डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारीता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारीता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 6 जानेवारी 2025 : आज 6,जानेवारी मराठी पत्रकार दिन याच दिवशी बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण चा जन्म झाला दर्पण पासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता डिजिटल कधी झाली हे कळलेच नाही.स्वातंत्र्यलढा, देशांतर्गत सामाजिक राजकीय संघर्ष तसेच सामाजिक सुधारणा, जनमाणसांचे हक्क अधिकार यासाठी मराठी पत्रकारितेनी एक चळवळ उभी केली हे फार महत्वाचे आहे.यामद्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा आणि आणीबाणीच्या काळातही मराठी पत्रकारितेने आपली धार कुठेही कमी होऊ दिली नाही त्यासाठी कोणतीही आव्हाने पेलायची तयारी मराठी पत्रकारितेने ठेवली होती.
परंतू या पत्रकारितेच्या विविध प्रवाहांमध्ये आणखी एका पत्रकारितेचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरते ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठीतून पत्रकारितेला सुरुवात करून कोट्यवधी दीनदुबळ्या लोकांना संघर्ष करण्यास प्रेरणा दिली . त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर त्यातून कोट्यवधी लोकांना आपले हक्क आणि अधिकार यासाठी संघर्ष करायला आणि लढायला शिकवले व या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील पिचलेल्या व अन्यायग्रस्त शेवटच्या समूहाला सामाजिक प्रवाहात आणून समताधिष्ठित स्थान मिळवून दिले व खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारिता समृद्ध केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे मराठी पत्रकारितेतील एक सोनेरी अध्याय आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच मला आजच्या या मराठी पत्रकारदिनाच्या दिवशी त्यांच्या पत्रकारिते शिवाय हा दिवस पूर्णच होऊ शकत नाही असे वाटते. त्याच कारण ही तसेच आहे ते म्हणजे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा प्रवास हा त्यांच्या जीवनासोबतच झाला. ते म्हणजे 1920 मध्ये मूकनायक सुरू करण्यापासून ते 1956 ला प्रबुद्ध भारत सुरू करण्यापर्यंत म्हणजेच एकूण 36 वर्षांच्या काळात डॉ. आंबेडकरांनी आपल्या प्रचंड मोठ्या कामाचा व्याप सांभाळून पत्रकारिता केली. म्हणजे जीवनाच्या शेवट पर्यंत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
सर्वात महत्वाचं तो काळ नेमका कसा होता हा साधा विचार जरी केला तरी एखाद्याची बुद्धी बंद पडते अशा काळामध्ये सर्वसामान्य जनतेला जर न्याय द्यायचा असेल त्यांचे प्रश्न जर जगाच्या वेशीवर पोचवायचे असतील तर कोणत्याही परिणामाची परवा न करता पत्रकारितेचा हा निर्णय त्यांनी घेतला. ह्यातूनच त्यांच्यामधील जनसामान्याचा एक प्रामाणिक पत्रकार मला दिसतो. बऱ्याचदा आपण वेगवेगळी वृत्तपत्रे वाचतो. त्यातून नक्कीच आपणाला चालू घडामोडी वा वेगवेगळा इतिहास समजतो. परंतु मी ज्यावेळेस बाबासाहेबांची पत्रकारिता वाचतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक मानवी आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. हे सर्व करत असताना डॉ, बाबासाहेब आंबेडकरांना सहज करता आले नाही. त्यांच्या जीवनात जसा संघर्ष होता तसाच संघर्ष त्यांच्या पत्रकारितेतही होता म्हणून त्यांची पत्रकारिता संघर्षाच्या अग्निदिव्यातून प्रज्वलित झालेली होती आणि त्याचा घाव इतका भयानक होता की त्या काळची प्रस्थापित विषमतावादी व्यवस्था थरथर कापत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनेक पदांनी सन्मानित आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार, अर्थतज्ज्ञ, भारताचे पहिले कायदे मंत्री, शिक्षणाचे पुरस्कर्ते, स्त्री उद्धारक, ज्ञानाचे प्रतीक, पत्रकार व त्यांची पत्रकारितादेखील सर्वोच्च प्रतीची असताना देखील त्याबद्दल फारसं बोललं जात नाही हे मनाला न पटण्यासारखे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ सुरू केले होते. त्यावेळी वर्तमानपत्रं ही एका विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी असून त्यांना बहिष्कृत वर्गातील जनतेच्या सुख-दुःखाची पर्वा न्हवती. म्हणून त्यांनी या विषमतावादी व्यवस्थेला हादरा देण्यासाठी मूकनायक सुरू केले. परंतु त्याकाळी एखांदे वृत्तपत्र काढणे म्हणजे सोपे काम नव्हते यासाठी डॉ, बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी 2500 आर्थिक सहाय्य केले व मूकनायकाचा जन्म झाला आणि पुढे इतिहास घडला. त्याचच उदाहरण या मूकनायकाची धास्ती प्रस्थापित व्यवस्थेने एवढी घेतली होती की मूकनायकची जाहिरात ‘केसरी’मध्ये द्यावयाची होती. त्यावेळी लोकमान्य टिळक हयातही होते. पण तेव्हा पैसे देऊनही ही मूकनायकाची जाहिरात द्यायला ‘केसरी’ने तयारी दर्शवली नव्हती.
यावरुन आपल्या हे लक्षात येऊ शकते की अस्पृश्य वर्गाच्या प्रगतीसाठी त्या काळात वृत्तपत्र पोषक नव्हती हे समजते.
‘गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करुन द्या म्हणजे तो पेटून उठेल,’ हे ब्रीदवाक्य घेऊन डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली मराठी पत्रकारिता ही पत्रकारितेतील मैलाचा दगड ठरली हे नक्की.
म्हणूनच आज पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, आपला विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, असंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नावं मूकनायक ठेवलं होतं. पत्रकारांनी लोकांना नवी दृष्टी द्यावी, त्यातून पत्रकार खरच आपलं कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतो तेव्हा लोकशाही त्यांच्या बाजुने उभी राहील.
आजची शोधपत्रकारिता ही एका बंद खोलीतील चोर, पोलीस ह्या भातुकलीच्या खेळा सारखी करून टाकली आहे.ज्या ठिकाणी चोर आणि पोलीस हेच जर मित्र झाले तर जनतेला न्याय कसा मिळणार?
“पत्रकारिता हा खूप मोठा सामाजिक दुवा आहे” हे चित्र तेंव्हाच बदलू शकते जेंव्हा ह्याकडे एक व्यवसाय म्हणून पहाणे बंद केले जाईल तेंव्हाच ह्या लोकशाहीचा खांब मजबूत होईल, तेंव्हाच बाबासाहेबांच्या विचारांचा मूकनायक इथे जन्म घेईल हे नक्की.
सर्वाना पत्रकार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
अभिजित वजाळे(9637798962)
माळीनगर ता. माळशिरस जि.सोलापूर