ताज्या घडामोडी

उद्या करायाचे आज करा कांही..!

उद्या करायाचे आज करा कांही..!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 4 जानेवारी 2025 :
हा मनुष्य जन्म आपणांस महत् प्रयासाने प्राप्त झाला आहे. पृथ्वीवर अनेक जीव जन्माला येतात. फक्त जीवंत राहण्यासाठी जगणे म्हणजे जगणे नव्हे. जीवन सर्वांनाच मिळते पण जगणं सर्वांनाच येत नाही. जीवन तर पशु पक्षी सुद्धा जगतात. जीवन जगण्यात सात्विकतेचा प्रवाह हवा. सर्वांना प्रेमाने मोहून टाकणारा मार्ग हवा. मनुष्य दुसऱ्यांच्या हितास्तव जगतो तो मानव धन्य होय. जीवनात आत्मोन्नती, आत्मविकास साधावा. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खालील अभंगात खरोखरच जीवनाच भलं करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे मनुष्य जन्माचे सार्थक होईल.
उद्या करायाचे आज करा कांही ।
भरवसाची नाही आयुष्याचा ।।धृ।।

प्रत्येक उगवलेला दिवसही पूर्णपणे आपला नाही. तेव्हा उद्याची काय खात्री देऊ शकणार? कोणता दिवस कसा उगवेल याची मुळीच खात्री नाही. तू उद्या करायचा विचार करु नकोस. जे काही करायचे आहे ते आजच करा. राष्ट्रसंत म्हणतात, “कोण दिवस येई कसा कोण जाणतो ।” तो दिवस एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा निघू शकेल. दिवसाच्या पोटात काय दडलयं ते सांगता येत नाही. म्हणून उद्याचा विचार न करता आजच करा. आयुष्याचा भरवसा मुळीच नाही कारण मृत्यू हा बिन भरोश्याचा आहे. आयुष्याची दोर कधी तुटेल याचा नेम नाही. मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे. जीवनाचा आरंभ आहे. मृत्यू आणि जन्म यांचे आंतरिक नाते आहे. मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, “मृत्यू हा मनुष्याला त्याच्या चांगल्या वा वाईट इच्छेच्या कार्याकरिता ताजातवाना करुन देणारी विश्रांती आहे म्हणूनच ज्ञानी लोक मृत्यूला आपली शुभ वेळ समजतात.”
देह हा कांचेच्या नळिये सारखा ।
कधी खाय धोका नेम नाही ।।१।।
ट्यूब लाईटची नळी किंवा कोणतीही काचेची नळी खाली पडली तर फुटते. तसाच जीव हा पाण्यावरचा बुडबुडा आहे. तो बुडबुडा कधी फुटेल याचा भरवसा नाही. जसेः- कुंभार घडवितो घडा । त्या घड्याला जातो तडा । जीव पाण्याचा बुडबुडा रे । याचा भरोसा नाही रे ।। जीव चालता, बोलता असला तरी त्याचा भरवसा नाही. तो जीव महालात राहणारा असो की झोपडीत राहणारा जीव हा शरीरातला जातो. जीव कितीही सांभाळा, माया लावून कवटाळा. तरी पण याचा भरवसा नाही. आपण ज्या जगात राहतो, त्याचे नाव मर्त्य लोक आहे. या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत. त्या सजिव असो की निर्जीव या सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जीवन क्षणभंगूर आहे म्हणूनच प्रत्येक क्षण हा मौल्यवान आहे. पिंपळ, वड हे वृक्ष दिर्घकाळ बलशाली असून त्यांची शाश्वती नाही. एक ना एक दिवस असे बलाढ्य वृक्ष सुद्धा कोसळतात. तसेच प्राणरुपी पान कधी गळून पडेल हे सांगता येत नाही. या जड देहापासून आत्मा आपले संबंध केव्हाही तोडून टाकेल. क्षणाक्षणाला येथे जन्मही आहे व मृत्यूही आहे. मानवासह सर्व लहानमोठ्या प्राण्यांची जीवन नौका मृत्यू रूपी सागरात कधी बुडून जाईल याचा नेम नाही. क्या भरोसा जिंदगानी का । आदमी बुलबुला है पानी का ।।

आज करायाचे आताचि कराना ।
भावे का भजाना पांडुरंग ।।२।।
देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देहावर काळाची सत्ता आहे. ते त्याचे भक्ष आहे म्हणूनच देह हे काळाचे असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे जगातील सर्व संपत्तीवर कुबेराची सत्ता आहे. त्यावर अलिखित त्याची मालकी असते म्हणून धन हे कुबेराचे म्हणूनच तुम्हाला आज काही करायचे असेल तर वेळ लावू नका आणि आताच करा. तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्हाला आताच करायचे असेल तर ईश्वर चरणी भाव ठेवून पांडुरंगाचे भजन आताच करा. देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।। माझ्या चित्तामध्ये पांडुरंगा वाचून दुसरे काहीही नाही, या गोष्टीचा आपण मनापासून निश्चय करावा. माझ्या ध्यानामध्ये ही पांडुरंग आहे आणि मनामध्ये ही पांडुरंग आहे अशी भावना जागृतीत व स्वप्नात सुद्धा पांडुरंगच असावा. संत नामदेव महाराज म्हणतात. काळ देहासी आला खाऊ । आम्ही आनंदे नाचू गाऊ ।। जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत जीवाचा प्रवास जन्म मरणाच्या चक्रात अडकला आहे. मृत्यू म्हणजे काळ. हा काळ आपल्या जन्माच्या क्षणापासून बरोबर चालतोच आहे. आपण जिथे जाऊ तिथे त्याची आपल्या बरोबर फरफट चालूच असते. जन्मापासून तो काळ आपल्या मागे लागलेला असतो. तो काळ आपल्याला खायला आला असला तरी आम्ही आनंदाने नाचू, गाऊ असे संत नामदेव म्हणतात. म्हणून आज करायचे असेल ते आताच करा. आनंदाने नाचत पांडुरंगाचे नामस्मरण करा.
तुकड्यादास म्हणे लागा चिंतनासी ।
आठवा मानसी प्रभू माझा ।।३।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, ईश्वराच्या चिंतनासी लागा. चिंतन म्हणजे देवाचे नामस्मरण होय. जीवन घडविण्याचे किंवा बिघडविण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे. जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे. देहाचे चिंतन केले तर आपण देव होतो. मनन, चिंतन हे मनाचे कार्य जन्माबरोबर चिकटलेली चिंता चितेवर जाईपर्यंत साथ सोडत नाही. आपल्या पवित्र मनात त्या ईश्वराची, प्रभूची आठवण करा. देव आपल्या घरी आला तर आनंद होतो. आपणांस देवाचे घरी कधी जावे वाटत नाही. मृत्यू म्हणजे मिथ्या जगातून बाहेर पडण्याचे महाद्वार आहे. मृत्यू म्हणजे चिरकाळ शांती. प्रामाणिकपणे ईश्वर नामस्मरण करणाऱ्याला परमेश्वर प्रसन्न होतो. ज्या ठिकाणी नामाचा घोष चालतो, तेथे ईश्वर राहतो. मनुष्य जन्माचे सार्थक होण्यासाठी ईश्वर नाम घेणे महत्त्वाचे आहे.
मनुष्य जनम अनमोल रे ।
मिट्टीसे ना तोल रे ।
अब तो मिला है ।
फिर ना मिलेगा ।
कभी नही, कभी नही ।।
बोधः- नाम हे साधन आहे आणि साध्य ही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आणि शेवट निर्गुणात आहे. पाणी जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम मनाचे बनले पाहिजे. अंतकाळी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरुप होऊन जाते. त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरुप बनली पाहिजे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. तुकडोजी महाराज म्हणतात.
सुखकर हरिगुण गाई ! मनुजा ।।
नरदेहाची सुंदर वेळा ।
साधुनी घे लवलाही । मनुजा ।।
नाही भरवसा पळ प्राणाचा ।
कधी यमराजा येई ।।

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button