बीड जिल्हाच वास्तव अंगावर काटा आणणारे

बीड जिल्हाच वास्तव अंगावर काटा आणणारे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 4 जानेवारी 2025 :
शासकीय पातळीवर जर कोणा कामचुकार व भ्रष्ट अधिकाऱ्यांना काळया पाण्याची शिक्षा द्यायची असेल किंवा दंडात्मक कारवाई अंतर्गत बदली करायची असेल तर त्याला यापूर्वी गडचिरोलीची भिती दाखवली जायची त्यामुळे त्याची तेथे बदली करण्यात येत असे , पण आजच्या काळात गडचिरोली हे नाव कधीच मागे पडून त्याची जागा बीड जिल्हाने घेतली कारण इथे दळणवळण सर्व काही आलबेल असले तरी रुतबा मात्र जागोजागी पोसलेल्या गावगुंडांचा आहे त्यामुळे ही बीडला लागलेली कीड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमस्वरूपी मुळासकट संपुष्टात आणणार का ॽ का पुन्हा एकदा नव्याने नवीन वाल्मीक कराडचा धुडगूस चालू राहणार हे लवकरच लक्षात येईल .
महाराष्ट्रात केवळ बीड जिल्ह्यातचं वाल्मीक कराडची पैदास नाही तर ती पैदास प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात आहे कारण असे वाल्मीक आमदार व खासदार यांच्या अवतीभवती असतात म्हणण्यापेक्षा ती त्यांची गरज आहे , कारण सत्तेत राहण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी अशा बदफैली वाल्मिकींची गरज असते मग त्यातून पैसा आणि पुढे सत्ता असे अनंत काळ चालणारे चक्र अबाधित राहते , पण अडचण एकच असते ती अशी की जर अशा वाल्मीकांचा वारू बीड सारखा चौफेर उधळू लागला तर त्यांच्या पोशिंद्याची भलतीच अडचण होते मग त्यातून पहिल्या वाल्मीकाची कायमची जिरवण्यासाठी दुसऱ्या वाल्मीकाचे बारसे घालणे अनिवार्य ठरते .
तर असो बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशाला परिचित आहे कारण या जिल्ह्यात तब्बल पाच लाख कामगार ऊस तोडणीची कामे करतात आणि ही कामे केवळ वर्षातील सहाच महिने चालतात मग उरलेल्या सहा महिन्यांत या कामगारांना पोटाची खळगी भरण्यासाठी पुढाऱ्यांच्या म्हणजे त्यांच्या गावच्या टोळीच्या मुकादमाच्या दावणीला बांधले जाते मग त्यातून तब्बल दोनशे एकरात गांजाची लागवड केली जाते आणि त्या ज्वारीचे पीक म्हणून तलाठी नोंद करतो मग हे काय कमी म्हणून खंडणी , खून , बलात्कार , अफरातफर अशा अनेक अवैध धंद्याचा नुसता सुळसुळाट सुरू असतो , मागील वर्षी या जिल्ह्यात तब्बल बत्तीस खून झालेत की ज्याची पोलिस दप्तरी नोंद झाली आहे आणि ज्या खूनाची नोंद झाली नाही अशांची संख्या काय असेल हे सर्व अनाकलनीय आहे कारण पोलिस प्रमुखच वाल्मीकला विचारून आपला दीनक्रम ठरवत असतो त्यामुळे पोलिस ठाणी ही नावापुरती असतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही अहो जेथे पोलिसच कुंपण खात असतील तर तेथील नागरिकांनी कोणाकडे जायचे अशी वस्तुस्थिती आहे , कारण याच जिल्ह्यात गर्भपाताचा बादशहा डॉ.सुदाम मुंडे व त्याची पत्नी डॉ .सरस्वती मुंडे यांचा तब्बल तीस वर्षे प्रिंटेड वैद्यकीय प्रिक्सिपशनसह हैदोस चालू असतो तिथे दुसरे घडणार तरी काय ? , तर या दाम्पत्याचा बुरखा सन – २०१२ ला फाटला तो पटवेकरी नावाची सात महिन्याची गरोदर महिला मुंडेच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया म्हणजे गर्भपात करताना दगावली त्यामुळे तेथील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे रुग्णालय सिल केले व डॉ.मुंडेची संपत्ती जप्त केली त्यावेळी या मुंडे दाम्पत्याला शरण यावे लागले , त्यानंतर जिल्हा पातळीपासून सर्वोच्च न्यायालयाने देखील यांना आजपर्यंत जामीन दिला नाही कारण या रूग्णालयात मागील तीस वर्षे केवळ आणि केवळ फक्त गर्भपातच केले जात होते आणि तेही रितसर बघा या मुंडेंची इतकी दहशत मग त्यामागे राजाश्रय असणार नाही तर दुसर काय ? विशेष म्हणजे हा डाॅ .मुडे ज्यावेळी पॅरोलवर काही दिवस बाहेर आला त्यावेळी सुद्धा याने स्वतःच्या मुलीच्या रुग्णालयात गर्भपात करण्याचा पराक्रम केला इतका तो चटावलेला व निर्ढावलेला डॉक्टर नसून कसाई होता.
बीडची वानगीदाखल अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत त्यांपैकी सध्याचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा पराक्रम तर अचंबित करणारा आहे कारण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी शासनाने ऑन लाईन पद्धत अवलंबली होती त्यामुळे तेथील तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुट्टीचा शनिवार गाठून एका सभागृहात शिक्षकांच्या उपस्थितीत त्यांच्या सोयीसाठी बदल्यांचा घाट घातला त्यावेळी अचानक धस नावाचे आमदार त्यांच्या गलेलठ्ठ कार्यकर्त्यांसह अवतरले व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत लॅपटॉप व इतर साहित्य घेऊन पलायन केले याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली त्यावेळी त्यांनी संबंधितांना शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांत तक्रार दाखल करायला सांगितली मग शिक्षणाधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली म्हणून त्यांनी तब्बल महिनाभर धूम ठोकली , मग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली पण त्यांना देखील पोलिस निरीक्षकाने तीन तास लटकत ठेवले कालांतराने पोलिस प्रमुखांना त्याची दखल घ्यावी लागली त्यात पुन्हा दुसऱ्या आमदारांनी संबंधितांना दमदाटी केली तो वेगळाच भाग .
दुसऱ्या एका प्रकरणात परळीतील वीज केंद्रातील अभियंत्याला सातत्याने मनासारखे काम केले जात नाही म्हणून त्याची पाठ सुजवली जात होती म्हणून त्याने जिल्हाधिकाऱ्यांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना ढसाढसा रडत मागितला तेंव्हा तो परवाना मिळाला खरा पण त्याने बंदुकीच्या गोळ्या झाडल्या का ॽ हे अजून गुलदस्त्यातच आहे , तर सन -२०१२ मध्ये एका तलावात बारा अर्भक सापडली तो तर विषय वेगळाच आहे हे काय कमी म्हणून शासकीय वेळेत तेथील जिल्हा परिवहन कार्यालयाला दिवसाढवळ्या कुलुप लावून संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून आपल्या कार्यालयात फक्त चारच कर्मचारी आहेत त्यामुळे कामच करता येत नाही अशी कैफियत मांडण्यासाठी आले होते , कारण जो उठतो तो कर्मचारी वर्गाला कायमचं फैलावर घेत असतो मग कर्मचारी नोकरी गेली तरी चालेल कारण त्यांना जीव महत्त्वाचा वाटतो तर अशा एक ना अनेक घटना वर्षानुवर्षे घडत आहेत त्यामुळे या जिल्ह्याला अजितदादा पवार यांच्यासारख्या खमक्या पालकमंत्र्यांची गरज आहे अन्यथा यापुढे येथील कारभार रामभरोसे असेल यात काही शंका नाही .
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक