त्यांची थंडी __ आमची थंडी
त्यांची थंडी __ आमची थंडी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 13/12/2025 :
सध्या सर्वत्र टोकाची थंडी पडते आहे.. या थंडीत घराबाहेर पडावे असे वाटत नाही. आपल्या थंडीचे रोमँटिक कौतुक आपण करत राहतो चहा पिण्यापासून तर दारू पिण्यापर्यंत वेगवेगळे रोमँटिक पैलू या थंडीला दिले आहेत..
गुलाबी थंडी काश्मिरी शाल घरातली शेकोटी अशा विविध प्रकारे आपण थंडीभोवती फिरत राहतो.. आपली बंद घरे, त्याच्या बंद खिडक्या, स्वेटर,मफलर यात बंद होऊन आपण किती थंडी पडली याची चर्चा करत राहतो पण ही आमची थंडी अशी रोमँटिक असताना गरिबांची थंडी कशी असेल या कल्पनेनेच गारठायला होते…
आपल्या देशात प्रत्येक विषयात भारत इंडिया असतो.
फुटपाथवर झोपणारी माणसे कशी झोपत असतील..? मोठ्या शहरात पुलाखाली फुटपाथवर झोपलेली लहान मुले मोठी माणसे बघून माणूस म्हणून आपल्यालाच अपराधी वाटायला लागते की इतकी टोकाची विषमता का असावी की माणसांच्या किमान गरजा सुद्धा या व्यवस्थेमध्ये पूर्ण होऊ नयेत…?
झोपडपट्टीतील गरिबांची घरे ही फक्त नावाला निवारा म्हणून असतात. सर्व बाजूंनी थंडी त्यांना झोडपून काढत असते आणि कसेतरी त्या खुराड्यात रात्र काढणे इतकेच त्यांच्या हातात असते.. फाटके तुटके कपडे बघून ही माणसे कशी थंडीला तोंड देत असतील ? असा प्रश्न पडतो… बाहेर चौकात कुठेतरी शेकोटी करायची, मध्यरात्रीपर्यंत वेळ घालवायचा आणि पहाटेच्या थंडीला सामोरे जायचे असे काही असते..
ऊसतोड कामगारांची थंडी याची चर्चासुद्धा करावीशी वाटत नाही.. पहाटे पहाटे आपण अजून एक पांघरून अंगावर ओढत असताना पहाटे तीन वाजता ऊस तोडी कामगार उठतात. त्या उसाच्या पाचटाने बांधलेल्या उघड्या बागड्या घरातल्या थंडीत कसातरी महिला स्वयंपाक उरकतात आणि पहाटेच बैलगाडी घेऊन ऊस तोडायला निघतात..लहान मुले कुरकुर करतात.. त्यांना तसेच त्या बैलगाडीत टाकतात. आपल्या घरावरून पहाटेच्या वेळी बैलांची गळ्यातल्या घंटी ची किन किन ऐकू येते तेव्हा विलक्षण वेदना होतात अशा थंडीत ही माणसे दूर रानातल्या अजून थंडीत असलेल्या उसात जातात तिथे अधिकच थंडी असते ..त्या पाचटाचा जाळ करून त्या उजेडात ऊस तोडायला सुरुवात करतात आणि इतक्याच टोकाच्या थंडीत उसाच्या मोळी बांधून कारखान्याकडे निघतात मुलांना सकाळी आंघोळ नाही, चहा नाही नाष्टा नाही. त्या थंडीत तिथेच त्यांना झोपवले जाते. आपल्या घरातल्या मुलांची आपण किती काळजी घेतो आणि इकडे मात्र अशा प्रकारचा बालपणाचा भारत इंडिया…
तिकडे पलीकडे वीट भट्टीवर वीटभट्टी मजूर दिसत आहेत.. त्यांचेही काम पहाटेच सुरू झाले आहे. वीट भट्टीचा चिखल रात्रीच मळून ठेवला आहे आणि भट्टीवरच्याच विटांनी ते घर बांधले आहे. सापटीमधून ते संपूर्ण घर काकडून गेलले आहे.. पहाटे थंडीत चार वाजता पती-पत्नी उठतात. रात्री म्हणून ठेवलेल्या त्या थंडगार चिखलाला हातात घेऊन त्याच्या विटा पाडायला सुरुवात करतात. आजूबाजूचे जग शांत झोपले आहे. वीटभट्टी उघड्यावर असल्यामुळे थंडीचा कहर आहे. आणि अशा चिखलाच्या विटा पहाटे पाडायला या पती-पत्नींनी सुरुवात केली आहे .सकाळी दहा वाजेपर्यंत पती वीट पाडतो आहे आणि पत्नी त्या विटा उचलून वाळत घालते आहे… कडेच थंड वातावरण हातात ती ओली वीट थंड आणि रक्तही गोठून चाललेले.. चहा नाही नाष्टा नाही अशा थंडीत ते मजूर काम करत राहतात..
पलीकडच्या शेतात भर थंडीत शेतकरी दादा बसलेला.दिवसभर लाईट नसल्याने रात्री लाईट आली. त्यामुळे शेतात पाणी भरायला मध्यरात्री आलाय.पायाला साप चावेल का ? याचा विचार न करता या अंधारात पाणी भरायचे काम करतात… त्या पलीकडच्या शेतात आणखी एक शेतकरी हातात काठी घेऊन बसत आहे. रात्रीच्या वेळी वन्य प्राणी शेतामध्ये घुसतात आणि पिकाची नुकसान करतात तेव्हा कितीही झोप आली कितीही थंडी वाजली तरी रोज रात्री शेतात राखण करायला यावेच लागते…
शेकोटीचा जाळ करायचा, जेणेकरून वन्यप्राणी घुसणार नाहीत अन्यथा सगळी मेहनत फुकट जाते. तारेची कुंपण केली तरी रानडुकरे ते तोडून आत घुसतात… त्यामुळे कितीही थंडी पडली तरी राखण करायला पर्याय नाही….
पहाटे पहाटे रस्ते झाडणार्या या भगिनी निमूटपणे रस्ते झाडत आहेत. घरात स्वेटर शाल मफलर घालून बसलेल्या ज्यांनी दिवसा कचरा केला तो कचरा या भगिनी पहाटे रस्त्यावर साफ करत आहे ..थंडीची सबब त्यांना सांगता येत नाही.. घरी लेकरांना तसेच सोडून या थंडीमध्ये बाहेर आल्या आहेत.. थंडीत कुडकुडणारी ही काही उदाहरणे …
रेल्वे स्टेशन बाहेर रात्रभर उभे असणारे विक्रेते ग्राहकांची वाट बघणारे… ..
एकीकडे स्वेटर मफलर घालून बसणारे माझ्यासारखे आपण सगळे …किती थंडी पडली किती थंडी पडली याची चर्चा चहाच्या घोटाघोटाने करत राहतो.. तुलनात्मक थंडीचा अभ्यास करत राहतो..आणि दुसरीकडे ही माणसे की.. थंडी पडली म्हणून घरात बसण्याची चैन त्यांना परवडत नाही .त्यांना थंडीचा विचार न करता काम करावेच लागते..
कार्ल मार्क्स असे म्हणाला होता की माणसांच्या वाट्याला माणसांची दुःखी आली पाहिजेत ,जनावरांचे दुःख येऊ नये.. ही माणसे बघितल्यावर हे वाक्य हमखास आठवते.. या माणसांच्या वाट्याला माणसांची दुःख आली पाहिजेत यासाठी हे कसे करता येईल याचे उत्तर माझ्याकडे नाही पण ही माणसे बघून गलबलून येते….एवढे मात्र नक्की…घरातल्या मोलकरणीला गरम पाणी आणि जमले तर या माणसांना एक चहा, स्वेटर शक्य असेल तिथे देऊ या..
हेरंब कुलकर्णी

