वृक्षवल्ली साठी ‘ कैलास स्मशानभूमी ‘ चा अनोखा प्रयोग

वृक्षवल्ली साठी ‘ कैलास स्मशानभूमी ‘ चा अनोखा प्रयोग
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 4 जानेवारी 2025 :
‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ‘ हे ब्रिद वाक्य सर्वतोमुखी असलं तरी त्याचं अवलोकन करून ते प्रत्यक्षात आचरणात आणणे हे फार महत्त्वाचे आहे कारण लोकसंख्येची अविरत होणारी वाढ आजच्या काळातील मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यात राजरोसपणे मानवाच्या सुखसमृद्धीसाठी झाडांची होणारी बेसुमार कत्तल यामुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय कारण पृथ्वीची फुफ्फुसे कार्यक्षम होण्यासाठी झाडांची निकोप वाढ आवश्यक आहे , पण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मानव फुफ्फुसांवरच घाव घालून येणाऱ्या पुढच्या पिढीची वाट बिकट करत आहे कारण वृक्ष ही कार्बन डायॉक्साईड शोषून घेऊन ऑक्सीजन सोडतात अर्थात हे सर्व तहयात सुरू राहण्यासाठी मानवाची सजगता आवश्यक आहे .
अर्थात सगळीकडे अंधार असला तरी आजही जगात झाडे जगविण्यासाठी चिपको आंदोलनाचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांच्यासारखे लाखो बहुगुणांची व बिश्नोई समाजातील विचारांची गरज आहे कारण बिश्नोई समाजात वृक्ष आणि प्राण्यांना अनन्य साधारण महत्व आहे तर असो पण त्यातून नव्या पिढीची उभारणी करून केवळ झाडे जगली पाहिजेत असे नाही तर ती लावली पाहिजेत हे अंतर्मुख होऊन विचार केला तेंव्हा त्याची जाणीव झाल्याने बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा राजेंद्र चोरगे यांनी सातारकरांना भावनिक साद घालत त्यांच्या हाती त्यांच्याच आप्तस्वकीयांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी व त्यांच स्मरण व्हावे म्हणून त्यांना एका झाडाचे रोपटे व सेंद्रिय खताची एक पिशवी मोफत देण्याचा एक नवा उपक्रम येथील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कैलास स्मशानभूमीच्या माध्यमातून मागील वर्षी सुरू केला आहे .
राजेंद्र चोरगे व त्यांच्या प्रगल्भ बुद्धीमत्तेच्या दूरदृष्टीतून साताऱ्यात संगम माहुली परिसरात कैलास स्मशानभूमीची निर्मिती झाली तेंव्हापासून या परिसराचा सातत्याने केवळ विकास होत आहे असे नाही तर सामाजिक दृष्ट्या कायापालट सुध्दा होत आहे , कारण जेथे कमी तेथे आम्ही ‘ याच ब्रिद वाक्याला साद घालत बालाजीने स्मशानभूमीचे सारे चित्रच पालटले आहे कारण आपल्या निकटवर्तीयांना अखेरचा निरोप देताना जीव कासावीस होतो पण या निरोपाला देखील पर्यावरणाची चांगली किनार असेल तर त्या दुःखदायक परिस्थिती सुध्दा मानवाच्या मनाला काही काळ विसावा मिळावा हे या परिसरात आल्यानंतर नक्कीच जाणवते , यासाठी स्मशानात मृतदेह दहन करण्यासाठी लाकडांचा नाही तर शेणींचा वापर केला जातो परिणामी झाडांवरची संक्रांत टळली जाते शिवाय अस्थी विसर्जनानंतर उरणाऱ्या राखेतून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते हे तर अद्वितीय आहे त्यात पुन्हा एक पाऊल पुढे टाकत शेणींचा सुध्दा किमान वापर केला जावा या दृष्टिकोनातून आता याच परिसरात गॅसवर चालणाऱ्या दोन विद्युत दाहिनीची देखील निर्मिती अगदी चपखलपणे सुरू करण्यात आली अर्थात त्यासाठी उद्योगपती जुगलकिशोर कलाणी यांच्यासह अन्य एका उद्योजकाने मनाचा मोठेपणा दाखवत आथिर्कदृष्ट्या सहकार्य केले .
वास्तविक बघायला ही छोटीशी वाटणारी गोष्ट अजिबात पुरेशी नाही म्हणून राजेंद्र चोरगे यांनी मागील वर्षी मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना निसर्गा बरोबर पशुपक्ष्यांच्या उपयोगी असणाऱ्या पेरू , चिंच ,आवळा व कडूनिंब अशा प्रकारच्या अनेक रोपांपैकी एक रोपटे व सेंद्रिय खताची एक पिशवी भेट मोफत देऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले त्यामुळे आजवर पंधराशेहून अधिक रोपांचे वाटप केल्याने मयत व्यक्तींची एका प्रकारे पुजाच केली जाते , परिणामी त्याची व्यवस्थित देखभाल होते की नाही याचा उहापोह देखील घेतला जात आहे तर अशा या अनोख्या प्रयोगामुळे झाडांची होणारी कत्तल काही प्रमाणात थांबणार तर आहे शिवाय नविन झाडांची निर्मिती सुध्दा वाढीस लागणार यात काही शंका नाही त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नक्की मदत होईल त्यामुळे अशा प्रकल्पांना समाज माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यात काही नवल नाही .
जगातील वन संरक्षणाच्या बाबतीत भारताने सन -१९५२ मध्ये संसदेत कायदा करून जमिनीच्या एकूण क्षेत्रफळापैकी तेहतीस टक्के जमीन वनासाठी आरक्षित केली खरी पण आज परिस्थिती अशी आहे की केवळ सात ते आठ टक्के जमीन वनासाठी उपलब्ध आहे ही अधोगती महाभयानक आहे कारण मागील पन्नास वर्षांत निम्मी वृक्ष संपुष्टात आणली म्हणून तीन अब्ज हेक्टरवरील जमीन बोडकी झाली आहे , परिणामी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे आपसूकच पर्यावरणाचा समतोल पुरता ढासळून गेलाय मग त्याकडे शासकीय माध्यमातून दरवर्षी २१ मार्चला जागतिक पर्यावरण दिनाचा घाट घातला जातो पण त्यातून नक्की किती प्रमाणात नव्याने वृक्षांची लागवड होते व ती टिकवली जातात हा संशोधनाचा विषय आहे ,अर्थात प्रत्येक गोष्ट शासनाने सोडवली पाहिजे या मतांचे राजेंद्र चोरगे नक्कीच नाहीत म्हणून ते नेहमी आपल्या परीने जे होईल त्याचाच संकल्प करतात आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी करतात हे त्यांचं खरं वैशिष्ट्य आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांनी ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ‘ हे ब्रीद वाक्य फार पूर्वीपासून अधोरेखित केले आहे
मागील वीस वर्षांपूर्वी साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीची दूरावस्था अतिशय भयावह होती त्यात पावसाची आपत्ती आली किंवा रखरखीत उन्ह असल तर उपस्थितांची त्रेधा तिरपीट उडत असे त्यामुळे या स्मशानभूमीचा कायापालट झाला पाहिजे यावर तेवढ्यापुरते भाष्य होत असे पण त्यासाठी पुढाकार घेऊन ही जबाबदारी स्विकारण्याची कोणाचीच आत्मिक तयारी नव्हती तथापि बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा राजेंद्र चोरगे यांनी हे अवघड शिवधनुष्य लीलया हाती घेतले आणि ते सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने पेलले त्यामुळे सातारकरांना चोरगेंची महत्ती कळली , तर आज चार जानेवारीला याच राजेंद्र मधूकर चोरगे यांचा साठावा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना परमेश्वराने उदंड निरोगी आयुष्य द्यावे हीच माझी मनोकामना आहे कारण अशी समाजपयोगी व्यक्तींची समाजाला नितांत गरज आहे हे विसरून चालणार नाही कारण चांगल्या कामाची तितक्याच चांगल्या मनाने पोचपावती द्यावी ही माझी मनस्वी धारणा आहे .