आर्मेनियन नरसंहार – विस्मृतीत गेलेलं कटू सत्य
आर्मेनियन नरसंहार – विस्मृतीत गेलेलं कटू सत्य
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे,
अकलूज दिनांक 15/05/2025 :
मी आर्मेनियन नरसंहाराबद्दल प्रथम ऐकलं, ते शाळा-कॉलेज मधल्या एखाद्या लेक्चर मध्ये किंवा इतिहासाच्या पाठयपुस्तकातून नव्हे, २००७ साली एका फिल्म फेस्टिवल मध्ये पाहिलेल्या एका इटालियन सिनेमातून.
द लार्क फार्म.
एक मन हेलावून टाकणारी, अंतर्बाह्य हलवून टाकणारी कलाकृती—ज्यात एका आर्मेनियन कुटुंबाच्या वाताहातीची कहाणी दाखवलेली होती. तुर्कस्तानच्या अनातोलीया नावाच्या प्रांतात हजारो आर्मेनियन ख्रिस्ती लोकांची वस्ती होती एकेकाळी. पिढ्यांपिढ्यांपासून ते लोक तुर्कस्तान मध्ये राहत होते, तिथली भाषा बोलत होते, तिथल्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहत होते. समस्या एकच होती, ते धर्माने ख्रिस्ती होते आणि तुर्कस्तानचे ऑटोमन राज्यकर्ते कट्टर, धर्मांध मुसलमान.
द लार्क फार्म ह्या चित्रपटातलं एक भयावह दृश्य कायम माझ्या स्मृतीत कोरलं गेलंय. साधारण पहिल्या महायुद्धाच्या आसपासचा काळ. चित्रपटाच्या कहाणीत एका आर्मेनियन लोकांमधल्या सर्व पुरुषांना, अगदी लहान बाळांना देखील अतिशय क्रूरपणे मारून टाकलं जातं आणि सर्व वयाच्या सर्व स्त्रियांना जनावरांच्या कळपासारखा हाकत हाकत सीरियाच्या वाळवंटाकडे चालवलं जातं. ह्या स्त्रियांमध्ये एक गरोदर, दिवस अगदी भरायला आलेली बाई असते. तिच्या डोळ्यांदेखत तिने तिच्या नवऱ्याचा, सासऱ्याचा, दिराचा, पुतण्याचा, मोठ्या मुलाचा अतिशय क्रूर, हालहाल करून झालेला मृत्यू पाहिलेला असतो. ती सारखी प्रार्थना करत असते की तिला मुलगी व्हावी, मुलगा नको. दुर्दैवाने तिला मुलगाच होतो. तिच्या हातात तिचं नवजात बाळ असतानाच तिच्या बरोबरची दुसरी एक बंदिनी तिला सांगते—“तुर्क तुझ्या बाळाचं काय करणार, हे सांगणंही अशक्य आहे.” तुर्कांनी आधी इतर बाळांचं काय केलं होतं हे त्या सर्व स्त्रियांनी पाहिलेलं असतं. एखाद्या बाळाचं डोकं भिंतीवर आपटून त्याला मारलेलं असतं तर कोणाला जिवंत पेटवून दिलेलं असतं. त्या क्षणी ती आई एक हृदयद्रावक निर्णय घेते आणि इतर स्त्रियांच्या मदतीने आपल्या बाळाला कपड्यात गुदमरवून त्याचा जीव घेते, त्या कोवळ्या जीवाने तुर्कांच्या हातून नरकयातना भोगू नयेत म्हणून.
ते दृश्य मला आजही तसंच्या तसं आठवतंय. सिनेमात ते विदारक दृश्य पाहिल्यानंतर मी काही क्षण श्वासही घेऊ शकले नव्हते. आधी मला वाटलं, हे नाट्यमय असेल. सिनेमॅटिक अतिशयोक्ती असेल. पण माझ्या स्वभावानुसार घरी गेल्यावर मी आर्मेनियन नरसंहार ह्या विषयाचा अभ्यास केला. शोध घेतला. त्या बद्दल वाचलं आणि खूप रडले.
कारण सत्य सिनेमाच्या कल्पनेहून कैक पटीने भयानक होतं. १९१५ ते १९२३ ह्या आठ वर्षांच्या काळात १५ लाखांहून अधिक आर्मेनियन ख्रिश्चन नागरिकांचे ऑटोमन तुर्कांनी व्यवस्थित आखलेल्या प्लॅननुसार शिरकाण केले होते. आर्मेनियन पुरुषांना एका ओळीत उभं करून गोळ्या घालण्यात आल्या. आर्मेनियन स्त्रियांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. लहान मुलांना डोंगरकड्यांवरून फेकण्यात आलं, जिवंत जाळण्यात आलं, गावोगावीच्या चर्च जाळण्यात आल्या. लाखो लोकांना अन्न-पाण्याशिवाय सीरियन वाळवंटात हाकत नेऊन उपासमारीने मारण्यात आलं. आर्मेनियन स्त्रियांवर बलात्कार करून त्या ख्रिस्ती होत्या म्हणून त्यांना सीरियन वाळवंटात क्रुसावर टांगण्यात आलं. जवळजवळ दोन लाख आर्मेनियन स्त्रिया आणि मुलांना जबरदस्तीने मुसलमान बनवून त्यांना टर्कीमध्ये मुसलमान घरांमध्ये गुलाम म्हणून ठेवण्यात आलं.
