‼️ जगातील सर्वात महागडं झाड ‼️

‼️ जगातील सर्वात महागडं झाड ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 15/05/2025 :
आफ्रिकन ब्लॅकवुड किंवा डालबर्गिया मेलानॉक्सिलॉन या झाडाच्या लाकडाचा वापर महागडे फर्निचर आणि वाद्ये बनवण्यासाठी केला जातो. हे झाड खूपच मजबूत असते. ज्यामुळे उच्च दर्जाच्या लाकडी वस्तू बनवण्यासाठी त्याची मागणी जास्त असते. पण या रोपाला झाड बनण्यासाठी खूप वेळ लागतो. इतके पेशन्स कोणात नसतात. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी त्याची लागवड केली जाते, त्या ठिकाणी त्याच्या संरक्षणासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. कारण चंदनाच्या लाकडा इतकेच त्याचाही काळाबाजार केला जातो.
आफ्रिकन ब्लॅकवुड हे टांझानिया, मोझांबिक आणि केनिया सारख्या पूर्व आफ्रिकन देशात नैसर्गिकरित्या आढळते. या झाडाचे लाकूड अत्यंत दाट, मजबूत आणि टिकाऊ असते. गडद काळा किंवा काळा तपकिरी रंगामुळे हे झाड इतर लाकडापेक्षा वेगळे दिसते. आफ्रिकन ब्लॅकवुडचा वापर प्रामुख्याने क्लॅरिनेट, बासरी, ओबो, बासून यांसारखी उच्च दर्जाची वाद्ये बनवण्यासाठी केला जातो. त्याची ध्वनी गुणवत्ता इतकी उत्कृष्ट असते की त्याला म्युझिकल वूड असेही म्हणतात. यासोबतच महागडे फर्निचर, आलिशान दागिने, शिल्पे, सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी देखील याचा वापर होतो. हे लाकूड त्याच्या ताकदी, उत्तम फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या क्षमतेमुळे अत्यंत महाग मानले जाते.
आफ्रिकन ब्लॅकवुड भारतात नैसर्गिकरित्या आढळत नाही. काही संशोधन संस्था आणि निवडक खासगी रोपवाटिकात त्याची रोपे प्रायोगिकरित्या वाढवली जातात. पण त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात नाही. त्याच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारचे उष्ण आणि कोरडे हवामान, कमी पाऊस, विशेष माती आवश्यक असते. जे आफ्रिकन भागात आढळते. आफ्रिकन ब्लॅकवुडचे एक छोटेसे रोप भारतात सुमारे १ हजार ते ५ हजार रुपयांना खरेदी करता येते. पण त्याची उपलब्धता मर्यादित आहे.
एक झाड प्रोढ होण्यासाठी ५०-६० वर्षे लागतात. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति घनमीटर सुमारे ८ लाख ते १२ लाख रुपयात असते. १ घनमीटर लाकूड म्हणजे १ मीटर लांब, रुंद आणि जाड. या संपूर्ण झाडाची किंमत ७-८ कोटी रुपये असू शकते. हे झाड भारतात आयात करायचे असेल तर त्यात जड कस्टम ड्युटी आणि लॉजिस्टिक्स खर्च जोडला जातो. त्यामुळे खर्च वाढतो. या झाडाचे लाकूड अत्यंत दाट आणि मजबूत असते, त्यामुळे ते तुटत नाही किंवा वाकत नाही. एका झाडाची वाढ होण्यासाठी दशके लागतात. म्हणजेच पुरवठा खूपच मर्यादित असतो. उच्च दर्जाच्या वाद्यांमध्ये या झाडाच्या खोडाला पर्याय नाही. अनेक देशांनी या झाडाच्या कापणी आणि निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत.
सौजन्य : Zee News
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण