⭕आरटीओ कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे भ्रष्ट आचरणा विरुद्ध माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाची तक्रार 🟣कारवाई न झाल्यास आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा

⭕आरटीओ कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे भ्रष्ट आचरणा विरुद्ध माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाची तक्रार
🟣कारवाई न झाल्यास आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 11/11/2023 : अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे जनतेची आर्थिक पिळवणूक करून ज्ञात उत्पन्न स्तोतापेक्षा अधिकची आर्थिक संपत्ती जमा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची चौकशी करून कारवाई करणे बाबतची तक्रार राज्य परिवहन आयुक्त यांच्याकडे माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
अकलूज उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात विविध प्रकारे भ्रष्ट आचरण करून अवैद्य अशी बेनामी संपत्ती अधिकारी वर्गाने मिळवलेली असून यासाठी जनतेची, वाहन चालक-मालक यांची आर्थिक लूट राजरोसपणे केली जात आहे. व त्यासाठी विविध मार्गाचा वापर केला जात आहे. लेखी तक्रार निवेदनामध्ये असे नमूद करून पुढे म्हटले आहे की या कार्यालयाद्वारे नवीन वाहन नोंदणी, जुने वाहन नोंदणी तसेच दुचाकी ते अवजड स्वयंचलित वाहने फ्लाईंग स्क्वाडद्वारे तपासणी करताना कागदपत्राच्या तपासणी व हाताळणी द्वारे आर्थिक कमाई केली जाते. फ्लाईंग स्क्वाडद्वारे जुजबी कारवाईचे नाटक केले जाते. जड व अवजड वाहनांकडून विविध प्रकारच्या पक्षाची, झाडाची छायाचित्रे, विविध कलरच्या कागदांवर छापून सांकेतिक चित्राने (नारळ, झाड असे) रकमांची दरमहा वसुली केली जाते. याकरिता खाजगी व्यक्तीची तालुक्याच्या ठिकाणी अथवा शहराच्या ठिकाणी वसुली करिता नेमणूक केली जाते.
🔸अकलूज माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा या विभागातून राज्य व राष्ट्रीय महामार्ग जातात. या मार्गावरून वार्षिक तपासणी न केलेल्या, शासकीय कर चुकवेगिरी केलेल्या, पासिंगची नंबर प्लेट लावून पर्यायी स्क्रॅप गाड्या आर्थिक हितसंबंधातून सुरू ठेवून प्रदूषणामध्ये भर घालून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वाहतुकीस सुरक्षित ठेवले जाते.
🔷राज्य परिवहन विभागाची कायदेशीर परवानगी नसलेल्या अनधिकृत खाजगी व्यक्तींमार्फत वाहन चालक मालक यांची आर्थिक पिळवणूक केली जाते.
🔵या उपप्रादेशिक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यात अवैद्य प्रवासी वाहतूक बोकाळलेली असताना वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येतात व यावर त्यांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे सदर वाहने तीन चाकी रिक्षा, चार चाकी वाहन ,घरगुती गॅस वापरून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्धारित केलेल्या टप्पे प्रवासी वाहतूक दरापेक्षा अधिक दराने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तसेच चालक-मालक यांचेवर कायदेशीर कारवाई केल्याची माहिती कधीही प्रसिद्धी माध्यमांना दिली जात नाही.
इत्यादी अवैद्य मार्गाने परिवहन विभागाचे अनेक नियम धाब्यावर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांनी राज्य परिवहन सेवा स्वीकारते वेळी दिलेली व्यक्तिगत माहिती द्वारे घोषित संपत्तीपेक्षा विविध स्त्रोताचे माध्यमातून मिळवलेल्या बेनामी, जवळच्या नातेवाईकांच्या आर्थिक संपत्तीची रीतसर चौकशी करावी. अशी मागणी करत, सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर दिनांक 24/11/2023 रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. असे शेवटी या तक्रार निवेदनात नमूद केले आहे. कारवाईसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे, तर माहितीस्तव प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज, उपविभागीय अधिकारी अकलूज, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक अकलूज यांच्याकडे प्रत पाठविण्यात आलेली आहे. यावर माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, खजिनदार एडवोकेट अविनाश टी. काले, सचिव नागनाथ बाबुराव साळुंखे यांची स्वाक्षरी आहे.