तुकडोजी बाबा तुमने, भारत जगा दिया था !

तुकडोजी बाबा तुमने, भारत जगा दिया था !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27/10/2025 :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक संत होते. ज्यांनी सामाजिक सुधारणांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शानदार भारताची स्वप्न पाहणारे राष्ट्रसंत हे एक द्रष्टे राष्ट्र प्रचारक असून युवक आणि सैनिक यांनी भारतमातेचे रक्षण करण्यासाठी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार राहावे असे महाराज म्हणतात. ते आपल्या भजनातून म्हणतात, “भारत शानदार हो मेरा । भारत शानदार हो मेरा । मै सेवक बलवान सिपाही । रहू देश को प्यारा ।।” राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी त्यांच्या खंजेरी भजनाने प्रभावित होऊन त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली.
तुकडोजी बाबा तुमने, भारत जगा दिया था ।
आवाज खंजडीका सबको, सुना दिया था ।।टेक।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यामुळे आणि विचारांनी देशाला जागृत केले. राष्ट्र उभारणीसाठी आणि सामाजिक व नैतिक मूल्यांसाठी जागृत राहण्याचे आवाहन केले होते. “राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा । जागृत व्हा तरुणांनो । आमुच्या वीर वृत्तीचा दिवा उजळवा ।।” तरुणांना वीर वृत्तीचा दिवा उजळवण्याचे, देशहिता करिता समोर येण्याचे आवाहन महाराज करतात. त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची जाणीव करुन दिली तसेच त्यांना कृती करण्याकरिता प्रेरीत केले. जसे- श्रीकृष्ण परमात्मा यांनी बासरी वाजवून सर्वांना मोहित केले, त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजेरीचा वापर करुन लोकांना मंत्रमुग्ध केले आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
आवाज था पहाडी, बाणी में तेज सारा ।
सेवा के बदले तुमने, वह पल-पल लगा दिया था ।।१।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आवाज पर्वतासारखा उंच होता आणि त्यांची बोली, आवाज खूप प्रभावी व तेजस्वी होता. त्यांच्या आवाजाने लोक भारावून जात असे. राष्ट्रसंतानी सेवेकरिता आपला प्रत्येक क्षण अन् क्षण कार्याकरिता लावला होता. त्यांनी सर्वांना मानवता धर्माची शिकवण दिली.
सुनके तुम्हारी बानी, घबडा गया था परका ।
उस क्रांती के ही बदले, तुमको अटक किया था ।।२।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनामुळे परका (अज्ञानी किंवा वाईट विचार करणारा व्यक्ती ) घाबरला होता. महाराजांच्या भजनातील सत्यता आणि उपदेश ऐकून भीती वाटत असे. आजही महाराजांचे भक्त मोठ्या श्रद्धेने भजने गातात. ही भजने समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाची सर्वांत पहिली दखल चिमूरमध्ये घेण्यात आली. चलेजाव आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते आणि त्यांच्या प्रेरणेने घडला. २८ आॕगष्ट १९४२ रोजी पोलीसांनी चंद्रपूर येथील स्थानिक भिवापूरच्या मारोती मंदिराला घेराव घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अटक केली. त्यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. त्यावेळी अनेक वृत्तपत्रांनी आवाज उचलला. सुमारे शंभर दिवसांनी महाराजांची सुटका झाली.
अब काहे को धूम मचाते हो ।
दुखवाकर भारत सारे ।
आते है नाथ हमारे ।
झाड झडुले शस्त्र बनेंगे ।
भक्त बनेंगी सेना ।
पत्थर सारे बाॕम्ब बनेंगे ।
नाव लगेगी किनारे ।।
हे भजन खंजेरीवर गातांना राष्ट्रसंतानी आँगष्ट क्रांती आंदोलनातून स्वातंत्र्याचा संदेश सर्वदूर पोहचविला. चिमूरचे सारे लोकं भारावून गेले. त्यातूनच स्वातंत्र्यासाठी भारतीयांची मने पेटून उठली. महाराजांची ही भूमिका स्वातंत्र्य लढ्यात मोलाची ठरली. १९६२ मध्ये चिनने भारतावर आक्रमक केले त्यावेळी राष्ट्रसंत सहाय्याकरिता धावून गेले. महाराज युद्ध सिमेवर गेले आणि भजने गाऊ लागले. “आवो चिनीओ मैदानमें । देखो हिंद का हाथ ।।” या अमोघ वाणीने केवळ सैनिकच नव्हे तर देश ही खडबडून जागा झाला. १९६५ मध्ये पाकीस्तानने भारतावर हल्ला केला त्यावेळी राष्ट्रसंत धावून गेले. भारत पाकीस्तानच्या सरहद्दीवर त्यांनी खंजेरीवर थाप दिली. “उठो जवानो करके बताओ । कहनेके दिन गये ।।” पाहता पाहता सैनिकांची सरशी झाली. पाकीस्तान पराभूत झाला.
कहता है दास पुरी, वह कीर्ती अमर तुम्हारी ।
सत् धर्म को बढाने, अवतार तो लिया था ।।३।।
दास पुरी म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ख्याती किंवा प्रसिद्धी कधीही कमी होणारा नाही कारण त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देते आणि त्यांचे साहित्य आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी केवळ आध्यात्मिक संत म्हणून नव्हे तर एक महान समाज सुधारक म्हणूनही कार्य केले. त्यांची मराठी, हिंदी हजारो भजने तसेच त्यांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची संहिता आहे. राष्ट्रसंताचा सत् धर्म केवळ देवपूजा नसून तो सत्याचा आचार, न्यायाचा व्यवहार आणि तत्त्वाचा विचार यावर आधारित आहे. हा धर्म म्हणजे मानवता धर्म, राष्ट्रहित, समाजहित आहे. त्यांनी सर्वधर्मातील लोकांमध्ये प्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रसंत म्हणतात, अवताराचे कार्य सर्वांनीच केले पाहिजे. “अवताराचे कार्य कराया । वेळच अजुनी उरला का?” हे विश्व आपले घर आहे असे समजून सर्वांना प्रेम द्या आणि निस्वार्थ भावनेने कार्य करा. वेळ न घालवता, आत्ताच हे काम करा.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677

