“मेरा पाणी उतरते देख मेरे किनारे घर मत बसाना !”

“मेरा पाणी उतरते देख
मेरे किनारे घर मत बसाना !”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/01/2025 :
“मेरा पाणी उतरते देख
मेरे किनारे घर मत बसाना !”
हे आहेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ यांचे चपखल शब्द जे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडवणारे होते. त्यामुळे कालपर्यंत विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिल्लक शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असा अवसानघातकी आव आणत होते. खरे पण देवाभाऊंचे “मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे घर मत बसाना, क्योंकी में समंदर हूं, फिरसे वापस लोटके आऊंगा !” याचा अर्थ ठाकरे गटाला समजला असावा म्हणून कालचा सिल्व्हर ओकवर मेलोड्रामा झाला आहे. माझ्या राजकीय कारकीर्दीला काही काळ ओहोटी जरुर लागली असेल. पण पुन्हा ज्यावेळी भरती येईल त्यावेळी तुमचं तकलादू राजकारण मी पुरत मुळासकट उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही हा देवाभाऊंच्या शब्दांचा शब्दशः अर्थ आहे .
तर या देवाभाऊंचे शब्द ना शब्द काही विकाऊ पत्रकारांनी एक नंबरचे ठरवलेले माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चांगलेच मनावर घेतले म्हणून तर काल ते विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासह उरल्यासुरल्या काफील्यासह शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर डेरेदाखल झाले , वास्तविक उद्धव ठाकरे यांच राजकारण शरदचंद्र पवारसाहेब यांना जवळून माहिती आहे. कारण ते केवळ स्वार्थ असेल तर आणि तरच जेवढं चालायचं तितकंच पायताण कापतात अन्यथा ते समोर दिसला तरी कुणाला सुध्दा हिंग लावून विचारत नाहीत.
आता साधारण मे महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असेल म्हणण्यापेक्षा त्या निकालाच्या प्रतिक्षेत असतील अशा वेळी आपल्या उरल्यासुरल्या शिल्लक शिवसेनेची डाळ शिजायची असेल तर शरदचंद्र पवारसाहेब यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. अर्थात पवारसाहेब यांच्या शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीत फारशी सोडा यत्किंचितही ताकद आहे आहे का ॽ हे तपासून पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे दोनशे अठ्ठावीस प्रभागात त्यांचे कसेबसे दहा ते बारा नगरसेवक निवडून येतील इतकी बेताची परिस्थिती आहे. पण पवारसाहेब यांच्या करामती बाराच्या बारा असल्याने त्यांना बारामतीचे उचापतखोर म्हणून राजकारणात संबोधले जाते. अर्थात जे कोण अशा बिरूदावल्या साहेबांना लावतात ते काही केल्या माझ्या पचनी पडत नाही. पण माझ्या हो किंवा नाही याला बाजार बसव्यांच्या बाजारात कवडीमोल किंमत नाही. तर असो .
पवारसाहेब यांच्या हाती राजकीय खुळखुळा दिला की त्या खुळखुळ्याच्या नादामुळे दिल्लीतला काॅंग्रेसच्या दोऱ्यांना लकवा भरलेला पाळणा किमान न कुरकुरता इकडून तिकडे झुलत तरी राहिलं असं उध्दव ठाकरे यांचा राजकीय ठोकताळा असू शकतो , कारण पवारसाहेब यांच्या हाकेला ओ देत देत काॅंग्रेस महाराष्ट्रातून मागील पंचवीस वर्षांपूर्वीच पुरती हद्दपार झाली. आता जी काही औषधाला शिल्लक आहे ती सुद्धा एकदा हद्दपार झाली की आपसूकच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तडीपार झाली म्हणून आताच समजायला हरकत नाही. कारण मुंबई महापालिका निवडणुकीत या महाविकास आघाडीचा महापौर कुणाचा यावरुन एकदा का कलगीतुरा रंगला की जसं विधानसभा निवडणुकीत झालं त्याची प्रचिती या निवडणुकीत येणार यात काही शंका नाही. मग हे तिन्ही पुरते भुईसपाट झालेले पक्ष राजकीय द्रष्ट्यीने विवस्त्र अवस्थेत नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रात कुंभमेळ्याच्या निमित्ताने यथेच्छ डुबकी मारायला तयार होतील. कारण त्यानंतर पुढील चार वर्षांत राज्यात किंवा देशात कोणत्याही अती महत्वाच्या निवडणूका नाहीत. त्यामुळे तर याची रणनिती मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी अगोदरच तयार करून त्या नैपथ्यात तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा कणा मोडून विभक्त करत अलगदपणे मुख्यमंत्रीपदाच्या उबदार गुबगुबीत खुर्चीवर स्थानापन्न केले व नंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीचा कणा तोडून मोडून अजितदादा पवार यांना कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री पदाचे चाटण लावले.
या साऱ्याचा अर्थ असा की समुद्राला भरती ओहोटी येतच असते. याचा अर्थ ओहोटी आली म्हणून कुणी समुद्राच्या किनाऱ्यावर घर बांधून बघण्याचा साधा प्रयत्न सुध्दा करु नये. कारण ज्यावेळी भरती येते त्यावेळी बांधलेले घर क्षणार्धात कधी भुईसपाट होईल हे सांगता येत नाही. अगदी अशाच पध्दतीचा इशारा मुख्यमंत्री देवाभाऊंनी दिला होता. पण आपणच शहाणे या नादात दस्तूरखुद्द शरदचंद्र पवारसाहेब आणि शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याकडे डोळेझाक केली याचा हा परिणाम आहे. त्यामुळे कुणालाही कमी समजू नका ?
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक