झेलेन्स्की यांची वाऱ्यावरची वरात !!!
झेलेन्स्की यांची वाऱ्यावरची वरात !!!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 03/03/2025 :
युक्रेन मध्ये काय आहे ?
क्रिटीकल/ दुर्मिळ अर्थ मिनरल्स असा ज्यांचा उल्लेख केला जातो अश्या खनिजांच्या जागतिक साठ्यापैकी ५ % साठा युक्रेन कडे आहे. युक्रेनच्या एकूण खनिज क्षमतांच्या पैकी फक्त १५ % क्षमतांचे मुल्यांकन होऊन दोहन प्रक्रिया सुरु आहेत त्यात १.९० कोटी टन ग्रॅफाईट, प्रचंड प्रमाणात टिटॅनियम, संपूर्ण युरोपच्या एक तृतीयांश लिथियम , अणुभट्टीत लागणारे बेरिलियम आणि युरेनियम, बाकी तांबे , शिसे , जस्त ,चांदी , कोबाल्ट , निकेल आणि मँगेनीज हे पण भरपूर आहे. या सगळ्याचे उत्खनन आणि प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री , पैसा या दोन्हींमध्ये युक्रेन कमकुवत आहे. या सगळ्या खनिजांची अमेरिकेला प्रचंड आवश्यकता आहे कारण आजवर अमेरिकेच्या या गरजेपैकी ७५ % गरज चीन कडून भागवली जात होती. परंतु गेल्या काही काळात चीनने हा पुरवठा अत्यंत मर्यादित केला आहे आणि त्यामुळे अमेरिका आणि चीन टँरिफ युद्ध भडकले आहे.
अफगाणिस्तान मध्ये काय आहे ?
अफगाणिस्तानच्या भुमीखाली पण अश्याच अनेक दुर्मिळ खनिजांचा अफाट साठा आहे आणि म्हणूनच १९७९ साली रशियाने तिथे हल्ला केला. पण या खनिजांचा शोध घेण्याइतपत शांतता तिथे रशिया आणि नंतर अमेरिका निर्माणच करू शकला नाही. आता तर तिथे असे माथेफिरू सत्तेत आहेत त्यांच्याशी पाश्चात्य जगताचा एकही माणूस संवाद सुद्धा साधू शकत नाही. परंतु भारत मात्र शांतपणे आपली व्यूहरचना करतो आहे. उगर मधील मुस्लिमांचे गळे चिरणाऱ्या आणि पाकिस्तानला सावकारी पद्धतीने भिकेला लावणाऱ्या चीनवर अफगाणिस्तानची राजवट कधीच विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे तिथे आज रस्ते, इस्पितळ , संसद भवन आणि धरणे बांधणारा भारतच उद्या तिथल्या खनिज संपत्तीचे दोहन करणार आणि त्यातून अफगाणिस्तान आणि भारत समृद्ध होणार.
अर्थातच अफगाणिस्तान मधील या खनिज संपत्तीचे उत्खनन करण्यासाठी या भूमीत पहिले पाच दहा वर्ष शांतता नांदणे आणि कोणतीतरी एक राजवट स्थिर होणे आवश्यक आहे. गांधार भूमी अशी शांत होईल का हाच लाखमोलाचा सवाल आहे.
युक्रेनचा इतिहास काय ?
युक्रेन हे रशियन युनियन मधील एक मोठे राज्य होते. युक्रेन खनिज संपत्तीच्या बाबतीत समृद्ध आहे ही नवीन वार्ता आहे पण त्यापूर्वी युक्रेन हा देश युरोपचे गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जाई. अॅडॉल्फ हिटलरच्या स्वप्नातील थर्ड राईश च्या स्वप्नात युक्रेन ताब्यात ठेवणे इतपतच रशियाशी संघर्ष लिहिला होता. परंतु रशियाने त्याला हूल देत आत आत आणले आणि मग त्याचे लचके तोडले. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाला रशियाचा विस्तारवाद बघून युरोप घाबरला. या महायुद्धात युरोपची संपूर्ण एक तरुण पिढी नष्ट झाली होती त्यामुळे भविष्यात रशियाशी अजून एखादे युद्ध लढण्याची त्यांची क्षमताच नव्हती. नाटोचा जन्म होण्याचे कारण ते आहे. भविष्यात एकाजरी नाटो राष्ट्रावर रशियाने हल्ला केला तरी त्याला सगळे एकत्रित उत्तर देतील आणि यात अमेरिका सुद्धा समाविष्ट होती. अमेरिकेने पालकत्व घेतल्यानेच नाटोला मूर्त स्वरूप आले आणि नाटो जगातील सर्वात शक्तिशाली संघटना बनली.
सोव्हियत रशियाचे विघटन होताना युक्रेन हे एक वेगळे राष्ट्र झाले. त्यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात काही महत्वाचे करार झाले. त्यातील पहिला मुद्दा होता युक्रेन कधीही रशियन हितांना बाधा पोचवणारे कृत्य करणार नाही त्या बदल्यात युक्रेन अण्वस्त्रांना आपल्याकडे ठेवू शकतो. युक्रेन कधीही नाटोचा सदस्य होणार नाही. १९९१ साली युक्रेन निर्माण होताना हा करार झाला आणि झेलेन्स्की सत्तारूढ होईतो याचे पालन सुद्धा झाले.
झेलेन्स्की हा स्टँड अप कॉमेडीयन. आपल्याकडे सुद्धा हे प्रकरण फोफावले आहे तेच उभे राहून कमरेखालील विनोद सांगत लोकांचे हशे आणि टाळ्या मिळवणारे बावळट असतात तसाच हा एक. मध्यंतरी अश्याच एकाने पराकोटीचे अश्लिल वक्तव्य केले आणि आता माफी मागत फिरतोय. झेलेन्स्की या माणसाचा बौद्धिक वकूब तितकाच. पण या विदुषकावर अमेरिकन डीप स्टेटची नजर पडली आणि त्यांना एका दगडात अनेक पक्षी मारता येतील याची खात्री झाली.
आपल्याकडे ज्या पद्धतीने घुंगरू शेठला फोर्ड फाउंडेशनच्या माध्यमातून पैसे देत डीप स्टेटने मोठे केले. हा तसाच प्रकार. ही मंडळी चांगली कलाकार असतात घुंगरू शेठ ने दिल्लीच्या लोकांना दहा वर्ष मूर्ख बनवून दाखवलेच की !! तर झेलेन्स्की डीप स्टेट ने संपूर्ण ताकद प्रदान केल्याने २०१९ साली युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष झाला.
२०१९ ते २०२२ झेलेन्स्कीने पुतीन यांना वैयक्तिक पातळीवर आणि रशिया या देशाला सार्वजनिक पातळीवर इतके दुखावले , इतके उर्मट वक्तव्य आणि वर्तन वारंवार केले की त्यामुळे रशिया संतापला. युक्रेन नाटोचा सदस्य होणार हे वक्तव्य करणे आणि त्याला संपूर्ण युरोपियन युनियन ने पाठींबा देणे ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली आणि पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केला. हा संपूर्ण सापळा डीप स्टेटने रचला होता. प्रत्येकाची उद्दिष्टे सुस्पष्ट होती.
झेलेन्स्कीला आपल्या देशात हिरो बनायचे होते आणि प्रचंड पैसा खायचा होता. रशियाला युरोप आणि त्याच्यामध्ये एक बफर स्टेट म्हणून युक्रेनचे असणे अत्यंत आवश्यक होते. डीप स्टेटला युक्रेनला युद्धाच्या खाईत लोटून आणि त्याच्यावर दौलतजादा करत त्याला मिंधे ठेवून रशियाला खिळखिळे करायचे होते. हे कार्य साधले की युद्ध संपणारच होते. यावेळी जो बायडन आला असता तरी हेच झाले असते आणि जो बायडन याने सुद्धा आम्ही तुमच्यावर ३५० बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत आम्हाला खनिज उत्खनन परवानगी द्या हेच्च सांगितले असते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जगावेगळे वागत नाहीत , जगावेगळी मागणी करत नाहीत. हे सगळे डीप स्टेट च्या नियोजनानुसारच चालू आहे.
ट्रम्प यांनी स्वतःच वक्तव्य केल्याप्रमाणे ते हार्ड निगोशीयेटर आहेत आणि ते आक्रमकपणाने वाटाघाटी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी सत्तेवर आल्या आल्या रशियाशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या काही संदर्भात त्यांना शब्द दिला आणि मग त्यांनी झेलेन्स्की यांना भेटीसाठी बोलावले. रशियाने युक्रेनचा जितका भाग काबीज केला आहे तितका भाग त्याला युद्धाचा खर्च भरून निघण्यासाठी दिला जाणार आहे. रशियाने दुर्मिळ खनिज असलेला एक मोठा भूभाग काबीज केला आहे. झेलेन्स्की यांना सांगण्यात आले की या अधिग्रहणाला मान्यता द्या. अमेरिकेने या युद्धात ३५० बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत त्याची परतफेड व्हावी म्हणून आम्हाला खनिज संपत्तीचे उत्खनन परवानगी द्या. त्यात आपण वाटले तर भागीदारी करू शकतो. या बदल्यात रशिया तुमच्यावर भविष्यात हल्ला करणार नाही असे वचन आम्ही देतो आणि असे काही झाले तर आम्ही हस्तक्षेप करू असे आश्वासन देतो. वचन आणि आश्वासन हा शब्दातील फरक लक्षात घ्या.
हे सगळे स्क्रिप्टेड होते, अर्थात अशीच सगळी चर्चा घडणार हे पडद्याआड ठरले होते. परंतु झेलेन्स्की हा कितीही झाले तरी जो बायडन चे प्यादे आहे आणि त्याने त्याच्या देशात रशिया आक्रमक आणि अविश्वासू आहे हे नॅरेटिव्ह निर्माण केले आहे. मी रशियन अस्वलाला किती गुदगुल्या केल्या हे अर्थातच तो सांगत नाही. त्याचा कार्यकाळ संपला तरी युद्धामुळे तो सत्तेवर आहे. या युद्धाच्या निमित्ताने त्याने अब्जावधी रुपये कमावले आहेत. जितके युद्ध रेंगाळेल तितका त्याचा फायदा आहे. पुन्हा निवडणूक जिंकायची असेल तर त्याला स्वतःला हिरो सिद्ध करत रहाणे आवश्यक आहे. या सगळ्या कारणांच्या मुळे त्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांच्याच कार्यालयात अपमान केला. जे घडले ते जगाने बघितले. झेलेन्स्की नंगा आहे त्याचे काहीच नुकसान झाले नाही पण यात अमेरिकेची अब्रू गेली.
या तीन वर्षात युक्रेनचे लाखभर सामान्य नागरिक मारले गेले आहेत. रशियाने आपल्याकडून सर्व ताकद लावलेली नाही कारण युक्रेनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रशियन नागरिक आहेत आणि त्यांचा झेलेन्स्की या विदुषकाला विरोधच आहे. युरोप आणि अमेरिकेने मात्र सगळी ताकद ओतली आहे आणि तरीही तीन वर्षात युद्ध निर्णायक टप्प्याला पोचू शकले नाही.
युरोप होरपळून निघाला आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. सिरीयन शरणार्थी युरोप च्या रस्त्यांवर दंगल करत आहेत आणि युरोपात मोठ्या प्रमाणात उजव्या विचारसरणीची मंडळी सत्तारूढ होत आहेत. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्कीच्या पाठीमागील अमेरिकन हात निघाल्यावरही त्याला युरोप मधील एखादे राष्ट्र मदत करतच राहील ही शक्यता खूप कमी आहे. तरीही झेलेन्स्कीने ट्रम्प यांना उघड अंगावर घेतले. ही हाराकिरी आहे आणि याची किंमत त्याला आणि काही प्रमाणात युक्रेनला सुद्धा चुकवावी लागू शकते.
झेलेन्स्की ऐकत नाही म्हटल्यावर ट्रम्प पुतीन यांनाच युद्धाची तीव्रता वाढवा असे सांगू शकतात आणि अमेरिकन शस्त्रास्त्रे वापरून संपल्यावर युक्रेनच्या सैन्याची लांडगेतोड होऊ शकते. अमेरिका युक्रेन मध्ये सत्तांतर सुद्धा घडवू शकते.
भारतातील मंडळींचे झेलेन्स्कीप्रेम उफाळून वर आले आहे. तो कसा ट्रम्प यांना नडला आणि मोदी यांनी कसे निमूटपणे ऐकून घेतले नावाचा मूर्ख नॅरेटिव्ह रेटून न्यायला सुरुवात झाली आहे. परंतु चर्चा करत असताना ती यशस्वी करणे ही मुत्सद्देगिरी असते. तुम्हाला हवे ते मान्य करून घेतानाच समोरच्याचा स्वाभिमान दुखावणार नाही ही मुत्सद्देगिरी असते. आणि ही मुत्सद्देगिरी मोदींनी दाखवली आणि म्हणूनच ट्रम्प यांन स्वतः मोदींची मुक्तकंठाने स्तुती केली याचा विसर आपल्या कडच्या निर्बुद्ध मंडळींना पडलेला आहे.
राहुल गांधी , अरविंद केजरीवाल ही मंडळी सुद्धा वकुबाने झेलेन्स्की यांच्याच दर्जाची आहेत. ही मंडळी सुद्धा बाहेरून मिळणाऱ्या पैशाच्या बळावर उड्या मारत असतात आणि हे पण आता सिद्ध झाले आहे. असल्या मूर्खांना डोक्यावर घेतले तर आपला देश सुद्धा युक्रेनप्रमाणे बेचिराख होऊ शकतो इतकी अक्कल आपल्या देशातील निर्बुद्ध विचारवंतांना यावी हीच देवाकडे प्रार्थना.
झेलेन्स्की याने जे काही केले आहे त्याला एका वाक्यात सांगायचे असेल तर ही वाऱ्यावरची वरात होती आणि वारा म्हणजे अमेरिकन मदत. वाऱ्याने पाठ फिरवल्यावर वरातीतला नवरदेव जमिनीवर आदळणार हे कालत्रयी सत्य आहे. आरडाओरडा केल्याने जरा लवकरच आदळेल. अपमानास्पद पद्धतीने आदळेल.
लेखक – सुजीत भोगले