हे युद्धातले मनुष्यवध नव्हते, हा एका संस्कृतीच्या, धर्माच्या मुळावर उठलेला अतिशय क्रूर नरसंहार होता. पण आजही तुर्कस्तान हे सगळं नाकारतो. तिथल्या कायद्यानुसार कुणी ‘आर्मेनियन नरसंहार’ हा शब्द जरी टर्की मध्ये उच्चारला तरी, तिथल्या कायद्यांतर्गत त्यांना पोलीस उचलून घेऊन जाऊ शकतात, तुरुंगात टाकून त्यांचा अनन्वित छळ करू शकतात.
तरीही, जगात काही देश सत्याशी प्रामाणिक राहिले आहेत.
जगभरातल्या ३४ देशांनी आर्मेनियन नरसंहाराला अधिकृत मान्यता दिली आहे—फ्रान्स, रशिया, कॅनडा, जर्मनी, आणि अलीकडेच अमेरिका. भारताला जर टर्कीला धडा शिकवायचा असेल तर भारताने आर्मेनियन नरसंहाराला अधिकृत मान्यता द्यावी.
अजून एक गोष्ट, जेव्हा तुर्कस्तान मध्ये हे सर्व घडत होतं, लाखो पुरुष मारले जात होते, लाखो आर्मेनियन बायकांवर बलात्कार होत होता, त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची बाळं पेटवून दिली जात होती, अगदी बरोबर त्याच कालखंडात, आपले भारतीय अहिंसेचे पुजारी मोहनदास करमचंद गांधी ‘तुर्की खलीफत’ वाचवण्याचा प्रयत्न खिलाफत चळवळी द्वारे करत होते. खिलाफत चळवळीचा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता, तरीही गांधी आणि मौलाना आझाद त्याच तुर्की ऑटोमन खलिफाला वाचवायचा प्रयत्न करत होते जी या नरसंहारामागची शक्ती होती.
हो तेच तुर्की सरकार, ज्यांनी लाखो लोकांना अन्नपाण्याविना वाळवंटात शेकडो मैल चालायला भाग पाडलं. तेच खलीफा, ज्यांच्या आदेशानुसार आर्मेनियन ख्रिश्चन धर्मगुरूंना सार्वजनिक चौकात जिवंत जाळण्यात आलं.
आजही, ह्या कटू सत्यांकडे आपण डोळेझाक करतो. भारतीय शालेय पाठ्यपुस्तकांमधून खिलाफत चळवळीचे आजही आपण गोडवे गातो पण आर्मेनियन नरसंहाराबद्दल एक शब्दही आपण उच्चारत नाही.
बाकी आर्मेनियन सोडूनच द्या, भारतात इतकी शतके मुसलमानी शासकांनी हिंदूंचा नरसंहार केला, त्याबद्दल तरी आपण कुठे बोलतोय? आपलं सेक्युलरिझम म्हणजे विस्मृती. पण जग आर्मेनियन लोकांना विसरलेलं नाही. दरवर्षी २४ एप्रिलला जगभरातील आर्मेनियन वंशाचे लोक त्यांच्या मृतांचं स्मरण करतात. शोक करण्यासाठी नाही, तर विसाव्या शतकातल्या पहिल्या मोठ्या वांशिक आणि धार्मिक नरसंहाराची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी. धर्माच्या नावाखाली टर्कीच्या इस्लामी शासकांनी आर्मेनियन लोकांसोबत जे केले ते जगाला कळावे म्हणून.
आणि टर्की? तो देश आज केमाल अतातुर्कच्या प्रगतिवादी विचारांना विसरून परत एकवार इस्लामी कट्टरतेची कास धरतोय. पाकिस्तानला ड्रोन पुरवतोय. दहशतवाद्यांना पाठिंबा देतोय. पण त्याचबरोबर, भारतीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर्सना फुकट टर्कीला यायचे आवताण देतोय.
हो, जा… स्वतःचा आत्मा विकून टर्कीला नक्की जा
पण तिथल्या सुंदर ठिकाणांवर सेल्फी काढताना
हे जरूर लक्षात ठेवा की ज्या भूमीवर तुम्ही हे करताय, ती भूमी आर्मेनियन रक्ताने ओथंबलेली आहे आणि पहलगाम मध्ये धर्म बघून गोळ्या घातलेल्या त्या २६ निष्पाप हिंदू प्रवाश्यांच्या रक्तानेसुद्धा!
— शेफाली वैद्य