ताज्या घडामोडी

शिवशंकर आणि त्यांच्या परिवाराची खूपशी वेगळी माहिती

शिवशंकर आणि त्यांच्या परिवाराची खूपशी वेगळी माहिती

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/02/2025 : बऱ्याच वेळेला श्री शिवशंकर हे संपूर्ण निळ्या रंगात दाखवले जातात. ते संपूर्ण निळे नसून आपण रामदास स्वामी लिखित लवथवती विक्राळा ही आरती नीट म्हंटली किंवा ऐकली तर आपल्या लक्षात येईल की ते “कर्पुरगौरा भोळा….” म्हणजे कापरासारखे पांढरे शुभ्र आहेत. त्यांचा फक्त कंठ निळा आहे. त्यांचा संपूर्ण परिवारच “पांढरा शुभ्र” आहे. त्यांचा वास आहे तो हिमालय पांढरा शुभ्र, त्यांच्या जटेतील गंगा पांढरी शुभ्र, त्यांची पत्नी “गौरी” नावातच गोरेपणा आहे तीही गोरीच आहे नावाप्रमाणे, त्यांच्या समोरील नंदी [ या नंदीची आत्यंतिक अवस्था म्हणजे “आ”नंदी” किंवा “आनंद”. ] हाही पांढरा शुभ्र. हा नंदी आपण जर आकाशामध्ये पहायला गेलो तर “वृषभ” राशीत आहे.
शिवमंदिराला “गाभारा” असे म्हणतात. किंवा गर्भ गृह असेही म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे. इथे निर्मिती प्रक्रिया चालते. रस्त्यावरून जाताना शिव पिंड दिसत नाही. त्यासाठी आत गाभारयात म्हणजे “आत मनात” उतरावे लागते. बाहेर असलेले कासव हेच सांगते की मी जसे संकट आल्यावर माझे पाय आत ओढून घेते तसे देवाची भक्ती करायची तर मनाला आत ओढून घेऊन त्याचे बाहेरचे मोह, विषय, षडरिपू यांचे सारे दरवाजे बंद करा. आणि आत या. मग तुम्हाला आपोआप “तो” दिसेल….तसेच हे कासव सांगते की माझ्यासारखी तुमच्या मनाची बाहेरच्या विषया कडील धाव मंद करा, थांबवा.
“शं” “कर” म्हणजे कल्याण करणारा….
शिव = शव = इ / शव म्हणजे शंकर आणि इ म्हणजे शक्ती, पार्वती. जो पर्यंत शिव हे शक्तीयुक्त नाहीत तो पर्यंत ते शव म्हणजे प्रेतासमान निर्बल आहेत. म्हणून शिव हे अर्ध्या भागात पार्वती असलेले दाखवतात. त्याचाच दुसरा अर्थ की प्रत्येक एका गोष्टीत थोडीशी दुसरी गोष्ट असते. चायनीज अक्यूपंक्चर मध्ये असे एक चिन्ह आहे. हा शिव आणि त्यांची बायको “शीवी” हे दोघे बिघडले की “आपण चिडल्यावर देतो ती “शिवी” होते…… त्यांच्या प्रत्येक नामाला खूप काही अर्थ आहे. ते आपण पुन्हा कधीतरी नक्की बघू……
श्री शिवाच्या भालावरील चंद्र म्हणजे ज्ञानेश्वरांनी वर्णिलेले चंद्रामृताचे तळे आहे. हे मेंदूत असते. योगातील जी सतरावी कला आहे त्यात हे तळे कलंडून त्यातून अमृत स्त्रवते. वैज्ञानिक भाषेत म्हणायचे झाले तर मेंदूतील “Thalamus ” ही ग्रंथी म्हणजे “सूर्य आणि “HypoThalamus “म्हणजे चंद्र होय. ज्या योग्याच्या मेंदूतील हा “चंद्र” पूर्ण कलेने प्रकाशत असतो तो सर्व विषयांचा जाणकार होतो. त्याच्या शरीराला “कुंडलिनी जागृती” मुळे एक विदीर्ण अवस्था आणि देहाची अआत्यान्तिक आग ही या चंद्राने शमते. तसेच शिवाचा तिसरा डोळा म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये, आतल्या बाजूला असलेली “Pineal ” ग्रंथी होय. या ग्रंथीचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हात गेल्यावर ही ग्रंथी कार्यरत होते. म्हणजेच ती “Photo Sensitive ” असते. याचाच अर्थ तिला “प्रकाश दिसतो”. म्हणजे जो योगी प्रचंड साधना करून असा महासिद्ध होतो, परमहंस होतो त्याची ही प्रकाशाने जागृत होणारी ग्रंथी “महाजागृती” मिळून सारया जगातील [ त्रिलोकातील] भूत. वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळातील सारया गोष्टी त्या महायोग्यापुढे, त्याच्या “तिसरा डोळा अर्थात Pineal Gland पुढे दृग्गोचर होतात. एका साधकाने शंकर बनायचे आहे….. साधना करून.
वेगळ्या भाषेत शंकर म्हणजे कोण हे सांगायचे तर ते अणु केंद्रकातील “Neutron ” आहेत. की जो अधिक, वजा असा कोणताही विद्युत भार नसलेला असा शिवशंकरांनसारखा एक “विरागी, उदासीन” असा कण असतो. तो कोणत्याही रेण्वीय रचनेत प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याचे अस्तित्व आवश्यक सुद्धा असते आणि त्याची संख्या बदलली तर त्या अणूचे आणि त्या अणुमुळे बनलेल्या रेणूचे गुणधर्म बदलतात. असो. यामध्ये प्रोटोन हे विष्णू आणि इलेक्ट्रोन हे ब्रह्मा असे म्हणता येईल. अणु आणि रेणूंची रचना ही कमळा रमाणेच दाखवली जाते. आता त्यात खोलात जायला नको. अजून त्यांचे एक रूप हे विष्णू हे [त्रिविक्रम अर्थात tin पावलात जग व्यापणारे] उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि त्यामधील कोणताच ध्रुव गणला जात नसलेला एक भाग असे “तीन” पावलात जग व्यापणारे “चुंबक”, ब्रह्मा हे या चुंबकीय शक्तीला मायेची उपाधी लागल्याने निर्माण झालेली विद्युत, वीज किंवा वात आणि श्री शंकर हे या तिघांव्यतिरिक्त उरलेले “शेष” म्हणून “गुरुत्वाकर्षण” शक्ती ही होय. या “गुरुत्वाकर्षण” शक्तीच्या “शेष नागावर” चुंबकीय शक्ती किंवा श्री विष्णू हे पहुडलेले असतात आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव म्हणजे मायेच्या उपाधीने निर्माण झालेले विद्युत क्षेत्र हे होय.
एका शापामूळे शंकरांना पृथ्वीवर मूर्ती रुपात न पूजले जाता “पिंड” किंवा “लिंग” स्वरूपात राहावे लागते आहे. शिव हा शब्द ” विश” [म्हणजे प्रवेश करणे- विसा हा इंग्रजी शब्दही या वरूनच आला आहे अगदी अर्थासहित… ] या शब्दावरून आला आहे, आणि तो अक्षरश: त्याच्या कामाच्या स्वरूपावरूनच घेतला गेला आहे. त्याचा संबंध मी इथे सरळ सरळ न देता आपण तो पुढील संपूर्ण वर्णन वाचून लावून घ्यावा अशी विनंती करतो……
इथे जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती ही की, “विष्णू” हा शब्द “विष” या संस्कृत धातू वरून आला आहे. आणि या पोटफोड्या “ष” वाल्या “विष” या धातूचा अर्थ ” व्यापून रहाणे ” असा आहे. विष्णू हे हे जग व्यापून रहातात.
“पिंड” या शब्द जे सूक्ष्मात आहे तेच स्थुलात आहे, जे पिंड म्हणजे एक “पेशीत” आहे तेच देहात आहे आणि अणुरेणूत आहे तेच ग्रहमाला, आकाशगंगानमधेही आहे हे दर्शवतो.
लिंग आणि अंग असे देहाचे दोन भाग असतात. अंग हे मुख्य असते. शिवलिंग हे वरील लिंग आणि ज्यावर ते लिंग आहे ती शाळुंका अशा दोन भागांनी बनलेले असते. हे स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाचे प्रतिक आहे. त्यातून वाहणारे पाणी हे पवित्र नसून त्याज्य असते. ते पिवू किंवा अंगावर उडवून घेऊ नये. आणि म्हणूनच ते ओलांडायचे नसते. शंकरांच्या प्रदक्षिणेला “सोमसूत्री” प्रदक्षिणा असे म्हणतात. म्हणजे जिथे शाळुंका संपते तेथ पर्यंत जाऊन पुन्हा उलट फिरून उलट्या बाजूने शाळून्के पर्यंत जाऊन पुन्हा समोर येणे. इथे १ प्रदक्षिणा पूर्ण होते. प्रदक्षिणा म्हणजे- प्र- पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूला….आपल्या उजव्या बाजूला म्हणजे सव्य गतीने अथवा Clock Wise Direction ने पुढे जाणे म्हणजे प्रदक्षिणा… पृथ्वी,चंद्र, ग्रह, तारे, अणु, रेणू हे सगळे गतिशील आहेत. आणि तेही फिरत आहेत मग आपणही जर योग्य पद्धतीने फिरलो तर एक विधायक, निर्मितीक्षम आणि जीवन बदलून टाकणारे कार्य करत असतो. म्हणून प्रदक्षिणा करायची.
शंकरांची पिंडी ही स्त्री पुरुष मिलनाची प्रतिक असल्याने आणि पूर्वीच्या ऋषीनच्या अभ्यासानुसार त्यातून होणारी आत्यंतिक उर्जा निर्मिती ही रजस्वला म्हणजे पाळी चालू असलेल्या स्त्रियांच्या दृष्टीने घातक असल्याने त्यांनी शिव मंदिरात जाऊ नये असा दंडक होता. त्यात स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रश्नच नव्हता. आता सर्वांनाच जसे माहित आहे की पिरामिड च्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामूळे त्यातून अत्यंत अचंबित करणारी उर्जा निर्माण होते. त्यात भाजी, फळे, दुध कित्येक दिवस खराब न होता रहाते. ब्लेडला परत धार येते, आरोग्या साठी उपयोग होतो…वगैरे…त्या प्रमाणेच शिवपिंडीच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारा मूळेही प्रचंड उर्जा निर्मिती होते.
आपण जर नीट पाहिले तर सध्याच्या अणुभट्टीची रचना आणि कार्य हे देखील बरोबर शिवपिंडी प्रमाणेच चालते. त्यातही फिजन पद्धतीने अणु उर्जा निर्माण केली जाते आणि भोवती फिरवलेले पाणी गरम होते ते वापरून उर्जा निर्माण केली जाते, हेही पाणी त्याज्यच असते. अशीच उर्जा शिवपिंडीतही तयार होत असते.
सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात शंकरांची “बाराही ज्योतिर्लिंगे” आहेत. “ज्योती” या नावातच तेथील अग्नी दिसून येतो आहे. शिव पिंडीवरील भस्माच्या तीन पट्ट्यांमध्ये वेडेवाकडेपणा आला की पृथ्वीच्या पोटात काही हालचाल चालू आहे असे अनुमान लावीत असत. पूर्वी ऋषीनी असे अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते.
पिंडी मधेही ५ तत्वाननुसार आकाशलिंग, वायूलिंग, अग्निलिंग, जललिंग आणि भूलिंग किंवा पृथ्वीलिंग असे ५ प्रकार आहेत. आपल्याला माहित असलेल्या रामायणातील गोष्टीप्रमाणे श्री शंकरांनी रावणाला दिलेले लिंग हे “भूलिंग” होते. त्यामुळे ते त्याने पृथ्वीवर ठेवल्यावर पृथ्वीरूप होऊन गेले अर्थात चिकटले.
सर्प- जागृत झालेली कुंडलिनी शक्ती….हिचे वर्णन साडेतीन वेटोळी घालून बसलेला सर्प असेच आहे.
त्रिशूल – हा शब्द त्रि म्हणजे तीन आणि शूल म्हणजे टोचणे, टोचणारे हत्यार अशा अर्थाने झाला आहे. यात तीन काय तर १] त्रिलोक- भू- पृथ्वी, भुव: पृथ्वीवरचे अंतराळ आणि स्व: म्हणजे स्वर्ग, २] त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ ३] तीन मुख्य रिपू म्हणजे शत्रू – काम, क्रोध आणि लोभ या सर्वांवर विजय मिळवत्या साठी ज्याने हे जे साधनेचे हत्यार धारण केले आहे ते म्हणजे त्रिशूल.
डमरू- साधकाला आपल्या “नादाने” मंत्रमुग्ध करणारे हे डमरू वासने पासून सोडवते. हे वाजवताना चुकले तर त्यातील दोरयाला टोकाशी असलेल्या गाठी वाजवणारयाला जोरात लागतात. त्यामुळे एकाग्रता आणि कुशलता अतिशय आवश्यक. शिवाय ते चामड्यापासून बनवलेले असते. साधकाने त्याचे शरीर असेच उत्तम “ताणायचे” असते की त्यातून योगध्वनी निघावा.
गंगा- गं [ गम ] आणि गा अशा दोन शब्दांपासून हा शब्द बनला आहे. गम म्हणजे वेगाने फिरणे आणि “गा” म्हणजे धारण करणे, तिला रूप प्राप्त होणे होय. हे वेगाने फिरणारे जलतत्व शिव शंकरांच्या जटेत म्हणजे गुरुत्वाकर्षणामध्ये धरले जाऊन स्थिर होते. आणि नंतर मग “धरे” वर म्हणजे पृथ्वीवर सोडले जाते. पण इथे या गं चा उच्चार मधे “म”कार न घेता “न”कार घेऊन अनुनासिक असा म्हणजे नाकात करायचा आहे.
शिव शंकर जे वाघ्रचर्म परिधान करतात ते साधना करताना धारण केले तर साप, विंचू जवळ येत नाहीत. शरीरामध्ये उब रहाते. साधना करताना निर्माण होणारी वीज धरतीमध्ये निघून न जाता शरीरात फिरते.
रुद्राक्ष – शंकरांचा डोळा म्हणून ओळखले जाणारे हे फळ त्यावरील कमी अधिक रेघांमुळे एकमेकांपेक्षा वेगळे ओळखले जाते. हवेतील साधकाला आवश्यक लहरी शोषून घेणे हे यांचे काम. याचे पाणी हृदय रोगांवर गुणकारी आहे.
भस्मलेपन- भस्मामध्ये वनस्पती मधील अनेक गुणकारी द्रव्यांची “Oxides ” असतात. जी पोटात घेण्याने आणि शरीराला वरून लावल्याने गुणकारी सिद्ध होतात. तसेच भस्म शरीराला वरून लावल्याने शरीराचे थंडीपासून आणि आसपासच्या किडे, विंचू यापासून संरक्षण होते. अर्थात ह्या सारया गोष्टी जे साधक रानावनात साधना करतात त्यांच्यासाठी आहेत. तुम्ही घरात असा सगळ्या अंगाला भस्म फासून फिरण्याचा प्रयोग केलात तर घरची मंडळी, पत्नी, मुले चिंचेच्या फोकाने फटकावून घरातून हाकलवून देतील…….हाहाहा……
खडावा- पायातील लाकडी खडावा घालून फिरणे हे अतिशय अवघड असते. पाय, बोटे चालता येणार नाही इतके दुखतात. मनावर विजय मिळवण्यासाठी आणि तेथील अक्यूप्रेशरचे बिंदू दाबले जावेत म्हणू या खडावानचा उपयोग केला जातो. खडावा वापरल्याने पोट, पौरुष ग्रंथी, आणि मेंदूचे काम सुधारते.
कमंडलू- स्वत:च्या शक्तीने भारीत केलेले पाणी यात ठेवले जात असे. याचा वैशिष्ट्यपूर्ण आकारही यातील पाण्याची शक्ती वाढवण्या साठी उपयुक्त असाच असतो.
आपले ऋषी मुनी हे फार मोठे संशोधक होते. फक्त त्यांची परिभाषा वेगळी होती, आपली आजची विज्ञानाची परिभाषा वेगळी म्हणजे मुख्यत:ग्रीक आहे. पण म्हणून ऋषी हे चुकीचेच होते असे अभ्यास न करता म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातील अर्थ नेहमीच्या आणि आजच्या काळाशी सुसंगत असा, शोधून काढणे हे आपले परमकर्तव्य आहे.
शिव शंकर हे तिन्ही काळ, त्रिलोक, जन्म, स्थिती आणि मृत्यू या तीनही अवस्थांना जिंकणारे आहेत म्हणून ते त्रिशूलधारी. अणु अवस्थेत ते “विरागी, संन्यासी म्हणजेच “Neutron” म्हणजे जे Neutral राहतात…[विष्णू हे प्रोटोन आणि ब्रह्मा हे इलेक्ट्रोन].त्यांचे “तांडव नृत्य” अणुगर्भात सततच चालू असते.
शिवलिंगाची २२ नावे आणि मंत्र पुढीलप्रमाणे:-
निधनपतये नमः।
निधनपतान्तिकाय नमः।
ऊर्ध्वाय नमः।
ऊर्ध्वलिङ्गाय नमः।
हिरण्याय नमः।
हिरण्यलिङ्गाय नमः।
सुवर्णाय नमः।
सुवर्णलिङ्गाय नमः।
दिव्याय नमः।
दिव्यलिङ्गाय नमः।
भवाय नमः।
भवलिङ्गाय नमः।
शर्वाय नमः।
शर्वलिङ्गाय नमः।
शिवाय नमः।
शिवलिङ्गाय नमः।
ज्वलाय नमः।
ज्वललिङ्गाय नमः।
आत्माय नमः।
आत्मलिङ्गाय नमः।
परमाय नमः।
परमलिङ्गाय नमः।
गोपाल तपाणि उपनिषदात शिवलिंगाची महत्ता अद्भुत पद्धतीने सांगितली गेली आहे.
तत्र द्वादशादित्या एकादश रुद्रा अष्टौ वसवः सप्त मुनयो ब्रह्मा नारदश्च पञ्च विनायका वीरेश्वरो रुद्रेश्वरोऽम्बिकेश्वरो गणेश्वरो नीलकण्ठेश्वरो विश्वेश्वरो गोपालेश्वरो भद्रेश्वर इत्यष्टावन्यानि लिङ्गानि चतुर्विंशतिर्भवन्ति॥
अर्थात: बारा आदित्य, अकरा रुद्र, आठ वसु, सात ऋषी, ब्रह्मा, नारद, पांच विनायक, वीरेश्वर, रुद्रेश्वर, अंबिकेश्वर, गणेश्वर, नीलकण्ठेश्वर, विश्वेश्वर, गोपालेश्वर, भद्रेश्वर आणि २४ अन्य शिवलिंगांचा इथे वास आहे!!!!
मी लिहिलेली शिवस्तुती :-
ओम नम: शिवाय, घुमू दे, मनात रे देवा,
या विश्वाचा तू “कर्ता” “धर्ता” संहारक देवा !! धृ !!
मन रमू दे साधनेत जे विषयी रमलेले,
आता तरी रे राहो नामी, दिन जे उरलेले,
घडू दे सेवा जन्मो जन्मी, नको मोक्षाचा मेवा…..!! १ !!
तूच गुरुंचा आद्य गुरु तुज, हर, भैरव म्हणती,
लवकर होसी प्रसन्न भक्ता, आशुतोष जपती,
गौरीशंकर, कैलासनाथा, शंभू महादेवा …..!! २ !!
अवतरलासी पृथ्वीवरती, “ज्योती” स्वरूपाने ,
धावे मागून पार्वतीमाता तुडवीत भवराने,
कलादास मी प्रार्थित प्रभुजी, पदी मजसी ठेवा….!! ३ !!
ठेवा- २ अर्थ- १] राहू देणे, ठेवणे २] मिळकत, साठवण, पुंजी
भवराने – २ अर्थ – १] या भौतिक जगातील दु:खाची राने २] भंवर- भुंग्याप्रमाणे या फुलावरून त्या फुलावर शोधत शोधत जाणारी पार्वती माता ….
आशुतोष- आशु- लवकर/ तोष- प्रसन्न होणे, प्रसन्न होणारा …म्हणून जो लवकर प्रसन्न होतो असा तो म्हणजे शंकर…..
शिवरात्र ही शिवशंकर यांच्या जवळ सुलभतेने नेणारी रात्र आहे. आणि महाशिवरात्र तर अजून उत्तम. “ओम नम: शिवाय” हा सोपा, सुलभ मंत्र तुम्हाला या महाशिवरात्रीच्या उपासनेने उत्तम फल देईल. या सोप्या मंत्रात आजच्या कलियुगातला अनुसरून अर्थात आजच्या युगात वासना खूप वाढलेली असल्याने आणि या वासनेचा संबंध पृथ्वीतत्वाचे मूलाधार चक्र आणि जलतत्वाचे स्वाधिष्ठान चक्र यांच्या जास्त येत असल्याने पृथ्वी तत्वाचे बीज “श” आणि जलतत्वाचे बीज “व” हे यात वापरलेले आहे. “य” हे जसे अक्षर आहे तसा तो तरंग सुद्धा आहे. आणि हे “य” हे अक्षरच मंत्राला त्याच्या योग्य जागी नेत असते म्हणून ते प्रत्येक मंत्रात असतेच. [ जसे ओम गं गणपत”ये” नम”, ओम हुम हनुमत”ये” नम” वगैरे वगैरे……..] नम म्हणजे मी नमन करतो. माझ्यातील “मी” काढून टाकतो. माझे मन “न”मन” म्हणजे मनरहित करतो. ओम हे ब्रह्माचे वाचक अक्षर अथवा शब्द आहे. तो आदी ध्वनी आहे. “शि” मध्ये “ई” हे शक्ती देणारे अक्षर [ स्वर ] म्हणजे शिवाची कार्यकारी शक्ती इथे सोबत आहेच. त्यामुळे तुम्ही ओम नम: शिवाय म्हंटले की शिवशंकरान बरोबर पार्वती मातेची उपासना झालीच. या मंत्राच्या जपाने मन शांत होते. वासना कमी होतात. शरीरातील उष्णता कमी होते. आणि उपासना, जप जसजसा वाढत जाईल तसतशी प्रगती होत जाते. मनाला अपार आनंद मिळतो.

कवी Dr हेमंत उर्फ कलादास,
हेमंत उद्धव सहस्रबुद्धे,
मोबाईल नंबर – 7620750034

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button