महाराष्ट्रातील महाविकास आघाडी बुडवायला आता आंबेडकरांचा दंडुका

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी बुडवायला आता आंबेडकरांचा दंडुका
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/10/2023 :
लोकसभा निवडणुकांची घटीका जस जशी जवळ येईल तसतसे अनेक राजकीय पक्षांचे राघोबादादा येनकेन प्रकारे कुणाचा ना कुणाचा आसरा घेत आपली ओसरी शोधून आपलं व आपल्या पक्षाच अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत अर्थात त्यात काही गैर नाही कारण माकडीन जसा आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या पिलाला पायाखाली घेते तसाच काहीसा प्रकार हा निवडणूका जवळ आल्या की होतो. आता बघा ना मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना लाखोली वाहत एकमेकांना पाण्यात पाहणारे शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत या निवडणुकीत राजकीय घरोबा करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. याचा अर्थ काहीही करा पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किमान यावेळी तरी पंतप्रधान पदापासून चार हात लांब ठेवा. ही या देशपातळीवरील इंडिया नावाची व राज्य पातळीवरील महाविकास आघाडीची निती रंग भरण्यासाठी तयार आहे. त्यात या सर्वांचा बोजवारा उडालेला असणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे .
महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सत्ता असताना याच आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांचा माज सातव्या मजल्यावर पाणी भरत असल्याने त्यांना पुढची पंचवीस वर्षे भाजपने या राज्यात सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहू नयेत असा दर्प चढला होता. पण अचानकपणे अडीच वर्षात या सत्तेतील मस्तवालांचा मस्तवाल सातव्या मजल्यावरून शिवसेनाच जमिनदोस्त झाल्यावर डायरेक्ट धाडकन जमिनीवर असा काही कोसळला की काय विचारूच नका. बरं हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडींकडे त्रयस्थपणे पाहण्याची भूमिका घेतली तीच भूमिका पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच कंबरडे मोडण्यासाठी कारणीभूत ठरली .
शरदचंद्र पवारसाहेब यांना याच काळात सत्तेचा असा काही दर्प चढला होता की त्यांनी ‘ मी पुन्हा येईन ‘ या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याची जागोजागी राजरोसपणे खिल्ली उडवायला सुरुवात केली. हीच गोष्ट साहेबांच्या कंठाशी आली आणि आपला पुतण्या आपल्याला दगाफटका करणार नाही कारण त्याच्यात ती राजकीय कुवत नसल्याचा फाजील आत्मविश्वास साहेबांना चांगला नडलाच नाही तर तो त्यांनी उभ्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूगर्भातील स्पंदनांना पुरती मुठमाती देऊन गेला .
आज राष्ट्रवादी काँग्रेसची इतकी धूळधाण उडाली आहे की कोण आमदार साहेबांच्या गटात आहे आणि कोण आमदार अजितदादा यांच्या गटात आहे हेच कळेनासे झाले आहे. कारण परवाच्या शरदचंद्र पवारसाहेब यांनी लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या आढावा बैठकीत सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक हे दादांचा गट सोडून डायरेक्ट साहेबांच्या वळचणीला आणण्याची कामगिरी शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चोखपणे बजावली याचा अर्थ असा की यापुढे “साहेबांची हिटलरशाही किंवा दादांची हुकुमशाही” आम्ही खपवून घेणार नाही असाच इशारा यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील आमदारांनी देण्याचा चंग बांधला आहे असेच एकूण चित्र आहे. “मी पुन्हा येईन” या देवेंद्र फडणवीस यांच्या “टॅगलाईनची” खिल्ली उडवायची शरदचंद्र पवारसाहेब यांना खरच गरज होती का ॽ तर त्याच उत्तर निःसंकोचपणे नाही असंच आहे. कारण त्यांच्या या ‘ स्लोगनला ‘ राज्यातील मतदारांनी शंभर नाही तर दोनशे टक्के प्रतिसाद दिला. म्हणून तर भाजप – शिवसेना युतीला एकशे एकसष्ट आमदारांची संख्या गाठता आली. पण ही युती महाराष्ट्रात दुसऱ्यांदा सत्तेवर सक्रिय झाली तर आपल्याला व आपल्या कन्येला बारामतीच्या बागायती शेतीत वांगी तोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही याचं आकलन होताच सतत सत्तेचा खेळखंडोबा करणाऱ्या शरदचंद्र पवारसाहेब यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपदाच गाजर दाखवलं आणि त्याचा हलवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गृहमंत्रीपद मिळवून बिनदिक्कत सचिन वाझेला सोबत घेऊन खाल्ला. आता त्याची फळं तुरुंगात राहून सचिन वाझे भोगतो आहे. तर तशीच फळ शरदचंद्र पवारसाहेब आणि उध्दव ठाकरे हे देखील जनतेच्या तुरुंगात स्वपक्षाची अक्षरशः धूळधाण करून भोगत आहे. यालाच म्हणतात निती नावाची अजब गोष्ट जी आजपर्यंत शरदचंद्र पवारसाहेब यांना कळली नाही तर उध्दव ठाकरे यांना कधी कळणार आहे ? कारण हे सगळे सत्तेच्या मस्तीत सतत तुर असणारे राजकारणातील खरे गर्दुल्ले आहेत आणि आता उगाच नाशिकच्या ललित पाटील नावाच्या ड्रग्स माफिया विरुध्द गळे काढत एकमेकांचे कपडे फाडत ‘ माझ्यापेक्षा तुझा जास्त फाटलाय ‘ हे तपासत आहेत. पण दोघांनीही एकमेकांचे कपडे फाडले आहेत हेच कबूल करायला ते तयार नाहीत. तर अशा या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची त्रेधातिरपीट उडायला कितीसा अवधी लागणार आहे. त्यात या आघाडीत तिन्ही घटक पक्षांची अवस्था वासरासारखी झाली आहे. त्यात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित नावाच्या लंगड्या गाईला सोबतीला घेऊन राज्यातील राजकारणाचा चुथडा केला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आगामी काळात महाविकास आघाडी बुडवायला नक्कीच सज्ज असतील हे काय नव्याने सांगायला नको.
राजाभाऊ त्रिगुणे
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक