खा.धैर्यशिल मोहिते पाटील यांनी कुर्डूवाडीत रेल्वे कामाची केली पाहणी

खा.धैर्यशिल मोहिते पाटील यांनी कुर्डूवाडीत रेल्वे कामाची केली पाहणी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23 जानेवारी 2025 : माढा लोकसभा मतदारसंघातील कुर्डूवाडी शहरात असलेल्या रेल्वे जंक्शन व वर्कशॉपचा विशेष आढावा घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दौरा केला. रेल्वेच्या विविध प्रश्नांवर संसदेत चर्चा घडवून आणणे आणि रेल्वे मंत्र्याकडून मंजुरी मिळवण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्याच्या वेळी सोलापूर रेल्वे विभागाचे वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, मुख्य वाणिज्य निरीक्षक अतुल लोहकरे, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार मोहिते पाटील यांनी ब्रिटिश काळातील ऐतिहासिक रेल्वे वर्कशॉपची पाहणी केली, जिथे मालवाहतूक वॅगन दुरुस्तीचे काम केले जाते. पूर्वी या वर्कशॉपमध्ये 1500 कामगार होते, पण सध्या केवळ 300 कर्मचारी कार्यरत असल्याने वर्कशॉपची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यानंतर मोहिते पाटील यांनी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या नव्या पाचव्या प्लॅटफॉर्मची पाहणी केली. त्यांनी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या विविध सुविधा, स्वच्छतागृह, अपंगांसाठी रॅम्प, आणि प्लॅटफॉर्म जोडण्यासाठी पूल उभारण्याच्या सूचना दिल्या.
भुयारी रेल्वे मार्गाचा आढावा
गेट क्रमांक 38 येथे सुरू असलेल्या भुयारी रेल्वे मार्गाच्या कामाची पाहणी करताना मोहिते पाटील म्हणाले, “गेल्या साडेपाच वर्षांपासून या रेल्वे गेटच्या बंद झाल्याने कुर्डूवाडी शहर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. भुयारी मार्गामुळे शहराला पुन्हा जोडले जाईल आणि व्यापारी वसाहतींच्या विकासाला चालना मिळेल.” त्यांनी हे काम गुणवत्तापूर्ण व लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये संजय टोणपे, अमर माने, दत्ता गवळी, विजयसिंह परबत, फिरोज खान, विजय भगत व इतर मान्यवर उपस्थित होते..