ताज्या घडामोडी

मानवा का चिंता वाहतो..!

मानवा का चिंता वाहतो..! का चिंता वाहतो..!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/02/2025 : 
जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसाला कठोर परिश्रम करावे लागतात. अनेकदा मेहनत घेऊन आणि त्या कामात स्वतःला झोकून देऊनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यामुळे व्यक्ती निराश, दुःखी होतो. जेव्हा सर्वत्र अडचणी दिसू लागतात, मार्ग सापडत नाही. तेव्हा राष्ट्रसंताची ग्रामगीतेची शिकवण लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामगीता तुम्हाला अडचणीतून बाहेर निघण्यास मदत करेल.
मानवा का चिंता वाहतो ।
होणारे ते चुके न केव्हा ।
प्रभु सगळे पाहतो ।।धृ।।
प्रारब्धाचे भोग कोणालाही चुकत नाही. अगदी देवालाही प्रारब्ध भोगावेच लागते. प्रारब्ध म्हणजे भूतकाळातील कर्माचा तो भाग जो वर्तमान शरीरासाठी जबाबदार आहे. प्रारब्ध भोग म्हणजे मागच्या जन्मात केलेल्या कर्माचे भोग. पृथ्वीतलावर आपल्याला मनुष्य जन्म मिळाला हे नशिब आहे. तर त्या देहाचे आपल्याला सार्थक करता आले पाहिजे. चिंता म्हणजे एक भावनिक अवस्था. घाबरटपणा, ताण, तणाव, हृदयाची धडपड म्हणजेच चिंता होय. चिता म्हणजे मृतदेह दहनासाठी वापरली जाणारी लाकडांची रास होय. मानवाने परिणामाची चिंता न करता कर्म करा. चांगल्या कर्माचे फळ आपल्याला मिळेलच. कष्ट करुन सुद्धा काम होत नाही तेव्हा माणुस हतबल होतो. अशा स्थितीत माणसाने भगवंताचे स्मरण करावे. देवावर विश्वास ठेवा कारण परमेश्वर सर्व काही पाहतो आणि तो आपल्या पाठीशी असतो.
नर जन्माला आला जेव्हा ।
तू कधी केले होते कामा ।
परी तुझ्या पोटाची कळकळ ।
जन्मताची वाहतो ।।१।।
८४ लाख योनी फिरुन तू जर जन्माला आला. जन्म घेतल्या बरोबर तू कोणते काम केले. तरी तुझ्या पोटाची भूक भागविण्यासाठी तुझ्या जन्मापासून पाहतो आहे. बाळाचा जन्म झाल्याबरोबर आईला बाळाची भूक भागविण्यासाठी दुध येते आणि बाळाला स्तनपान केल्या जाते. एवढं सारं परमेश्वर करीत असतो. ज्याप्रमाणे पोटाची भूक महत्त्वाची आहे तसेच ज्ञानाची भूक असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, “सारी दुनिया का तूही करणधार है । बिना तेरे ना किसीको लगापार है ।।” सर्व जगाचा कारभार पाहणारा ईश्वर आपली पोटाची कळकळ जन्मताच वाहत असतो. तो तर जगाचा कर्णधार आहे. तोच ईश्वर सर्वांच्या प्राणाचा सरदार आहे. तोच आपल्याला जीवंत राहण्यासाठी श्वास पुरवित असतो.
अजगर पडला पडुनी राही ।
चालतसे मुंगीच्या पायी ।
अचूक त्याची खळगी भरण्या ।
जागीच कुणी दाहतो ।।२।।
अजगर हा प्राणी मुंगीच्या पावलाने चालतो, त्याचे शरीर त्याला सांभाळता येत नाही. तरीपण त्याच्या पोटाची भूक कशी भागत असेल बरं ! अजगर हा बिनविषारी साप आहे. तरी ईश्वर त्याच्या पोटाची खळगी भरण्याकरिता एखाद्या जंगली उंदीर व ईतर छोटे प्राणी त्याचे मुखाजवळ पाठवितो. कुणालाही चिंता करण्याचे मुळीच कारण नाही. परमेश्वर सर्व काही पाहतो. उदाः- एक श्रीमंत सावकार होता त्याचेकडे अलोट संपत्ती होती. पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नव्हत्या. त्याच्या मनात काहीतरी विवंचना होती. खरोखरच ईश्वर सगळं पाहतो कारण तुम्ही मुळीच चिंता करु नका.
पोपट-मैना मारी भरारी ।
कुठले त्यांना स्थान नोकरी ।
परी चरुनिया रोजची येती ।
मन्मनि उत्साहती ।।३।।
पोपट दिसण्याच्या, वागण्याच्या आणि माणसाशी संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये अत्यंत अनोखे आहेत. पोपट-मैना ह्यांना कुठे काम, नोकरी आहे काय? तरी रोजच उंच आकाशात भरारी मारुन आपले अन्न, फळ खाऊनी येतात. त्यांच्या मनात सदा आनंद वसतो. ईश्वर सर्व पशु, पक्षी, मानव यांच्यावर प्रेमच करीत असतो. आपली श्रद्धा जिथे असते तिथे ईश्वर आपल्या बरोबर असतो.
म्हणुनी सांगतो स्मर तू हरिला ।
विसरु नको रे सहकार्याला ।
तुकड्यादासा अनुभव ऐसा ।
घडी घडी मज राहतो ।।४।।
तुमच्याकडे सर्वकाही आहे, मुबलक असेल तर देण्यास काहीच हरकत नाही. समुद्रातील पाण्यातून बादली भर पाणी काढल्याने काहीच फरक पडत नाही. ईश्वराचे नामस्मरण केल्यामुळे तुमचा आत्मविकास वाढतो. ईश्वर दयाळू आहे, तो आपले रक्षण करतो तर मानवाकरिता जीवन ईश्वरच देतो. आपण त्याची भक्ती का करु नये. राष्ट्रसंत म्हणतात की, “हरीगुण गाऊ चला.” हरीचे गुण गाण्यातच सहकार्याला तू विसरु नकोस. सहकार्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात. सहकार्यामुळे समाजाच्या विकासासाठी मदत होते. समाज सेवा हिच ईश्वर सेवा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अनुभव आला आहे, तो म्हणजे “भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी । धावोनिया सगळ्यांची कामे करी ।।” जो हरीचे स्मरण करतो, त्याचे मदतीला साक्षात् विठ्ठल धावून येतो आणि भक्तांची कामे करीत असतो.
संत गोरोबांचे घरी विठ्ठल माती वाहू लागतो आणि चिखल तुडवून मडके घडवितो. संत रोहीदासाचे घरी चामडे रंगवू लागतो आणि जोडे शिवतो. संत सावता महाराजांचे शेतात खुरपू लागतो. “देवाचाही देव करितो भक्तांची चाकरी ।” संत जनाबाईचे दळण दळितो. संत एकनाथ महाराज यांचे घरी श्रीखंड्याचे रुपात पाणी वाहतो. संत चोखामेळा महाराजांना ढोरे ओढू लागतो. भक्तांच्या घरी देव कामधंदा करतो. तसेच सुदामाचे पोहे प्रेमाने खातो, संत कबिराच्या मागावर बसून शेले विणतो. विदुराच्या घरी कण्या खातो. महाभारत युद्धात अर्जूनाचा देव सारथी होतो. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ईश्वराचा अनुभव घडोघडी राहतो. भक्ती आणि विश्वास ईश्वरावर एवढा करा की, आपल्यावर संकट आले तरी त्याची चिंता ईश्वराला यायला हवी. “देव राहे भक्ता घरी, काय पाहता मंदिरी ।।” भक्तांच्या घरी न सांगता सर्व कामे देव करतो. माझं या जगात भगवंताशिवाय कुणीच नाही. त्याच्या नामात एवढं एकरुप होतो, अशाच भक्तांच्या घरी देव कामे करतो.
बोधः- चिंता करु नका. निष्काम कर्म करा. भगवंतासाठी भगवंत हवा. अशी आपली वृत्ती असावी म्हणजे नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा राहावा आणि तुला काय पाहिजे? असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे ! हे मागणे त्याच्याजवळ मागणे. यालाच निष्कामता म्हणतात. कारण रुपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहिसा होईल. पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की, त्याला आपल्याकडे येणे जरुर आहे म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भागगडीत न पडता भगवंता साठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button