
♦️💢 संपूर्ण जगाला कर्ज देणाऱ्या
IMF कडे पैसा कुठून येतो ?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 30/5/2025 :
IMF (International Monetary Fund) म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आज IMF खूप चर्चेत आहे, कारण IMF ने पाकिस्तानसाठी १ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मंजुरी दिली. भारत देश पाकिस्तान मधील दहशतवाद विरुद्ध कारवाई करत असताना IMF ने हे कर्ज मंजूर केले. IMF ची स्थापना १९४४ मध्ये ४४ देशांनी केली. आज त्याच्या सदस्यांची संख्या १९१ पर्यंत आहे.
संपूर्ण जगाला कर्ज देणाऱ्या IMF कडे पैसा कुठून येतो? IMF ला तीन स्रोतांकडून पैसे मिळतात. प्रथम- सदस्य कोटा. दुसरे- व्याज उत्पन्न. तिसरे- एनएबी आणि बीबीए. IMF कडे येणाऱ्या पैशाचा प्राथमिक स्रोत सदस्य कोटा आहे. सदस्य कोटा ही एक प्रकारची फी आहे, जी सदस्य देशाला सदस्यत्वासाठी भरावी लागते. याला सदस्यता शुल्क असे म्हणता येईल. एखाद्या देशाचा कोटा त्याच्या आकार आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थितीनुसार निश्चित केला जातो. हे त्या देशाची मतदान शक्ती ठरवते. जेव्हा IMF कोणत्याही देशाला कर्ज देते, तेव्हा ते त्यावर व्याज देखील मिळवते.
याशिवाय, गरज पडल्यास IMF इतर देशांकडून कर्ज देखील घेते. याला न्यू अरेंजमेंट्स टू बोर (एनएबी) म्हणतात. जर IMF सदस्य देशाकडून कर्ज घेत असेल, तर त्याला द्विपक्षीय कर्ज करार (BBA) म्हणतात. १९९३ पासून भारताने IMF कडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही. IMF आपल्या सदस्यांना ३ स्वरूपात कर्ज देते. हे जलद वित्तपुरवठा व्यवस्था, विस्तारित निधी सुविधा आणि स्टँडबाय व्यवस्था आहेत. याच्या वेगवेगळ्या अटी आहेत. जर कर्ज घेणाऱ्या देशाने अटी मान्य केल्या, तर कर्ज वाटप प्रक्रिया सुरू होते. IMF चे सर्वात मोठे कर्जदार देश अर्जेंटिना, युक्रेन, इजिप्त आणि पाकिस्तान आहेत.
सौजन्य : तरुण भारत नागपूर
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण