आजचा कळीचा प्रश्नः जातीअंत की जाती पुरूज्जीवन?

आजचा कळीचा प्रश्नः जातीअंत की जाती पुरूज्जीवन?
(भाग2)
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे.
अकलूज दिनांक 11 मे 2025 :
रामंदिराचे ब्राह्मणी अस्त्र व मोदी नावाचा ओबीसी मुखवटा या दोन कारणास्तव 2014 साली अखिल भारतीय पेशवाईची ब्राह्मणी प्रतिक्रांती झाली. संघभाजपाचे लुटेरे आजही मोदी नावाचा ‘‘ओबीसी मुखवटा’’ लावून अखिल भारतीय ओबीसी वोटबँक लुटत आहेत व आजही सत्तेत येत आहेत. भाजप आणि ओबीसी यांच्यातील नाते राजकीय नाही, सांस्कृतिक आहे. त्यामुळे केवळ भाजपाविरोधी राजकीय भुमिका घेऊन काही उपयोग नाही. जोपर्यंत ओबीसींवर ब्राह्मणवादी संस्कृतीचा प्रभाव आहे तोपर्यंत ओबीसी आणि भाजपमधील नाते अतूट आहे. जेव्हा हे नाते तुटेल तेव्हा ओबीसी भाजपच्या बंदिवासातून मुक्त होतील आणि ते गैर-भाजप पक्षांकडे येतील. आणि हे नाते तोडण्यासाठी तुम्हाला ओबीसींना त्यांच्या स्वतःच्या अ-ब्राह्मणी संस्कृतीची ओळख करून द्यावी लागेल. संघ-भाजपाच्या विरोधात केवळ राजकीय-सामाजिक लढाई करून काहीही उपयोग नाही. सांस्कृतिक संघर्ष केला तरच ओबीसी मतदार कॉंग्रेसच्या इंडिया आघाडीला सतेवर बसवतील. सामाजिक व राजकिय संघर्ष जेवढ्या लवकर यशस्वी होतात, तेवढ्याच लवकर ते अपयशी होतात. सांस्कृतिक संघर्ष प्रदिर्घ असतो परंतू तो आपल्या पक्ष-संघटनांना मूळापासून मजबुत बनवतो व सामाजिक-राजकिय लढ्याचा मार्ग सूकर करतो.
हे सर्व वास्तव डोळ्यासमोर दिसत असूनही या देशातील डावे, समाजवादी, पुरोगामी-सेक्युलर व फुले-आंबेडकरवादी झोपेचं सोंग घेउन पडलेले आहेत. देशाच्या एकूण मतदारांपैकी 50 टक्केपेक्षा जास्त मतदार ओबीसी जातीतून येतात. देशाच्या सर्वंकष सत्तेच्या तिजोरीची चावी हमखासपणे या ओबीसी वोटबँकेच्या लॉकर मध्ये आहे आणी ही बोटबँक संघ-भाजपाच्या नजर-कैदेत आहे. या ओबीसी वोटबँकची सुटका संघ-भाजपाच्या तावडीतून करायची असेल तर विरोधी पक्षांनाही पर्यायी देशव्यापी आंदोलन उभे करावे लागेल व या आंदोलनाचे विषय असतील, ‘जातनिहाय जनगणना’, ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त करणे, ओबीसी आरक्षणातील तथाकथित क्षत्रीय जातींची (जाट, पटेल, मराठा जातींची) घुसखोरी कायद्याने बंद करणे व ओबीसी-बहुजनांचे ‘अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्षाविषयीचे’ प्रबोधन! परंतू असे काहीही न करता केवळ ओबीसींना व त्यांच्या नेत्यांना शिव्या देण्यापलिकडे डाव्या व पुरोगामी विरोधी पक्षांकडे कोणताही कार्यक्रम नाही. ओबीसींना शिव्या दिल्याने ते अधिकाधिक भाजपाकडे ढकलले जातात, एव्हढे कळण्याइकीही बुद्धी या डाव्या-पुरोगामी नेत्यांकडे शिल्लक राहीलेली नाही.
======================
(चेन्नई, तामीळनाडू येथे 1मे 22 रोजी संपन्न झालेल्या सामाजिक न्याय परीषदेत निमंत्रित वक्ते प्रा. श्रावण देवरे यांचे भाषण झाले. या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद लेखस्वरूपात देत आहोत. कार्यक्रमात वेळेचं बंधन असल्याने भाषण संक्षिप्तच करावे लागते. मात्र अनेक हिचिंतकांनी विनंती केली की, हे भाषण लेखस्वरूपात सविस्तर लिहावे. त्यांच्या विनंतीवरून हे भाषण विस्तारीत केले असून आपल्या वाचकांसाठी सादर करीत आहे. – भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, संस्थापक संपादक.)
======================
राहूल गांधींनी आतापर्यंत दोन भारत जोडो यात्रा काढल्यात परंतू देशाचा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा असलेला ओबीसी कुठेच नव्हता. ओबीसी जनगणनेच्या विषयावर ते बोलतात फक्त, मात्र ज्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे तेथे ओबीसी जनगणना होतच नाही. नितिश कुमार आपल्या बिहार राज्यात जातनिहाय जनगणना करू शकतात, मात्र कॉंग्रेसी मुख्यमंत्री आपल्याच नेत्याचं का ऐकत नसतील? राहूल गांधी उघडपणे जानवे घालून फिरतात व ब्राहमणांच्या देवी-देवतांच्या मंदिरात जाऊन पुजा-विधी करतात. या भारत जोडो यात्रेत ओबीसींचं नॉन-ब्राह्मण संस्कृतीवर प्रबोधन होतच नसेल तर ओबीसी भाजपाला सोडून कॉंग्रेसकडे कसे येतील? नेहरू-गांधी घराण्यानं आजवर ओबीसींवर केलेले अन्याय व ओबीसींचा केलेला विश्वासघात बघता आजच्या ओबीसींनी राहूल गांधींवर व त्यांच्या पक्षावर विश्वास कसा ठेवावा? राहूल गांधींच्या पणजोब्याने (नेहरू) १९५५ साली ओबीसींचा कालेलकर आयोग कायमचा बासनात गुंडाळून ठेवला व ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळू दिले नाही. राहूलजींच्या आजीने (इंदिरा गांधी) १९८१ साली मंडल आयोगाचा अहवाल फेटाळला व ओबीसींना आरक्षणापसून वंचित ठेवले..राहूल गांधींच्या बापाने (राजीव गांधी) १९९० साली मंडल आयोग लागू होत असतांना विरोधी पक्षनेता म्हणून एक तासभर मंडलविरोधात भाषण केले. कॉंग्रेसचे शेपूट असलेले इंडिया आघाडीतील प्रादेशीक व छोट्या पक्षांची भुमिका कॉंग्रेसपेक्षा वेगळी नाही.
अडवाणींची रामरथ यात्रा संपूर्ण देशभर फिरत होती. देशभर धार्मिक तणाव वाढविणारी व दंगली घडवुन आणणारी विध्वंसक रामरथयात्रा देशद्रोहापेक्षा कमी नव्हती. परंतू संपूर्ण देशात असा एकही माई का लाल नव्हता, कि जो या देशद्रोही कृत्याला रोखू शकेल. देशात फक्त एक मात्र लाल होता, आणी तो म्हणजे लालू प्रसाद यादव! बिहारचे तत्कालीन (1990) मुख्यमंत्री असलेल्या लालूजींनी ही विध्वंसक रामरथ यात्रा रोखण्याचे धाडस केले. ते सत्तेत असल्याने पोलीसी बळ वापरून त्यांनी अडवाणींना जेलमध्ये टाकले व रामरथाची मोड-तोड केली. परंतू लालूंकडे फुले-आंबेडकरांचे सांस्कृतिक बळ असते तर त्यांनी अडवाणींची रामरथ यात्रा रोखण्यासाठी पोलीसी बळ वापरण्याऐवजी सिता, शंबूकाचे अस्त्र वापरले असते. सत्तेचा सदुपयोग करीत लालूंनी पूर्ण बिहारमधून सिता, शंबुक, एकलव्य यांच्या प्रतिकांच्या मिरवणूका काढल्या असत्या तर अडवाणींची हिम्मतच झाली नसती रामरथ घेऊन बिहारमध्ये घुसण्याची!
अडवाणीचा रामरथ देशभर सर्व राज्यांमध्ये बिनदिक्कत फिरला मात्र तामीळनाडूच्या दिशेने जाण्याची हिम्मत अडवाणी का करू शकले नाहीत? कारण तामीळनाडूची जनता रावणाला ‘‘हिरो’’ मानते व रामाला ‘‘खलनायक’’! रामरथाच्या विरोधात सीता, शंबुक, एकलव्य या अब्राह्मणी प्रतिकांच्या मिरवणूका मुख्यमंत्री लालू का काढू शकले नाहीत, कारण लालू फुलेआंबेडकरवादी नव्हते. कांशिरामजी मात्र स्वतःला कट्टर फुले-आंबेडकरवादी मानत होते व त्यांच्या जवळ फुले-आंबेडकरांनी दिलेला सांस्कृतिक अस्त्रांचा भरपूर साठा होता. परंतू, तरीही कांशीरामसाहेब उत्तर भारतात ब्राह्मणी राममंदिराच्या आंदोलनाविरोधात बहुजनांचे प्रतिआंदोलन उभे करू शकले नाहीत. हातात हत्यार असूनही शत्रूच्या विरोधात लढाई टाळणे म्हणजे शत्रूला पाठ दाखवून पळ काढणे व भागुबाइसारखी शरणागती पत्करणे होय!
उत्तर भारतात अशा प्रकारचा प्रतिसांस्कृतिक संघर्ष उभा करण्याची ऐतिहासिक जबाबदारी मान्यवर कांशीरामसाहेबांची होती. कारण ते स्वतःला फुलेआंबेडकरवादी म्हणवून घेत होते. भावी काळात जातीअंताची चळवळ मोडीत काढण्यासाठी ब्राह्मणांची युद्ध-छावणी राम-कृष्णाचे सांस्कृतिक अस्त्र वापरू शकते, याची पुरेपूर कल्पना फुले-आंबेडकरांना होतीच! म्हणून या दोन्ही महापुरूषांनी आपल्या अनुयायांच्या भावी पिढ्यांना लढण्यासाठी शस्त्रांचा साठा देऊन गेलेत. राम-कृष्ण या ब्राह्मणी प्रतिकांविरोधात संघर्ष करण्यासाठी फुलेआंबेडकरांनी बळीराजा, रावण, शंबूक, कर्ण, एकलव्य यासारखी महान प्रतिके शस्त्र म्हणून उपलब्ध करून दिलेली आहेत. मान्यवर कांशिरामजी आपल्या पक्षातर्फे उत्तर भारतातून दिल्ली-लखनौमधून शंबूक, एकलव्य, कर्ण, अशा अब्राह्मणी प्रतिकांच्या मिरवणूका काढू शकत होते.
(अपूर्ण) क्रमशः
वक्ते- प्रा. श्रावण देवरे,
नाशिक, महाराष्ट्र
संपर्क – 75 88 07 28 32