ताज्या घडामोडी

महिला एसटी वाहकावर हात टाकणाऱ्या दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी; माळशिरस न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

महिला एसटी वाहकावर हात टाकणाऱ्या दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी; माळशिरस न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 10/01/2026 :
सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, महिला वाहकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे या प्रकरणात माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
सांगोला आगारात एसटी वाहक म्हणून कार्यरत सौ. दिपाली अनिल अष्टेकर या ​ २ फेब्रुवारी २०१८ रोजी सांगोला-अकलूज बस घेऊन सायंकाळी ६:१५ वाजता अकलूज बसस्थानकात पोहोचल्या. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांनी प्रवाशांना ‘जागा नाही, उभे राहून यावे लागेल’ असे सांगितले.
​याचा राग धरून दोन तरुणांनी त्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि नंतर खाली उतरले. त्यानंतर बस मार्गस्थ होत असताना पुन्हा बस थांबवून त्यांनी वाद घातला. वाहक अष्टेकर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर आणि गळ्यावर मारहाण केली. चालक तानाजी केंगार, महेश पावसे व इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून त्यांना सोडवले.
​पोलीस तपासात या दोन्ही तरुणांची नावे गणेश कृष्णदेव पवार आणि योगेश पोपट गोडसे (दोघेही राहणार बाभुळगाव, ता. माळशिरस) असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​माळशिरस जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुली यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. फिर्यादी, साक्षीदार सूर्यकांत सलगरे, महेश पावसे आणि डॉ. सुनील नरुटे यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना ​कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा): २ वर्षे सक्तमजुरी आणि २००० रुपये दंड. कलम ३३२ (लोकसेवकाला मारहाण): २ वर्षे सक्तमजुरी आणि २००० रुपये दंड. कलम ५०४ (शांतता भंग): ६ महिने सक्तमजुरी आणि १००० रुपये दंड. अशी शिक्षा सुनावली.
​या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाबासाहेब भातुंगडे यांनी केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कायदेशीर प्रक्रिया पार पडली. सरकारी वकील संग्राम एस. पाटील व शांतीनाथ मेंढेगिरी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून हवालदार रियाज तांबोळी आणि हरीश भोसले यांनी सहकार्य केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button