‼️ काळ.. तेव्हा आणि आताचा ‼️

‼️ काळ.. तेव्हा आणि आताचा ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 31/5/2025 :
वेगवेगळ्या कालखंडातील जलव्यवस्था पाहताना मजा येते. या व्यवस्था भरपूर काही शिकवतात. त्यांची उभारणी, नितांत सुंदर बांधकाम, तत्कालीन तंत्रज्ञानाचा वापर, या व्यवस्थांची घेतली जाणारी काळजी, त्याच्यामागे उभी असलेली लोकांची शक्ती. आज शेकडो वर्षा नंतरही हे सर्व आकर्षित करतात, काही तर थोड्या फार प्रमाणात का होईना कार्यरतही आहेत. यापैकी काही प्रातिनिधिक व्यवस्थांची माहिती घेतली तरी गतकाळाचा अंदाज येतो.
ऐतिहासिक किंवा परंपरागत जलव्यवस्थांमध्ये अनेकांना रुची असते, तशी ती मला सुध्दा आहे. वेगवेगळ्या कालखंडातील जलव्यवस्थांची सैर घडवण्यात येते. हे सारे पाहताना मजा येते, लोक त्या व्यवस्थात रमून जातात आणि त्या काळात हरवून जातात. या व्यवस्था भरपूर काही शिकवतात. त्यांची उभारणी कशी झाली, त्यांचे नितांत सुंदर बांधकाम कसे झाले, त्यात तत्कालीन तंत्रज्ञानाचा किती चांगला वापर केला, या व्यवस्थांची काळजी कशी घेतली जात होती, त्याच्या मागे लोकांची शक्ती कशी उभी होती, वगैरे.
प्रत्येक व्यवस्था काहीतरी वेगळी माहिती सांगते, वेगळा अनुभव देते, प्रेरणा देते आणि निश्चितच आकर्षित करते. एखाद्या सर्वसाधारण विहिरीचेच उदाहरण घ्या. फार जुनी पण नाही, अगदी ५०-७० वर्षा पूर्वीची. तिचे बांधकाम पाहा आणि आताच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पाहा. कोण जास्त आकर्षित करते? स्वाभाविकपणे उत्तर येईल- विहीर. पण त्या विहिरीत असं काय असतं? ती सुद्धा पाणी पुरवायची, आताच्या पाण्याच्या टाक्या सुध्दा पाणीच पुरवतात. उलट आताच्या टाक्यांचे पाणी तर नळांवाटे घरात पोहोचते. तरी सुध्दा विहिरीच पाहायला आवडते, डोळ्यांना सुखावते.
अशा या अफलातून व्यवस्था आहेत. त्या आज शेकडो वर्षा नंतरही आकर्षित करतात. काही तर थोड्या फार प्रमाणात का होईना कार्यरत आहेत. त्यांच्या दुनियेत शिरलं तर रमायला होते, हरवायला होते. यापैकी काही प्रातिनिधिक व्यवस्थांची माहिती घेतली तरी गतकाळाचा अंदाज येतो.
पुण्याजवळ सिंहगडाच्या पायथ्याला रांजे नावाचे ऐतिहासिक गाव आहे. सिंहगडावरून शिवगंगा नदी उगम पावते, ती या गावातून वाहते. या नदीवर राजमाता जिजाऊंनी बांधलेले अप्रतिम बंधारे आहेत. ते आज पावणेचारशे वर्षा नंतरही टिकून आहेत, ते अजूनही व्यवस्थित पाणी अडवतात. याच गावात रांजेश्वराचे मंदिर आहे. त्या आवारात एकमेकांना जोडलेली पाण्याची तीन कुंडं आहेत. या कुंडांचे पाणी एकातून दुसऱ्यात जाते. पहिले कुंड पिण्याच्या पाण्यासाठी किंवा देवाच्या वापराच्या पाण्यासाठी. तिथून पाणी पुढच्या कुंडात जाते, ते अंघोळीसाठी. पुढे तिसऱ्या कुंडात गेलेले पाणी कपडे धुण्यासाठी. त्यानंतर पाणी नहरीवाटे शेतीसाठी जाते. पाण्याचा पुनर्वापर करण्याची ही ऐतिहासिक पध्दत.
सातारा जिल्ह्यात फलटणकडून दहिवडी कडे जाताना मोगराळे हे गाव लागते. तिथे मोटेची विहीर आहे. तिचे बांधकाम अजूनही टिकून आहे. तिचे किंवा त्या काळातील अशा विहिरींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील बारकावा. मोटेने पाणी काढण्यासाठी बैल जुंपले जातात. त्यांना कासरा बांधून त्याच्या दुसऱ्या बाजूला पाणी काढण्यासाठी पखाल असते. बैलांना एका मार्गावरून मागे पुढे नेले जाते. या मार्गाला ‘धाव’ म्हणतात, या वरून बैल पुढे गेले की पाण्याने भरलेली पखाल वर येते. ते मागे सरले की रिकामी पखाल पुन्हा खाली जाते. या धावेला पुढच्या दिशेने हलकासा उतार असतो. तो कशासाठी? तर पखालीचे पाणी वर खेचून आणताना बैलांना थोडीशी मदत व्हावी. मागे येताना पखाल रिकामीच असते, त्यामुळे जास्त ताकदीची आवश्यकता नसते. या व्यवस्थांमध्ये किती बारकावा होता, याचे हे एक उदाहरण.
कोकणातील पाट व्यवस्थेत सड्यांवरचे (लॅटेरिटिक प्लॅटू) पाणी उताराने गावात आणले जायचे. कारण कितीही पाऊस पडला तरी उन्हाळ्यात कोकणातील कित्येक गावात पाणीटंचाई जाणवते. सड्यांवर मात्र पाणी असते. तेच पाणी गावात आणणारी ही व्यवस्था. अशा व्यवस्था राज्याच्या सर्वच भागात पाहायला मिळते. बीडची सातशे वर्षा पूर्वीची शेतीच्या पाण्यासाठीची खजाना विहीर, भंडाऱ्याचे मालगुजारी तलाव, ऐतिहासिक गड किल्ल्यांवरच्या टाक्या, प्राचीन लेण्यांजवळील पाण्याची व्यवस्था; अशा कितीतरी व्यवस्था राज्यभर पसरलेल्या आहेत. तशाच त्या देशभर आणि जगभरही आहेत. त्यात विविधता होती, स्थानिक भूगोल हवामान गरजा यांचा विचारही होता.
हा आपला महत्त्वाचा वारसा आहे, ठेवा आहे. पण त्यांच्याकडे पाहताना काहीशी गल्लत होते. ती समजून घ्यायला हवी. अजूनही काही जण जुन्या व्यवस्थांकडून खूप अपेक्षा ठेवतात. इतक्या की त्यांचे पुनरुज्जीवन झाले, की आपला पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, असे मानतात. इथे मात्र आपल्याकडून वस्तुस्थितीचा विपर्यास होतो. कारण त्या काळातील लोकसंख्या, शहरीकरणाचे प्रमाण, जीवनशैली, लोकांच्या गरजा, पाणी वापराची पध्दती, पाणी वापराचे प्रमाण, स्वच्छतेच्या संकल्पना, पाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सर्वच आता बदलले आहे.
आता झालेले सर्वच बदल सकारात्मक किंवा चांगले आहेत असे नाही, पण ते घडून आले आहेत हे वास्तव तर स्वीकारावेच लागेल. त्यामुळे पाण्याबाबत बोलायचे, तर आताची आव्हाने वेगळी आहेत. त्यांची उत्तरे जुन्या व्यवस्थांमध्ये असू शकत नाहीत. अर्थात, जुन्या व्यवस्था प्रेरणादायी ठरू शकतात, काही बाबतीत मार्गदर्शकही ठरू शकतात. त्यातून शिकण्या सारखेही काही असू शकते, पण नव्या आव्हानांची उत्तरेही नवीच असावी लागतील.
याचा अर्थ असा अजिबातच नाही, की या ऐतिहासिक व्यवस्था तशाच सोडून द्यायच्या. त्यांची पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने उपयुक्तता काही प्रमाणात आहेच. त्यासाठी आपण पाण्याच्या संदर्भात इथ पर्यंत कसे विकसित झालो, याचा महत्त्वाचा टप्पा म्हणून विविध कालखंडातील जलव्यवस्थांचे संवर्धन व्हायला हवेच. शिवाय तो आपला महत्त्वाचा वारसा आहे. या दृष्टिकोनातून त्यांचे मोल आहेच. पण ते तेवढेच आहे. ही मर्यादाही लक्षात घ्यायला हवी. अन्यथा, आपण वास्तव विसरून केवळ स्मरण रंजनात रमणारे ठरू.
दुसरा मुद्दा म्हणजे, आता माणसाला स्वत:लाच खलनायक म्हणून उभे करायला आवडते. त्याची जणू चढाओढ लागलेली असते. म्हणजे, जुन्या काळातील लोक चांगले वागायचे आणि आता आपण कसे बिघडलो आहोत, हा त्या मागचा सूर असतो. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे सुध्दा, पण ते सर्वांच्या संदर्भात आणि सर्वच बाबतीत लागू होत नाही. याचे उदाहरण भूजलाच्या संदर्भाने देता येईल. अलीकडे भूजलाचा उपसा वाढला आहे आणि त्याच्या साठ्यांचे शोषण होत आहे. हे शोषण इतके वाढले आहे की ऐतिहासिक काळात, काही शे वर्षांपूर्वी जमिनीत हळूहळू मुरलेले भूजल आपण उपसतो आहोत, वापरतो आहोत. भूजल मुरण्याची संथ गती पाहता ते पुन्हा मुरायला किती वर्षे लागतील हे सांगताही येणार नाही. असा आपला पराक्रम.
याउलट, आपल्याकडे ५० वर्षांपूर्वी पर्यंत भूजलाची पातळी उत्तम होती. अगदी १९७२ च्या भीषण दुष्काळातही भूजल पुरेसे होते. हा दुष्काळ म्हणजे भारताच्या दृष्टीने मैलाचा दगडच. तरीही त्यात अन्नाची टंचाई असली, तरी जमिनीत पुरेसे पाणी होते. म्हणजे त्या काळातील माणूस पाण्याचा किती योग्य वापर करत असे, असा याचा अर्थ काढला जाईल. पण खरेच तसे होते का? की त्या काळात इतक्या प्रमाणात भूजल उपसण्याचे तंत्रज्ञानच उपलब्ध नव्हते, म्हणून तेव्हाचे लोक आता इतके भूजल उपसू शकत नव्हते? या प्रश्नाचे उत्तर या दोन पर्यायांच्या मध्ये कुठे तरी सापडेल. त्या काळात माणूस विवेक होता आणि आता विवेक हरवला आहे, असे म्हणताना हा विवेक कोणत्या निकषांवर तपासणार?
विध्वंस करणारे तंत्रज्ञान त्या काळात हाताशी नसेल आणि हव्या तितक्या प्रमाणात भूजल उपसण्याची संधीच उपलब्ध नसेल, तर माणसाला विवेकी वागणे क्रमप्राप्तच होते. आता हाताशी हे सारे असताना विवेक ढळण्याची शक्यता अधिक असू शकते. याचा अर्थ असा अजिबातच नाही, की त्या पिढीत लोक, समाज विवेकी नव्हता. मात्र, ते ठरवण्याचे निकष वेगळे असावे लागतील. केवळ, अनिर्बंध पद्धतीने भूजल उपसले नाही किंवा नैसर्गिक साधने काटकसरीने वापरली यावरून ते ठरवता येणार नाही, हे वास्तव मान्य करावे लागेल.
या चर्चेत आता आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे. ती म्हणजे, आता पाण्याचा अनिर्बंध उपसा करणारी किंवा नैसर्गिक साधन संपत्ती कितीही प्रमाणात वापरण्याचे तंत्रज्ञान आपल्या हाताशी आहे. तरी सुध्दा आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर शाश्वत पद्धतीने आणि नियोजनबद्ध केला, तर ते वागणे नि:संशयपणे विवेकीच ठरेल. आताचा काळ बिघडलेला नाही हे दाखवून देण्यासाठी ही संधी घ्यायला हरकत नसावी.
अभिजित घोरपडे
९८२२८४०४३६
लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.
सौजन्य : अॅग्रोवन
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण