ताज्या घडामोडी

कॉंग्रेसला हिंदू का नकोत?

कॉंग्रेसला हिंदू का नकोत?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16/12/2024 :
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट केल्यानंतर आता त्यांनी एका पॉडकास्टमध्ये अतिशय गंभीर विधान केलं आहे. शिंदे म्हणाले, “त्या वेळी मी भगवा आतंकवाद हा शब्द उच्चारला होता. पण भगव्यासोबत मी आतंकवाद हा शब्द का उच्चारला, हे मला माहित नाही. असं म्हणणं चुकीचं आहे. त्यावेळी रेकॉर्डवर जे आलं मी तेच म्हटलं. माझ्या पक्षाने (कॉंग्रेस) मला सांगितलं की भगवा आतंकवाद आहे.” देशाच्या माजी गृहमंत्र्याचे हे धक्कादायक विधान आहे. हे विधान केवळ संघ किंवा भाजप विरुद्ध कॉंग्रेस या आधारावर तपासलं गेलं नाही पाहिजे. तर देशाची सुरक्षा, देशाचे भवितव्य, संविधान व लोकशाहीचे जतन या आधारावर तपासलं गेलं पाहिजे. भगवा दहशतवाद ही थियरी मांडली गेली तेव्हा कॉंग्रेसचं सरकार अस्तित्वात होतं. शिंदे म्हणतात त्याप्रमाणे भगव्यापुढे आतंकवाद हा शब्द लावणं चुकीचं होतं, पण देशाचा गृहमंत्री केवळ पक्षाने सांगितलं म्हणून हा शब्द उच्चारत असेल तर कॉंग्रेस नेत्यांच्या एकंदर राष्ट्रीय भावनेविषयी संशय घ्यायला प्रचंड वाव आहे. राजकीय नेत्याने पक्षाचे धोरण पाळायचे असते, शीर्ष नेतृत्वाचे आदेशही ऐकायचे असतात. मात्र ते धोरण, ते आदेश देशाच्या सुरक्षेला बाधा आणत असतील आणि एखाद्या समाजाच्या लांगुलचलनासाठी किंवा मूळ आतंकवादाला लपवण्यासाठी दुसर्‍या समाजाला पुरावे नसताना, विनाकारण अतिरेकी ठरवत असतील तर कॉंग्रेसचे मनसुबे अतिशय घातक आहेत असेच म्हणावे लागेल.
कॉंग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाची प्रचंड मोठी समस्या आहे. हे शीर्ष नेतृत्व मनाने भारतीय झालेले नाही, अशी शंका लोकांच्या मनात येते. म्हणूनच या पॉडकास्टमध्ये अफझलगुरुला आतंकवादी म्हणताना सुशीलकुमार शिंदे कचरतात. म्हणूनच देशभक्त सावरकरांचा कॉंग्रेसचे लोक द्वेष करतात. कदाचित कॉंग्रेसच्या इतर नेत्यांना सावरकरांबद्दल आदर वाटत असेल, मात्र केवळ एका कुटुंबामुळे सबंध कॉंग्रेस हिंदू विरोधी झाली आहे. भगवा आतंकवाद हा शब्द सुरुवातीला २०१० मध्ये कॉंग्रेसचे पी. चिदंबरम यांनी उच्चारला होता व नंतर २०१३ ला सुशीलकुमार शिंदे यांनी उच्चारला होता. “भगवा दहशतवाद”, “हिंदू दहशतवाद” हे शब्द निर्माण करणे म्हणजे खूप मोठे कारस्थान होते. केवळ शब्द उच्चारणे इतपंत याची मर्यादा नव्हती तर एक मोठं टुलकिट तयार करण्यात आलं होतं. पाकिस्तानी जिहादी कसाबने केलेला हल्ला हा हिंदुंनी केला आहे असं भासवण्याचा पूर्ण प्रयत्न झाला होता. वीर हुतात्मा कै. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवावर खेळून हा कट उध्वस्त केला आहे. तरी देखील “Who Killed Karkare” असा सवाल उठवत हिंदुंना बदनाम करण्याचा प्रयत्न झालाच. या भगवा दहशतवादाच्या थियरिची सुरुवात तशी पाहता नथुराम गोडसेपासून सुरु झाली. मात्र ही थियरी अस्तित्वात आली मालेगाव बॉम्बस्फोटादरम्यान. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह असे अनेक हिंदू ह्यात बळी ठरले. पुरावे न सापडल्यामुळे अनेकांना सोडून देण्यात आलं असलं तरी त्यांचे किती तरी वर्षे बरबाद झाली. यासंबंधात कर्नल पुरोहित म्हणाले की त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या मोठ्या नेत्यांचे आणि योगी आदित्यनाथांचे नाव घेण्याचा दबाव होता. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की “मालेगाव स्फोटाआधी अलिबागमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवारांनी हिंदू दहशतवाद हा शब्द उच्चारला होता”, असा आरोप कर्नल पुरोहित यांनी केला आहे. यातून काय निष्पन्न झालं तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. हिंदू हा अतिरेकी असू शकतो, असा संशय व्यक्त केला जातो. हिंदू हे द्वेष पसरवतात असे नॅरेटिव्ह निर्माण होऊ लागले आणि द्वेष पसरवणारे, अतिरेकी कारवाया करणारे नामानिराळे राहिले आणि हेच सुशीलकुमार शिंदेंच्या वरिष्ठांना हवे होते का? अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.
वयाच्या उतरत्या काळात सुशीलकुमार शिंदे हळूहळू एकेक गौप्यस्फोट करत आहेत. सावरकरांवर ज्याप्रमाणे राहुल गांधी टिका करतात, याविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र अजूनही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या विरोधात बोलताना शिंदेंच्या मनात एक प्रकारची भिती दिसते. यावरुन या घराण्याविषयीची दहशत स्पष्ट होते. शिंदे किंवा अनेक कॉंग्रेसी नेते हे तसे हिंदू आहेत, हिंदू धर्म पाळणारे आहेत. त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर अशा हिंदू महापुरुषांविषयी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा संघटनांविषयी आदर असेल, पण या एका कुटुंबामुळे हा आदर त्यांना लपवावा लागतो. त्यामुळे कॉंग्रेसच्या पुढार्‍यांनी त्यांच्या वरिष्ठांविषयीचं “घालीन लोटांगण” हे धोरण बाजूला ठेवून राष्ट्रप्रथम हे धोरण अवलंबिलं पाहिजे. “हिंदू अतंकवाद” ही थियरी राष्ट्रद्रोही आहे आणि आता शिंदेंनीच कबुल केलं आहे की त्यांना हा शब्द पक्षाने उच्चारायला सांगितला होता. मालकाचा आदेश पाळणार्‍या कर्मचार्‍याप्रमाणे कॉंग्रेस नेत्यांनी ही थियरी खरी करण्यासाठी जीवाचं रान केलं. शिंदेंच्या कबुली जबाबातून एक गोष्ट स्पष्ट होते की कॉंग्रेस तत्वतः हिंदू विरोधी आहे आणि त्यांचा हिंदू विरोध हा त्यांच्या “survival factor” वर बेतलेला असावा. राष्ट्रहितापेक्षा “political survive” हे हित सर्वतोपरी असल्यामुळे कॉंग्रेसच्या इतर नेत्यांना एका कुटुंबाच्या हिताला बळी पडावे लागते. म्हणूनच या “survival factor” आणि “political survive” धोरणामुळे भारताचं संविधान धोक्यात आलं आहे!

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button