संचेती हॉस्पिटलची 60 वर्षे पूर्ण भविष्य केंद्रित अद्ययावत ऑर्थोकेअर सुविधेचे व एआय इनोव्हेशन लॅब चे अनावरण

संचेती हॉस्पिटलची 60 वर्षे पूर्ण
भविष्य केंद्रित अद्ययावत ऑर्थोकेअर सुविधेचे व एआय इनोव्हेशन लॅब चे अनावरण
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 12/12/2025 :
भारतात आर्थोपेडिक केअर मध्ये सर्वांत विश्वसनीय संस्थांपैकी एक असलेल्या संचेती हॉस्पिटलची 60 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने भविष्यकेंद्रित उपक्रमांची घोषणा करण्यात आली.त्यामध्ये अद्ययावत ऑर्थोकेअर सुविधा, एआय इनोव्हेशन लॅब, एआय चलित डायग्नोस्टिक्स व रिहॅबिलिटेशन सुविधेमध्ये विस्तार, गरजू रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी मोबाईल ऑर्थोकेअर युनिटस आणि एआय ने प्रेरित सॅनबो मॅस्कॉटचे अनावरण या सर्व उपक्रमांचा समावेश आहे.
पद्मश्री,पद्मभूषण व पद्मविभूषण डॉ.के.एस.संचेती यांनी या संस्थेची स्थापना 12 डिसेंबर 1965 ला केली. 10 बेडसच्या छोट्या रूग्णालयापासून ते दरवर्षी लाखो रुग्णांवर उपचार करण्याच्या क्षमतेपर्यंत रूग्णालयाने प्रवास केला आहे.मोबिलिटी इज डिग्निटी या तत्त्वाद्वारे संचेती हॉस्पिटलने अस्थिरोगशास्त्र,पुर्नवसन,संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणात आपला ठसा उमटवला आहे.
गेल्या 6 दशकांमध्ये हॉस्पिटलने सांधेरोपण,मणक्याचे उपचार,बाल अस्थिरोग शास्त्र,ट्रॉमा,स्पोर्ट्स मेडिसिन,ऱ्हुमॅटोलॉजी,न्युरो रिहॅबिलिटेशन आणि इतर उपशाखांमध्ये व्यापक सेवा परिसंस्था निर्माण केली आहे.भारत आणि भारताबाहेरील रूग्णांसाठी संचेती हॉस्पिटल हे गुंतागुंतीच्या अस्थिरोग परिस्थितीवर उपचारासाठी रेफरल सेंटर म्हणून नावलौकिक कमावले आहे.
सहा दशकांचा हा महत्त्वाचा टप्पा पार करत असताना संचेती ॲडव्हान्स्ड ऑर्थोकेअर हॉस्पिटल ही नवीन 150 बेडसची सुविधा सुरू करण्यात आली असून यामुळे पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय उपचार क्षमतेमध्ये विस्तार झाला आहे.या नवीन सुविधेमध्ये अद्ययावत निदान,बहुशाखीय उपचार, अद्ययावत रोबोटिक रिहॅबिलिटेशन आणि स्पेशालिटी क्लिनिक्सचा समावेश आहे.या नवीन सुविधेसह संचेती हॉस्पिटलची आता एकत्रित क्षमता 300 बेडसपर्यंत पोहचली आहे.
हा टप्पा गाठत असताना भविष्यातील वाटचालीसाठी संचेती आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग,संचेती एआय इनोव्हेशन लॅब आणि एआयएमडी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स एमडी) प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे.या परिसंस्थेमध्ये रूग्ण,अस्थिरोग तज्ञ,फिजिओथेरपीस्ट,भूलतज्ञ आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी समर्पित एआय टूल्स सादर करण्यात येणार आहेत.जेणे करून निदान, पुर्नवसनाची योजना,शिक्षण आणि वैद्यकीय निर्णयांमध्ये मदत होऊ शकेल.
संचेती हॉस्पिटल द्वारे नुकतेच अद्ययावत रोबोटिक रिहॅबिलिटेशन सुविधा सुरू करण्यात आली होती. या सुविधेद्वारे वेदना कमी करणे,हालचालींमध्ये सुधारणा,क्रीडा दुखापतींपासून बरे होणे आणि न्युरो रिहॅबिलिटेशन या सर्व गोष्टींमध्ये चांगले परिणाम दिसून येत आहेत.या तंत्रज्ञानामुळे रिहॅबिलिटेशन सेवा नव्याने परिभाषित झाली असून अचूक व शाश्वत परिणाम मिळत आहेत,असे मत संचेती हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ.दर्शिता नरवाणी यांनी व्यक्त केले.
संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग संचेती म्हणाले की, “60 वर्षे पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अभिनवता आणि करूणामय सेवा या तत्वावर संचेतीचा प्रवास यापुढेही सुरू राहील.एक नवीन अध्याय सुरू करत नवीन तंत्रज्ञान,सेवांमध्ये विस्तार याद्वारे आमच्या क्षमता अधिक वाढवत असून यामुळे अधिक रुग्णांना फायदा होईल.”

फोटो ओळ –
डावीकडून उजवीकडे – संचेती ॲडव्हान्स ऑर्थोकेअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.यशवंत शिवण्णा , विपणन व संपर्क विभागाच्या संचालक सौ.रूपल संचेती , संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती , संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एच.संचेती , ऍकेडेमिक रिसर्च डिव्हिजनचे (शैक्षणिक संशोधन विभाग) प्रमुख डॉ.अशोक श्याम, संचेती इन्स्टिट्युट फॉर ऑर्थोपेडिक्स ॲन्ड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख डॉ.लवनिश त्यागी आणि फिजिओ थेरपी विभागाच्या प्रमुख डॉ.दर्शिता नरवानी

