जिद्दीचा चिवट संघर्ष : हेलपाटा

पुस्तक परिचय…
जिद्दीचा चिवट संघर्ष : हेलपाटा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/02/2024 :
बाप दुसऱ्याच्या घरी सालगडी. मालक बदलेल तशी गावं बदलत गेली. वीस-पंचवीस वर्षे असंच.. फिरस्त्यागत आयुष्य. भाकरीपाठी नुसती पळापळ. कुत्तरओढ नुसती… गरीब माणसाला एखादी साधी गोष्टीही सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी पायातल्या चपला झिजवाव्या लागतात. पोटाला चिमटा द्यावा लागतो. अनेक नकार पचवावे लागतात. ठोकरा द्याव्या लागतात. हेलपाटे खावावे लागतात… पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण कुठलं?
छोटी-मोठी कामं करत पडत-झडत तानाजी घडत गेला. हा संघर्ष इतका सोपा नव्हता. तोंडात खडीसाखरेचा खडा आणि डोक्यावर बर्फाची लादी ठेवावी लागली. सगळ्यांशी मिळून मिसळून राहू लागले. राग लोभ, द्वेष, प्रेम यांना मुरड घालावी लागली. कमालीचा संयम. मनलावून शिक्षण… परिस्थितीची जाणीव… सतत धडपड… चिकाटी, जिद्द यांची प्रेरक कहाणी ‘हेलपाटा’ मधून आपल्याला वाचायला मिळते.
शाळवाची राखोळी… माळव्याची पाटी डोक्यावर घेऊन केलेली विक्री… भाकरी नसलेली दिवाळी… दुष्काळाची गडद छाया… शाळा कॉलेजचे दिवस… नोकरी मिळण्यासाठी केलेले प्रयत्न… दिलेले इंटरव्यू…खाल्लेले हेलपाटे… खूप खूप केलेला प्रवास… अशी कादंबरी पुढे सरकत जाते… आणि शेवटी एकदाचं यश मिळतं!
दुसऱ्याच्या चाकरी राहून मुलांना शिकवणारा बाप या कथेत भेटतो. प्रेमळ आईचा आशीर्वाद कामाला येतो. चांगले शिक्षक मिळतात. मुलं शिकतात. नोकरी लागतात. तानाजी ग्रामसेवक होतो. थोरल्यालाही परदेशी नोकरी लागते. सोन्याचे दिवस येतात… पण मुलं आपले दिवस विसरत नाहीत. संघर्ष विसरत नाहीत. तानाजी सृजनशील आहे. कवी मनाचा आहे. आठवणींना शब्दरूप मिळते आणि हेलपाटा ही सुंदर कादंबरी साकारते. अतिशय भावुक आठवणींचा हा ग्रंथ ऐवज आहे. आतडं पिळवटून टाकणाऱ्या वेदना आहेत. ही अतिशय प्रेरणादायी ही गोष्ट आहे तानाजी धरणे नावाच्या माणसाची. प्रायोगिकतेच्या भानगडीत न पडता साधी, सोपी सर्वांना समजेल अशी प्रमाण भाषाशैली त्यांनी वापरली आहे.अवश्य वाचावा संग्रही ठेवावी असा ग्रंथऐवज!
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
-सचिन वसंत पाटील
कादंबरी : हेलपाटा
लेखक : तानाजी धरणे
पी.आर पब्लिकेशन, अमरावती
पृष्ठे : १४४, मूल्य २२५ रुपये