डिसेंबर महिन्याचा लेखाजोखा !!!

डिसेंबर महिन्याचा लेखाजोखा !!!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31 डिसेंबर 2024 :
तर, मी तेव्हा साताऱ्यात होतो…
अकरावी की बारावी आठवत नाही…!
गावाकडून आजी आली होती. एके दिवशी मला म्हन्ली, ‘मला बाजारात घीवून चल…’
‘अगं आत्ता मला काम आहे…मी.’
‘गप मुडद्या, कामाचा कांगावा आन म्हायेरचा सांगावा… तुला एकादं काम सांगितलं की आपलंच घोडं फूडं दामटायचं ‘ मला ओढतच तीने मोटर सायकल जवळ नेलं.
तीनं लुगडं घातलं होतं, मी तिला मोटरसायकलवर इकडे एक पाय आणि तिकडे एक पाय टाकून बसायला सांगितलं… हो… एका बाजूने बसल्यावर पडायला नको.
आधी मागे तिला व्यवस्थित बसवलं, नंतर मी हाश हुश्श करत, धापा टाकत गाडीवर पुढे बसलो…
यावर माझ्याकडे पाहून म्हातारी बोललीच… ‘तुजं आसं हाय, काम ना धाम, आन उगड्या आंगाला घाम’
हा देखावा पाहायला आजूबाजूला गर्दी जमली होती.
मागे बसल्यावर तिने माझ्या पोटाला हातांचा घट्ट विळखा घातला, लहान मूल घालतं तसं.
मी तिला म्हनलं, ‘पोट इतकं आवळून काय मारशील का काय मला ?’
ती म्हन्ली, ‘मुडद्या… पडले बिडले तर एकटी पडणार न्हाय… तुला घिवुनच पडीन….
सोबत इतर मोटरसायकलवर मित्र सुद्धा होते, आजीचं ग्रामीण बोलणं ऐकून ते हसत होते.
त्यांच्याकडे रागानं पाहत ती म्हणाली, ‘तुमचं काय काम हाय रं मुडद्यानु ? सयपाकाला आठ जणी, आन आमटीत मीठ कमी…जावा आता घरी… इतक्या जनाचं काय काम न्हाय…!’
‘तू कर रं फटफटी चालू…’ मला मागून ढोसत ती म्हणाली.
आम्ही मित्र एकमेकांना डोळे मारून हसत पुढे निघालो.
शेवटी आमची वरात मुख्य बाजारात आली, तिथे भयंकर ट्राफिक होतं.
तेव्हा आताच्यासारखे सिग्नल नव्हते…
(आता आहेत तरी काय विशेष फरक पडलाय म्हणा)
कुणीच कोणाला पुढे जाऊ देत नव्हतं, सगळी वाहने जाम… !
माझ्या बाजूचा एक जण माझ्या गाडीला आडवा येत होता… त्याला मला पुढे जाऊ द्यायचं नव्हतं….
‘मंग मी ऐकतूय व्हय तवा… मी बी माजी गाडी त्याला आडवी लावली…’ बस बोंबलत.. !
एकही वाहन जागचं हलेना…!
प्रत्येकाने आपली गाडी दुसऱ्या गाडीच्या समोर आडवी लावली होती… कुणीच कोणाला पुढे जाऊ देईना… कुणीच माघार घेईना….
आपापल्या गाड्यांचे हॉर्न वाजवून सगळे थकले पण कोणी माघार घ्यायला, गाडी मागे घ्यायला तयार नव्हतं…!
माझी म्हातारी मागून हा सर्व खेळ पाहत होती…
ती मला प्रेमानं म्हणाली, ‘आबी, आपली गाडी म्हागं घे…. म्होरच्या (समोरच्या) मानसाला जायाला वाट दे… आडमुटपणा करू नगो’
म्या ऐकतूय व्हय ? म्या म्हनलं, ‘म्हातारे म्होरच्या मानसाला गाडी म्हागं घ्यायला सांग… मी माजी गाडी मागं बिगं घेत नसतो…’ मी टेचात बोललो. माझा इगो आडवा आला.
मी ऐकत नाहीसे पाहून, ती रागाने ओरडून म्हणाली, ‘गाडी म्हागं घे मुडद्या, न्हायतर मी पांड्याला सांगीन… मंग सांजच्याला त्यो हाय आन तू हाय… !
“पांड्या” म्हणजे पांडुरंग… तीचा मुलगा आणि माझा बाप… !
अभिजीत पांडुरंग सोनवणे !
घाबरून, मी मग मोटरसायकल पायाने बसल्या जागी नाईलाजाने ढकलत मागे घेतली, ज्याच्या गाडीसमोर मी गाडी आडवी लावली होती, त्याला खूण करून तुम्ही पुढे जा; असं सांगितलं…
तो माणूस तिथून निघाला…
जाताना इतक्या प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहून तो हसला….
ते हसू माझ्या अजून लक्षात आहे !
माझ्यासोबत असणाऱ्या मित्रांकडे मी पाहिलं….त्यांनीही कोणाकोणाला तरी गाड्या आडव्या लावल्या होत्या…
मी त्यांना खूण करून गाडी मागे घ्यायला सांगितलं… त्यांनी घेतल्या…
दाट धुकं विरळ व्हावं… सूर्यप्रकाश यावा आणि समोरचा रस्ता स्वच्छ दिसावा… असं काहीतरी झालं… आमच्या समोरची सर्व गर्दी हटली… आमचा रस्ता मोकळा झाला… !
आम्ही बिन बोभाट पुढे निघालो… !
मी म्हातारीकडे मागं वळून हसत बघत म्हणालो… ‘आयला म्हातारे, तु बी लय भुंगाट हायस’
यावेळी ती भावुक होत म्हणाली, आबि, आपल्याला जर फुडं जायाचं आसंल, तर आपून दुसऱ्याची वाट आडवून धरायची न्हायी… उलट दुसऱ्यालाच आदी आपून वाट मोकळी करुन द्यायची… आपली वाट मंग तिसरंच कुनीतरी मोकळं करतंय बग ल्येकरा…!!!
तुम्ही पुढे जा म्हणून सांगितल्यानंतर, त्या माणसाचं प्रसन्नचित्त गोड हसू माझ्या हृदयावर तेव्हापासून कोरलं गेलंय…!
प्रसंग साधा …गोष्ट साधी …आजी अडाणी…!
पण तीनं जे काही सांगितलं, ते कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नाही… !!!
आजीला बाजारात नेलं… तीनं अनेक गोष्टी तिथं “विकत” घेतल्या….
पण जाता जाता मला हे तत्त्वज्ञान ती “फुकट” देऊन गेली…. !
“आपल्याला पुढे जायचं असेल, तर आपण दुसऱ्याची वाट अडवून धरायची नाही… दुसऱ्याची वाट आधी आपणच मोकळी करायची… आपली वाट मग तिसराच कुणीतरी मोकळी करत असतो…!!!”
सरळ सरळ माघार घ्यायची… बदल्यात समोरच्या व्यक्तीचं प्रसन्नचित्त हसू; उरात जपून ठेवायचं…!!!
मुळात हि माघार नसतेच; हि असते, आपणच आपल्यातल्या माणसाला दिलेली सलामी !!!
आज तिला जाऊन 15 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत…
आजही कधी चुक झाली तर “मुडद्या” म्हणत ती मला चप्पल फेकून मारते…
तर कधी काही थोडंफार चांगलं केलं तर तिच्या फाटक्या पदराखाली सुद्धा ती मला “मुडद्या” म्हणतच जवळ घेते… !
शरीराने ती गेली… आसपास ती कुठेही नाही… तरीही ती माझ्यातच आहे !
मी “मुडदा” होऊनही, तिच्या विचारांना “जिवंत” ठेवण्याचा प्रयत्न करत आहे… अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे, हिच मी तिला वाहिलेली श्रद्धांजली. . . !!!
आजीच्या विचारांनी भरलेल्या आणि भारलेल्या कामाचा; या वर्षातील शेवटच्या महिन्याचा हा लेखाजोखा, आपल्या पायाशी सविनय सादर !
पुनर्वसन
1. व्यसनांच्या अधीन झालेला एक मध्यमवयीन तरुण… कायम गटाराच्या बाजूला किंवा रस्त्याच्या कडेला पडलेला.
माझे एक ऑब्झर्वेशन आहे, कितीही जपून चालले तरी लोकांचे एक्सीडेंट होतात… काळजी घेऊन सुद्धा अनेकांना साप चावतो… कुत्रा चावतो… उंदीर चावतो वगैरे वगैरे…
भरपूर पिलेल्या लोकांना मात्र रस्त्याने चालताना काहीच कसं होत नाही…? गटाराच्या किंवा रस्त्याच्या कडेला रात्रभर पडल्यानंतर यांना कुत्रा, उंदीर, साप काहीच कसं चावत नाही…? याचं कोडं मला अजून उलगडलं नाही… !
असो, याच्या व्यसनामुळे याची पत्नी आणि दोन लहान मुली याला सोडून गेल्या.
एक वर्षापूर्वी मुलींना घेऊन भीक मागताना याची पत्नी मला भेटली. काळाच्या ओघामध्ये ती मला दादा म्हणायला लागली आणि मुली मामा !
मी तिला गमतीने ‘म्हशी’ म्हणायचो… !
एके दिवशी मी तिला म्हणालो, ‘बहीण म्हणून तुला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी माझ्या हातात जे काही आहे ते मी काहीही करू शकतो… तू फक्त सांग !
ती हळवी होत म्हणाली, ‘काहीही करू शकतोस, तर मला माझा नवरा परत आणून दे, पोरींचा बाप परत आणून दे… !
मी निरुत्तर झालो… !!
तरीही या तरुणावर मग लक्ष केंद्रित केलं… साम – दाम – दंड- भेद …, यापेक्षा प्रेम, माया, आपुलकी, भाव – भावना या सर्वांचा माझ्या परीने उपयोग केला.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या सर्व प्रयत्नांना यश आले… !
आता याची सर्व व्यसने सुटली आहेत… !
याच्या बायकोला भेटून सांगितलं, ‘याला आता सांभाळून ठेव …
“बाई” म्हणून नाही….”आई” म्हणून… !’
‘तुला दोन मुलीच आहेत ना…?
तुला मुलगा हवा होता ना… ?
आता यालाच पदरात घे, थोरला मुलगा म्हणून… !’
माझ्या या वाक्यानंतर ती अक्षरशः माझ्या पायावर “दादा” म्हणत रडतच कोसळली…
‘ए येडे मी हाय ना…’ म्हणत “त्याने”, तीला आधार देत माझ्या पायावरून हळुवार उभं केलं…
आता दोघेही नवरा बायको रडत होते… तेवढ्यात दोन्हीं पोरींनी “पप्पा – मम्मी” म्हणत त्या दोघांना मिठी मारली…!
हा प्रसंग शब्दबद्ध करण्यासाठी खुद्द सरस्वती देवीला यावं लागेल… मी असमर्थ आहे !
रडू ओसरल्यानंतर ते चौघेही एकमेकांच्या हातात हात घालून निघाले सुध्दा…
मी जाताना तिला म्हणालो, ‘ए म्हशी, मी काय येडा म्हणून हितं उभा हाय का ?’
ती गडबडली… दादा म्हणत जवळपास धावतच “ती” माझ्या दिशेने आली …तिच्या पाठोपाठ “तो” आला… त्याच्या पाठोपाठ दोन पोरी पळतच आल्या…
आरं… आरं… हो… हो… पाडता का काय मला… ? म्हणत मी तिच्या डोक्यावर टपली मारली…
आज या संपूर्ण कुटुंबाला कवेत घेताना माझे हात मावत नव्हते….!
या कुटुंबाला आपल्या निधीमधून एक हातगाडी घेऊन दिली आहे.
वडापाव आणि चहा तयार करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते … कढई, झारा, थर्मास, तेल, बेसन पीठ, साखर, चहा पावडर, मीठ, गाळणी, चमचे, ग्लास, चिमटा इ. सर्व काही घेऊन दिलं आहे.
शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये हे कुटुंब वडापाव आणि चहाची गाडी चालवून स्वतःचा चरितार्थ चालवत आहे.
पोरींना शाळेत टाकून आई वडील म्हणून तुम्हा सर्वांचे वतीने, आपण आपले कर्तव्य पार पाडले आहे
मावळलेला सूर्य, पुन्हा उगवताना पाहून जे वाटावं तेच मलाही वाटलं… !
2. दोन मुलांना घेऊन स्वाभिमानाने जगण्याची इच्छा असणारी परंतु नाईलाजाने रस्त्यावर आलेली एक ताई, हिला आपण हात गाडी घेऊन दिली आहे. राजीव गांधी वसाहत समोर या हात गाडीवर ती वेळ आणि पाणीपुरीचा व्यवसाय करायला लागली आहे.
3. एक प्रौढ मावशी – पूर्वी लोकांना घरात नको असलेल्या वस्तू विकत घ्यायची आणि जुन्या बाजारात ती विकायची, तिचा हा व्यवसाय होता; परंतु काही कारणांमुळे व्यवसाय बंद पडला… घर सुटले आणि ती रस्त्यावर आली.
हा व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला काही भांडवल लागते, ते आपण तिला दिले आहे आणि पुन्हा तिचा हा व्यवसाय सुरू करून दिला आहे.
4. आणखी एक मावशी… विविध धर्मांच्या प्रार्थना स्थळांबाहेर बसून भीक मागायची. बसून भीक मागू शकतेस, तर बसूनच एखादी वस्तू का नाही विकू शकत ? असा युक्तिवाद करत तिलाही कामाला तयार केलं आहे.
पूजेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तिला विकत घेऊन दिले आहे. कॅम्प परिसरात असणाऱ्या प्रार्थना स्थळांबाहेर “बसून” ती आता पूजा साहित्य विकू लागली आहे.
5. ज्येष्ठ बंधूतुल्य, सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ जोतिर्विद श्री आनंद पिंपळकर यांनी मला 200 कॅलेंडर गिफ्ट म्हणून दिले. मी आमच्या याचक मंडळींना हे कॅलेंडर रस्त्यावर विकायला दिले यातून दहा जणांना रोजगार मिळाला.
पानापानातून “आनंद” वाटणाऱ्या या “पिंपळाच्या” झाडासमोर मी नतमस्तक आहे !
6. एक दारुडा – स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलाला भीक मागायला लावायचा – त्यातून तो चैन करायचा – बायकोलाही काम करू द्यायचा नाही – मुलाची शिकण्याची इच्छा – पुढे जाऊन त्याला इन्स्पेक्टर व्हायचे होते – परंतु मुलाला शाळेत टाकले तर “कमावणार” कोण ?
या मुलाला यातून बाहेर काढण्यासाठी, बापाचे मन परिवर्तन करण्यासाठी बऱ्याच लटपटी खटपटी केल्या… हा प्रसंग खरंतर पाच वर्षांपूर्वीचा. हा सर्व घटनाक्रम मी माझ्या “इन्स्पेक्टर” नावाचा ब्लॉगमध्ये मी शब्दबद्ध केला आहे.
माझ्या पुस्तकात हा अनुभव सविस्तर मांडला आहे. ज्यांच्याकडे माझे पुस्तक आहे, त्यांनी हा अनुभव वाचला असावा !
या घटनेची आता आठवण येण्याचे कारण म्हणजे, या महिन्यात त्याचे आई-वडील भेटले. माझ्या अल्प स्वल्प प्रयत्नांना यश येऊन मुलाला त्यांनी शिकण्यासाठी होस्टेलमध्ये ठेवले आहे.
मुलाचे वडील, मिळेल ते काम करतात… मुलाची आई मात्र बसूनच असते.
येणारा ख्रिसमस लक्षात घेऊन, मुलाच्या आईला फुगे, सांताक्लॉजची टोपी वगैरे अशा गोष्टी विकत घेऊन दिल्या आहेत.
पुण्यात कॅम्प – लष्कर परिसरात अशा वस्तूंचा खप जास्त होतो, हे लक्षात घेऊन या परिसरामध्ये तिला हा फिरता व्यवसाय आपण टाकून दिला आहे.
समाजामध्ये असणाऱ्या रूढी – परंपरा, सणवार यांचा मला जमेल तसा उपयोग मी माझ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी करण्याचा प्रयत्न करत आहे
सण- वार आम्ही असे साजरे करत आहोत !
7. नाताळच्या दिवशी खराटा पलटणच्या आमच्या लोकांना एकत्र बोलावून पंधरा दिवस पुरेल इतका किराणा द्यायचा होता, परंतु त्यावेळी आमच्या शिलकीला काही नव्हते.
योगायोगाने, श्री अशोक नडे सर यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला किराणा दिला. आम्ही हा किराणा घेऊन सत्तावीस तारखेला नाताळ साजरा केला.
“नाताळ” नावाने याविषयी विस्तृत लिहिले आहे.
असो, या महिन्यात केवळ दहा पंधरा व्यक्तींचे पुनर्वसन नव्हे; तर दहा पंधरा कुटुंबाचे पुनर्वसन झाले आहे… आणि हे घडलं केवळ आपल्या मदतीमुळे… !!!
यात माझं काहीही कर्तुत्व नाही…
हा सर्व बुद्धिबळाचा खेळ आपण मांडला आहे…
राजा, राणी, वजीर, हत्ती, उंट, घोडे आपणच आहात…
मी त्यातला फक्त एक प्यादा…
माझी ताकद फक्त एक घर चालायची… !!!
*अन्नदान
अन्नदानासाठी आपण जी मदत करत आहात त्यातून अनेकांना आपण डबे विकत घेऊन व्यवसायाची संधी देत आहोत, पोळी भाजी वरण भात असलेले, हे जेवणाचे डबे रस्त्यावरील गोरगरीब आणि दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मंडळींना मोफत देत आहोत.
हाडांचे सुप्रसिद्ध डॉक्टर सतीश शहा सर; यांचा एके दिवशी मला फोन आला, ते म्हणाले, ‘तू पोळी भाजी चा डबा देतच आहेस, परंतु जरा जास्त दिवस टिकेल आणि तरीही पौष्टिक असं आणखी काही आपल्याला देता येईल का ?
मी काही उत्तर देणार तितक्यात ते म्हणाले, ‘मी तुला मेथीचे खाकरे देतो…!’
उत्तम पॅकिंग केलेले आणि एका पाकिटात बारा खाकरे असलेली पाकिटे, त्यांनी मला या महिन्यापासून द्यायला सुरुवात केली आहे. एक नवा दृष्टिकोन दिल्याबद्दल सरांचा मी ऋणी आहे… !
यानंतर मी माझं थोडं डोकं चालवून, आपण दिलेल्या निधीमधून, रस्त्यावरील लहान मुलांना पौष्टिक आणि टिकाऊ म्हणून राजगिऱ्याचा लाडू / चिक्की सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे.
*वैद्यकीय
1. अनेकांना रस्त्यावरच मोफत उपचार देत आहोत, अनेक तपासण्या रस्त्यावर करत आहोत, हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करत आहोत.
या महिन्यात सापडलेले, अति गंभीर रुग्ण, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत बरे झाल्यानंतर त्यांना व्यवसाय टाकून देणार आहे.
2. डोळ्यांच्या त्रासामुळे काम करू शकत नाहीत अशा दहा लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन या महिन्यात केले आहे. जवळपास 70 लोकांना डोळे तपासणी करून चष्मे दिले आहेत.
*इतर
सध्याच्या थंडीचा कडाका लक्षात घेऊन, रस्त्यावरील गोरगरीब, वृद्ध, लहान मुलं, निराधार व्यक्ती यांना अंथरण्यासाठी चादर, पांघरण्यासाठी ब्लॅंकेट, डोक्याला कान टोपी, अंगात स्वेटर, मुलांना हात मोजे आणि सॉक्स या सर्व बाबी देऊन झाल्या आहेत.
थंडीत सुरू केलेल्या या शेकोटीमध्ये… यज्ञामध्ये आपण दिलेल्या समिधा अर्पण केल्या आहेत !!!
आणखीही बरंच काही आहे …काय लिहू आणि काय टाळू कळत नाही…!
लेख लांबतच चाललाय…
असो…. हा लेखाजोखा लिहितांना, डायरी चाळताना लक्षात आलं, मागील महिन्यात अर्धवट राहिलेली अनेक कामं 6 डिसेंबर 2024 ला पूर्णत्वास गेली. म्हणजे दुप्पट झाली…!
6 डिसेंबर 2024 म्हणजे 6-12-24…!
तारखेच्या दुप्पट महिना… महिन्याच्या दुप्पट वर्ष…
मला वाटत नाही, कोणाच्याही आयुष्यामध्ये यानंतर तारखेच्या दुप्पट महिना… महिन्याच्या दुप्पट वर्ष… अशा दुपटीच्या स्वरूपात तारीख पुन्हा येईल !
कारण महिने बाराच आहेत…7.14.28 कधीच येणार नाही…
दुपटीचे गणित असलेली ही तारीख या सहस्त्रकातील… आपल्या सर्वांच्या आयुष्यातील शेवटची…!
दुपटीचं एक पर्व संपलं…
पण आता 2025 पासून तिपटीच्या स्वरूपात तारखा येतील…
उद्या येणाऱ्या एक जानेवारी 2025 पासून आपल्या सर्व मनोकामना, इच्छा, आकांक्षा, मनोरथ तिपटीने पूर्ण होवोत, अशी माझ्या आणि माझ्या याचक मंडळींची मनापासून प्रार्थना… !!!
उद्याच्या नवीन वर्षाची पहाट आपल्या आयुष्यात एक उज्वल सकाळ घेऊन येणार आहे… हा विश्वास मनात ठेवून; या वर्षातील शेवटच्या महिन्याचा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर !!!
31 डिसेंबर 2024
डॉ अभिजीत सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे
9822267357