जागतिक विस्मरणाचा दिवस आणि आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.
जागतिक विस्मरणाचा दिवस आणि आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 21/09/2025 :
आज 21 सप्टेंबर. हा दिवस दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध. एक जागतिक अल्झायमरदिन म्हणजेच विस्मरणाचा दिवस आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.
अल्झायमर ही खरं तर काही रुग्णांना शाप तर काहींना वरदान ठरणारी व्याधी. ह्या रोगाचे नैसर्गिक प्रगटीकरण पन्नाशी नंतर हळूहळू सुरुच होतं. ह्या विस्मरणाची सुरवातच मुळी नेमक्या हव्या असलेल्या वेळी व्यंक्तींची, पदार्थांची, गावांची नावे विस्मरणा पासून होते.
ह्या विषयावरच असलेला डॉ. मोहन आगाशे व अमृता सुभाष ह्यांचा “अस्तु”हा चित्रपट आठवला कथानक आणि दिग्गज कलाकार ह्यांघ्यामुळे अप्रतिम कलाकृती आकारास येते हे ह्या चित्रपटामुळं कळतं.
ही व्याधी जडल्यानंतर खरी परिक्षा ही रुग्णाची नसून त्याच्या घरच्यांची, त्याला सांभाळून घेणाऱ्या त्याच्या जवळच्या लोकांची असते. त्यांना ह्या कठीण परिस्थितीचा शांतपणे सामना करणं सोपं नसतं हे पण खरं. तरीही त्यांनी शांतपणे ह्यातून मार्ग काढावा कारण आज ना उद्या थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच ह्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
हा विसराळूपणा काही जणांची परिस्थिती अवघड करतो तर काही वेळा हा विस्मरणाचा बहाणा आपल्या घरची पुरुष मंडळी आणि त्यांची निरागस बालके ह्यांच्या पथ्थ्यावरच पडतो.
आज दुसरे दिनविशेष म्हणजे आतंरराष्ट्रीय शांतता दिवस. शांतता हा शब्द सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा. ही फेज आयुष्यात निरंतर लाभावी म्हणून बरेच जण प्रयत्नशील असतात. ही शांतता लाभावी म्हणून काही आपल्या स्वभावात बदल करतात. काही आध्यात्मिक उपायांचा अवलंब करून बघतात. ही शांतता जशी वैयक्तिक जीवनात आवश्यक आहे तशीच ती आपल्या देशात सुध्दा नांदावी असं प्रत्येक नागरिकांना मनोमन वाटतं. कुठलेही कार्य, कृती यशस्वी करण्यासाठी शांत परिस्थिती, शांत मनस्थिती असणे अत्यावश्यक असते.
तर ह्या शांतता दिनी आपल्याला शांतता लाभावी ही परमेश्वराजवळ प्रार्थना करुन आजच्या पोस्ट ची सांगता
कल्याणी बापट (केळकर) 9604947256
बडनेरा, अमरावती