनी पटेलांवर अन्याय केला” — हे कोण पसरवतंय?
आज सोशल मीडियावर ठरवून एक कथानक तयार केलं गेलं आहे की “नेहरूंनी पटेलांना दाबून ठेवले” “प्रधानमंत्री व्हायला दिलं नाही” इत्यादी.
पण वास्तव असं आहे की, काँग्रेस कार्यसमितीने नेहरूंचं नाव सुचवलं होतं आणि पटेलांनी स्वतः मागे हटून त्यांना पाठिंबा दिला. हे पटेलांचं मोठेपण होतं. हे इतिहासात नोंदलेलं सत्य आहे, ज्याचे पुरावे काँग्रेसचे जुने कागदपत्रे आणि गांधीजींची पत्रव्यवहारात आहेत.

१९४४ मध्ये RSS च्या मुखपत्र “ऑर्गनायझर” मध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं, ज्यात १० तोंडाच्या रावणाला बाण मारणारे दाखवले आहेत आणि त्या रावणाच्या तोंडांमध्ये गांधी, नेहरू, आणि वल्लभभाई पटेल यांचंही एक तोंड दाखवलेलं होतं. यावरून काय दिसतं? त्या काळातच या संघाच्या विचारधारेत पटेलसुद्धा “शत्रू” मानले गेले होते. म्हणजे आज जे लोक पटेलांच्या नावाने राजकारण करतात, त्यांनी त्याच पटेलांना कधी “रावण” मानलं होतं.
नवीन पिढीला फक्त अर्धवट इतिहास माहिती आहे
आजच्या पिढीचं ज्ञान “रील्स”, “फॉरवर्ड्स” आणि “मीम्स” वर अवलंबून आहे. तथ्य तपासण्याची सवय नाही, इतिहास वाचायची इच्छाही नाही. त्यामुळे “खोटं” हेच “सत्य” बनत चाललं आहे, खोटं वारंवार सांगितलं की ते सत्य वाटू लागतं.
आज जे लोक म्हणतात की “नेहरूंनी पटेलांवर अन्याय केला” तेच लोक ७० वर्षांपूर्वी पटेलांना “रावण” मानणाऱ्या विचारांचे वारस आहेत.
तेव्हा प्रश्न पडतो — पटेलांनी स्वतः कधी सांगितलं का की नेहरूंनी माझ्यावर अन्याय केला? किंवा ७० वर्षांनी त्यांना स्वप्नात येऊन कुणी सांगितलं का?.
देशासाठी काम केलेल्या प्रत्येक नेत्याचा आदर करणे हेच खरे राष्ट्रभक्तीचे लक्षण आहे. पण इथे हेतू वेगळा आहे — एका नेत्याला खाली खेचून दुसऱ्याच्या नावाने राजकारण करणे. हा इतिहासाचा अपमान आहे आणि तेवढंच धोकादायक आहे.
खोटं बोलणाऱ्यांना काही फरक पडत नाही कारण त्यांना ठाऊक आहे की लोक तपासणार नाहीत. पण जे इतिहास वाचतात, विचार करतात त्यांच्यासाठी सत्य नेहमी उजळून येतं
“नेहरू आणि पटेल हे दोघे भारताचे दोन स्तंभ होते —
एकाने भारताची राजकीय एकता घडवली आणि दुसऱ्याने त्याला आधुनिकतेची दिशा दिली”.
हाच इतिहासाचा खरा आरसा आहे. बाकी सोशल मीडियावर दिसणारा इतिहास म्हणजे फक्त प्रचाराचा मुखवटा.
9326 365396

