सोड रे सोड दारुला, ओळखी अपुल्या माणुसकीला !

सोड रे सोड दारुला, ओळखी अपुल्या माणुसकीला !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 10/05/2025 :
दारु व्यसन ही अशी गोष्ट आहे की, कुलूप लावून कुलपाची चाबी फेकून देणे होय. म्हणजे दारुचे व्यसन काही केल्या तो सोडण्यास तयार होत नाही. या पृथ्वीवर सर्व गोष्टी निर्माण करताना देवाने “माणूस” देखील निर्माण केला आणि या मानवाला सगळ्या प्राणीमात्रांपेक्षा कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला मेंदू दिला. आज माणसाचा विकास होत असताना खरचं या माणसाला “माणुसकी” राहिली का? हाच प्रश्न मनामध्ये मात्र थैमान घालत आहे. वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनात म्हणतात.
सोड रे सोड दारुला, ओळखी अपुल्या माणुसकीला ।।धृ।।
दारु पिणाऱ्याचे खूप हाल होताना आपण पाहतच असतो. अति प्रमाणात दारु पिल्याने त्याला रस्त्याने चालता येत नाही. तो रस्त्याचे कडेला किंवा नालीत जाऊन पडतो. तो नालीचे घाण पाण्याने न्हावून निघतो. त्याचे तोंडावर माशा घोंगावतात तसेच कुत्रे मागेपुढे न पाहता लघवी करून जातात. दारु पिणारा फक्त दारु पित नाही तर आईचे सुख, पत्नीची शांती, मुलांची स्वप्ने आणि वडिलांची प्रतिष्ठा हे सर्व एकाच घोटात नष्ट करतो. म्हणूनच राष्ट्रसंत दारु सोडायचा संदेश देतात आणि आपल्या माणुसकीला ओळख म्हणतात. दारुचे नशेत त्याला माणुसकीचा विसर पडला आहे. एकदा माणूस लोकांचे मनातून उतरला की आयुष्यभर त्याच्याकडे ढूंकुणही कोणी पाहत नाही. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. सध्या माणुसकी कुठे पाहायला मिळते काय? या जगात कोणीच तुचचा शत्रू किंवा मित्र म्हणून जन्माला येत नाही. तुमच्या प्रेमातच ठरतं मित्र आणि शत्रू. सुंदर विचार आणि सुंदर व्यक्तीमत्व घडवा. तुमच्यातली माणुसकी आपोआपच सर्वांसमोर उघड होत असते. दारुमुळे माणसाच्या अकलेच आज खोबरं झालेलं आहे.
दारुच्या पायी कितीतरी, जाहले नष्ट भूवरी ।
तुही त्या मार्गी लागला, ओळखी अपुल्या माणुसकीला ।।१।।
दारुची नशा चांगली नसते. थोडा आनंद झाला की दारु पितो आणि दुःख झालं की दारु पितो. आपली तृप्ती करणारी दारु ही रोजची संगिनी बनते. याचा पत्ता लागत नाही. मग ती रोजच हवीववीशी वाटायला लागते. दारुमुळे अनेक समस्या उद्भवते. दारुमुळे कर्करोग होतो, लिव्हर निकामी होते. दारु पिणाऱ्याचा कमी वयातच मृत्यू होतो. तू मित्राच्या संगतीने व्यसनाचे मार्गाने जात आहे. दारुड्याचा मेंदू दारु घेतल्याशिवाय कामच करत नाही. तू दारुचे व्यसनाचे मागे न लागता माणुसकीच्या मार्गाचा अवलंब कर.
नच मान-पान राहते, हसतात लोक भोवते ।
म्हणतात बघा हो भला, ओळखी अपुल्या माणुसकीला ।।२।।
दारुच्या नशेत घरातील तसेच बाहेरील व्यक्तीला अर्वाच्च शिवीगाळ करतो व दुसऱ्या दिवशी काहीच झाले नाही असे वागतो. त्याच्या वागण्यामुळे कोणीही त्याचे सोबत बोलत नाही. अशा दारुड्याचा मान-पान कोण करील. दारुच्या नशेत बिनकामाची बडबड करीत फिरत असतो. हे पाहून लोक हसतात आणि त्याची मजा घेत असतात. लोक म्हणतात हा किती चांगला माणूस होता. आता दारुने त्याचे हालहाल होत आहे.
घरी मुले-बाळेही तसे बनतात दारुने पिसे ।
कुलधर्म नाश पावला, ओळखी अपुल्या माणुसकीला ।।३।।
कुलधर्म नाश पावणे म्हणजे आपल्या कुटूंबातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लोपून जाणे किंवा त्याकडे दुर्लक्ष होणे. दारुड्याचे मुले-बाळे वडिलांच्या दारुपायी पिसे बनतात. मुलं म्हणजे देवा घरची फुलं, ती पवित्र आहेत आणि पवित्रच राहिली पाहिजे. अनेकदा असं दिसत की वडील दारु पितात म्हणून मुले देखील दारु पितात. मुले सुद्धा पिण्यास प्रवृत्त होतात. मुले वडिलांचे वर्तनाचे अनुकरण करीत असतात. दारु पिऊन बायकोला मारहाण करतो, पगाराचे पैसे दारुत उडवतो, शिव्या देतो. दारु पिऊन मेल्यानंतर त्या दारुड्याची बायको घरकाम करुन रोजच खडतर जीवन जगत आपल्या मुलांना सांभाळतात. म्हणून तर राष्ट्रसंत उपदेश करतात की आपल्या माणुसकीला जाग म्हणतात.
तुकड्याची ऐक बातमी, कर दारु पिणे कमी ।
शूरवीर होई चांगला, ओळखी अपुल्या माणुसकीला ।।४।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, माणुसकीने जगायचे असेल तर मी सांगतो ते ऐक. तू दारु पिणे कमी कर. दारुला सोडून दे. दारु सोडण्याच सल्ला प्रथम डाॕक्टरांना विचारा नंतर आठवड्यातून काही दिवस मद्यपान टाळा. असे महिनाभर दारु पिऊ नकोस. असे केले तर नक्कीच दारु सुटू शकेल. शूरवीर म्हणजे जो व्यक्ती अतिशय धाडसी आणि पराक्रमी असतो, जो कोणत्याही प्रसंगात धैर्य आणि शौर्याने वागतो. शूरवीर शौर्याचे प्रतिक आहे. निर्भीडपणे वाईट गोष्टीचा सामना कर. आपल्या माणुसकीला ओळख. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे, दुसऱ्याच्या भावना आणि गरजा समजून घेणे, त्यांच्या कठीण परिस्थितीत साथ देणे म्हणजे माणुसकी होय.
बोधः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, लोक देवाच्या दर्शनासाठी देव दिसावा म्हणून जातात पण देवाला माणूसच दिसत नाही. “माणूस द्या मज, माणूस द्या । ही भीक मागता प्रभु दिसला ।।” राष्ट्रसंताना भीक मागणाऱ्या व्यक्तीत प्रभु दिसला. देवाला हा माणूस कुटिलपणा करणारा, दारु पिणारा म्हणजेच व्यसनी, खोटं बोलणारा, निंदा करणारा नको. तो माणूस हृदयाचा सरळ आणि सर्वांवर प्रेम करणारा असावा असाच माणूस देव मागत आहे.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७