ताज्या घडामोडी

आजचा कळीचा प्रश्नः जातीअंत की जाती पुरूज्जीवन? (भाग-4)

आजचा कळीचा प्रश्नः जातीअंत की जाती पुरूज्जीवन?

(भाग-4)

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 19/5/2025 :
(चेन्नई, तामीळनाडू येथे 1मे 22 रोजी संपन्न झालेल्या सामाजिक न्याय परीषदेत निमंत्रित वक्ते प्रा. श्रावण देवरे यांचे भाषण झाले. या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद लेखस्वरूपात देत आहोत. कार्यक्रमात वेळेचं बंधन असल्याने भाषण संक्षिप्तच करावे लागते. मात्र अनेक हिचिंतकांनी विनंती केली की, हे भाषण लेखस्वरूपात सविस्तर लिहावे. त्यांच्या विनंतीवरून हे भाषण विस्तारीत केले असून आपल्या वाचकांसाठी सादर करीत आहे. – संपादक)
त्या काळात (1989) आम्ही मात्र आमच्या ताकदीच्यापरीने महाराष्ट्रातील धुळे-नंदुरबार जिल्ह्यात असा ‘‘अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्ष’’ उभा करण्याचा प्रयत्न केला. सुप्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील2 यांच्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातून सीता, शंबुक, ताटका, शूर्पणखां व एकलव्याच्या प्रतिकांच्या मिरवणूका काढून त्यांच्या गौरवार्थ जयजयकार व जिंदाबादच्या घोषणाही दिल्यात. तसेच या मोर्च्यात राम, कृष्ण, द्रौणाचार्य आदि ब्राह्मणी प्रतिकांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात. मोर्च्याच्या शेवटी शहरातील मध्यभागि असलेल्या राणा प्रताप चौकात सभा झाली व कॉ.शरद पाटील यांनी जनतेला मोर्चा काढण्यामागील उद्देश सांगीतला. कॉ. पाटील यांनी ऐतिहासिक पुराव्यांसकट राम-कृष्णाविरोधातील शंबुक, एकलव्य, कर्ण, सीता, ताटला, शुर्पणखां यांनी दिलेल्या सांस्कृतिक संघर्षाचा इतिहास जनतेसमोर मांडला. या मोर्च्याचे अनुकरण करून कांशीराम, आठवले, प्रकाश आंबेडकर, लालू-मुलायम, भुजबळ यासारख्या राष्ट्रीय दलित-ओबीसी नेत्यांनी त्या काळात (1989-90) देशव्यापी आंदोलन उभे केले असते तर 2014 साली संघ-भाजपाची ब्राह्मणी प्रतिक्रांती झाली नसती व या दलित-ओबीसी नेत्यांवर आज भाजपाचे ‘‘सालदार’’ बनण्याची पाळी आली नसती.
जातीअंतासाठी सांस्कृतिक संघर्षाचा सिद्धांत सर्वात प्रथम मांडला तो तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी! देशाच्या इतिहासाची पुनर्मांडणी करतांना तात्यासाहेब म्हणाले- ‘बळीराजाच्या पतनानंतरचा भारत देशाचा इतिहास ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाचा इतिहास आहे’ त्याच वेळी युरोपमध्ये कार्ल मार्क्स नावाचा क्रांतिकारक तत्वज्ञानी जगाच्या इतिहासाची पुनर्मांडणी करतांना म्हणतो- ‘‘प्राथमिक साम्यवादी गण समाज नष्ट झाल्यानंतर जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा आहे.’’ मार्क्सचा ‘‘द्वंदात्मक ऐतिहासिक भौतिकावाद’’ हा सिद्धांत एकप्रवाही (वर्गवादी) आहे तर तात्यासाहेब महात्मा फुले यांनी सिद्ध केलेला ‘‘भारताचा ‘द्वंदात्मक ऐतिहासिक भोतिकवाद’’ हा बहुप्रवाही3 आहे. त्यासाठी त्यांनी दशावताराचे वैज्ञानिक विश्लेषण केले. दशावतार म्हणजे विष्णूने प्रत्येक युगात घेतलेले वेवगवेगळे अवतार होते. विष्णूने वेगवेगळ्या युगात एकूण दहा अवतार घेतल्याचे पुराण सांगतात. या प्रत्येक अवताराची कहाणी म्हणजे ‘ब्राह्मणी-अब्राह्मणी’ युद्धाचा इतिहास होय! ब्राह्मणांनी पुराण-इतिहासात लिहिलेल्या या दहा युद्धांमध्ये बहुजनांना पराभूत व ब्राह्मण अवतारांना विजयी दाखविले आहे. शेकडो वर्षांपासून हा इतिहास बहुजनांच्या मेंदूवर बिंबवला गेला व जाणीवेतून नेणीवेत गेला. त्यामुळे बहुजन समाज शेकडो वर्षांपासून आजपर्यंत ‘पराभूत’ मानसिकतेत जगतो आहे. तात्यासाहेबांनी संशोधन करून या इतिहासाचे पुनर्लेखन केले व भारताचा द्वंदात्मक ऐतिहासिक भौतिकवाद सिद्ध केला.
रामाच्या विरोधात शंबूक-रावण, द्रौणाचार्य, परशूराम व कृष्णाच्या विरोधात कर्ण-एकलव्य अशाप्रकारे प्रतिकांचा सांस्कृतिक संघर्ष त्यांनी मांडला. भावी काळात कोण्या एखाद्या ब्राह्मणाने शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मण-प्रतिपालक’ बनवून त्यांचे ब्राह्मणीकरण करू नये म्हणून तात्यासाहेबांनी 35 पानी प्रदिर्घ ऐतिहासिक पोवाडा लिहून शिवाजी महाराजांना आधीच ‘‘शूद्रादिअतिशूद्र ‘रयतेचा राजा’ म्हणून सिद्ध करून ठेवले. भावी काळात भाद्रपद महिन्यात ढेरपोट्या ब्राह्मणी गणपतीचे स्तोम माजवून क्रांतिकारक बळीराजाचे व पितृपक्षाचे महत्व कमी केले जाऊ शकते, अशी शक्यता लक्षात घेउन तात्यासाहेबांनी आधीच विविध ग्रंथांमधून भाद्रपद महिन्यातील पितृपक्ष व या पितृपक्षात आर्य-वामनाच्या विरोधात बळीराजाने पुकारलेल्या महाभारतीय युद्धाचा इतिहास लिहून ठेवला. पितृपक्ष, श्राद्ध पक्ष, नवरात्रौत्सव, भंडारा, दसरा, बलीप्रतितदा (दिवाळी) आदि ब्राह्मणविरोधी रूढी-परंपरा4 व त्यामागील बहुजनांचा क्रांतिकारक इतिहास तात्यासाहेब महात्मा फुले यांनी लिहून ठेवला. असा सांस्कृतिक संघर्ष इतिहासाच्या व पुराणांच्या पानापानावर आपणास दिसतो. त्याची सूत्रबद्ध ऐतिहासिक मांडणी तात्यासाहेबांनी व बाबासाहेबांनी करून ठेवलेली आहे. जेणे करून बहुजनांच्या भावी पीढ्या या इतिहासातून सांस्कृतिक संघर्षाची प्रेरणा घेतील व जातीअंताची लढाई सुरू ठेवतील, अशी साधी अपेक्षा तात्यासाहेब व बाबासाहेबांनी बाळगली होती.
परंतू फुले-आंबेडकरांच्या अनुयायांना त्यांच्या आरक्षणाच्या सिद्धांतापलिकडे काही दिसतच नाही. कारण आरक्षणामुळे चांगल्या नोकर्‍या व सुंदर छोकर्‍या मिळतात. सुंदर बायको, लाडकी पोरं, महागडी गाडी, प्रशस्त विशाल बंगला या पलिकडे तात्यासाहेब-बाबासाहेब आणखी बरेच काही सांगून गेले आहेत, हे अनुयायांच्या ध्यानी-मनीसुद्दा नाही. अर्थात अनुयायांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही कारण त्यांच्या दलित-ओबीसी नेत्यांनी फुले-आंबेडकरांना ब्राह्मण-मराठ्यांच्या दारात गहाण ठेवले आहे. ब्राह्मणी छावणी मात्र सातत्याने या अशा एकतर्फी सांस्कृतिक संघर्षातून विजयी होत आली आहे आणी अब्राह्मणी छावणी मात्र या सांस्कृतिक संघर्षाच्या अभावात पराभूततेचे जीवन जगत आली आहे. फुले-आंबेडकरांनी बहुजनांना सतर्क केल्यानंतरही ब्राह्मणी छावणी संपूर्ण देशाचे ब्राह्मणीकरण करण्यात यशस्वी झालेली आहे.
तामीलनाडू मात्र याला अपवाद आहे. सामी पेरीयार यांच्या नेतृत्वाखालील 1925 पासून सुरू झालेली सांस्कृतिक चळवळ 1967 साली राजकीय क्रांतीत यशस्वीपणे परावर्तित झाली. याची सुरूवात सामाजिक चळवळीपासून झाली. 1916 साली तत्कालीन ओबीसी नेते डॉ. सी नतेशा मुदलियार, पी. थेगाराया चेट्टी व टी. एम. नायर यांनी जस्टीस पार्टीची स्थापना केली. या पार्टीचा मुख्य अजेंडा होता- ‘‘सर्व नॉन-ब्राह्मीण जाती-धर्माच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळविणे.’’ आदिवासी, अस्पृश्य, ब्राह्मणेतर जाती (म्हणजे आजच्या ओबीसी जाती), मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत आदि सर्व नॉन-ब्राह्मीण जाती-धर्मात येतात. 1919 सालापासून मॉंटेंग्यु चेम्सफर्ड सुधारणा अमलात आल्यानंतर प्रांतिक असेंब्ली स्थापन करण्यासाठी 1920 साली निवडणूका घेण्यात आल्यात. या पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीत जस्टीस पार्टी बहुमताने विजयी झाली व मद्रास प्रांतात पहिले सरकार जस्टीस पार्टीचे स्थापन झाले. देशाच्या इतिहासात पहिले ओबीसी-बहुजन सरकार मद्रास प्रांतात अवतरले. अकाराम सुब्बारॉयलू रेड्डी हे पहिले ओबीसी मुख्यमंत्री झालेत. सरकार स्थापन होताच जस्टीस पार्टीने 16 सप्टेंबर 1921 रोजी आरक्षणाचा कायदा मंजूर केला. या कायद्याप्रमाणे 44 टक्के आरक्षण ब्राह्मणेतर (ओबीसी) जातींना देण्यात आले. 16 टक्के आरक्षण ब्राह्मण जातींना, 16 टक्के मुस्लीम, अँग्लो इंडियन्स, आदि-द्रविड व ख्रिश्चन धर्मियांना देण्यात आले. 8 टक्के आरक्षण अस्पृश्य जातींना देण्यात आले. मात्र या आरक्षण कायद्याला कोर्टाकडून त्वरीत स्थगिती आली. गर्भ धारणा होण्याआधीच गर्भपात घडवून आणण्यात ब्राह्मणांना यश आले.
(अपूर्ण) क्रमशः

वक्ते- प्रा. श्रावण देवरे,
नाशिक, महाराष्ट्र

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button