ताज्या घडामोडी

!! गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा !!

!! गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा !!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/03/2025 :
सामान्यपणे अध्यात्मीक क्षेत्रातला प्रत्येकजण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काही तरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे, नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्या की अशा कामना पूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर ते कामना सिद्धीमंत्र होतात. गुरुमंत्र किंवा दीक्षामंत्र हा तुम्ही, गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो. त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे याचा अडथळा नसतो.
गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही’ मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्याक्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सुत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त ‘गुरुर्वाक्यं प्रमाणं’ असे व्हावे लागते. म्हणूनच तर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु..’ असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास.
पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कुणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलटपक्षी त्या वाढल्या. गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तिचे साधन नव्हे. तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे. गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्म जन्मांतरीची भवबीजे, संस्कारबीजे, कर्मबीजे हळूहळू जाळून टाकत असतो. शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो.
आणखी एक गोष्ट म्हणजे, कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागत सुटतो, गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे कां ??? कुणीही उठावे आणि कधीही मागावा ??? गुरुमंत्र मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी बारा-पंधरा वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे कायावाचामनाने, तनमनधनाने सेवा करुन त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची, सरस्वतीने ब्रम्हदेवांची तर अनुसयेने अत्री ऋषींची ! त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात. अगदी सहनशीलतेचा अंत पहाणारी, मोडून टाकणारी, सगळा अहंकार धुळीस मिळवणारी, अगदी लाचार बनवणारी, हीन दीन लीन करून टाकणारी, मनाचा आणि शरीराचा कस पहाणारी परीक्षा घेतात, तुकामाऊलींनी गोंदवलेकरत महाराजांची घेतली, रामानंदांनी कबीराची घेतली, बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली. थोडा जरी अभिमान वाटला तरी श्रीगुरु असे काही करतात की तुमच्या अहंकाराचा पालापाचोळा होऊन जातो. गलितगात्र होऊन जातो. आपण पोचलो असे वाटता वाटता धाडकन खाली फेकून देतात, जणू सापशिडीचा खेळच सुरू असतो. एवढे भोग भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला ला गुरुमंत्रदीक्षा प्राप्त होते. गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते. गुरुमंत्रं अशिष्याय न देयं ।
गमतीने सांगायचं तर कधीही जिवंत गुरुपेक्षा फोटोतले गुरु केव्हाही चांगले. फोटोतल्या गुरुंना तुम्ही गुलाम बनवून ठेऊ शकता. पुजा केली नाही केली तरी ते काही बोलत नाहीत. भूक लागली, तहान लागली असे सांगू शकत नाहीत, तुम्ही तुमच्या सवडीने त्याची सेवा करा, न करा. वाटेल तो नैवेद्य दाखवा न दाखवा. त्यांच्या मुर्तीवर फोटोवर १०००/- ₹चा हार घाला की १/- ₹ चा घाला. त्यांचेसमोर काहीही बोला, करा. भ्रष्टाचार करा. ते काही बोलत नाहीत बोलू शकत नाहीत. मुर्ती आणि फोटो तुमच्या गुलाम असतात. तुमच्या इच्छेनुसार जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची दोन फुले वाहून, साखर समोर ठेवून, नमस्कार करुन एक दिनचर्येचा उपचार केला की मग तुम्ही वाटेल ते करायला मोकळे. या फोटोतल्या गुरुंना तुम्ही तुमचे वाटेल ते काम करायला सांगत असता. दानपेटीत लाच म्हणून काही नोटा टाकून त्यांना लालूच दाखवू शकता. पण जिवंत गुरूंचे तसं नाही. त्यांना चोवीस तास झेलावे लागते. त्यांच्या आज्ञा पाळाव्याच लागतात.

‌जिवंत गुरु म्हणजे धगधगता निखारा आहे. ते तुमच्या आवाक्यात नाही येणार. ते तुमचे गुलाम नाहीत होणार. त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकलं तर फटके लगावणार. ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटील. ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात. त्यांच्यावर जे कार्य जन्म जन्मांतरीच्या ऋणानुबंधांने सोपवलेले असते तेच ते करत असतात. ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भावाविष्कार दाखवून, कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पुर्ण करत असतात. तुम्ही त्यांच्या विषयी काय बोलता, काय अर्थ काढता याची त्यांना पर्वा नसते. पण गुरूच्या बाह्य वर्णनावरून, वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात.ते कुणाचे मिंधे नसतात. त्यांना जे हवे तेच ते करतात. त्यांना जे हवे तेच घडवून आणतात. सामान्य संसारी लोकांना सद्गुरु म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो. साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरू मंत्र घेण्या आधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी, आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैलतीरावर नेण्यास खरच या गुरूंचे गलबत सक्षम आहे कां ??? कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरूंच्या एका शब्दा बरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे ” आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्माकां कपाट कौन, कौनमे कौन समायां, काहे को नर देह आया” या नाथ पंथीय कोडयाचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरू दीक्षा होय. सारांश गुरू म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये.

लेखक अज्ञात!
Source WhatsApp

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button