ताज्या घडामोडी

दत्त जयंती विशेष: दत्तगुरु आणि गुंतवणुकीचे त्रिगुण तत्व

दत्त जयंती विशेष: दत्तगुरु आणि गुंतवणुकीचे त्रिगुण तत्व

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/12/2024 :
दत्तगुरु महाराज म्हणजे तीन शक्तींचे एकात्मिक स्वरूप – ब्रम्हा (सृष्टी निर्माता), विष्णू (सृष्टी पालनपोषणकर्ता), आणि महेश (सृष्टीचा प्रलयंकारी). या त्रिमूर्तीचे एकरूप स्वरूप म्हणजेच आपले “दत्तगुरु” महाराज. दत्तगुरुंच्या या त्रिगुणात्मक तत्वातून आपल्याला आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाचे मूलभूत तत्त्व देखील शिकता येते.
*त्रिगुण तत्व आणि गुंतवणूक:
गुंतवणुकीचा प्रवाससुद्धा या त्रिगुण तत्वावर आधारित असतो.
1. निर्मिती (ब्रम्हा तत्व):
भविष्यातील आर्थिक गरजांसाठी नियमित गुंतवणूक करण्याची सवय लावणे म्हणजेच आर्थिक सृष्टीची निर्मिती. गुंतवणुकीच्या सुरुवातीला आपल्याला आर्थिक नियोजन करावे लागते. मासिक किंवा वार्षिक बचत करून योग्य योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास हीच रक्कम भविष्यात मोठी होऊ शकते.
2. पालनपोषण (विष्णू तत्व):
आर्थिक निर्मितीतून भविष्यातील गरजा पूर्ण करण्याचे काम म्हणजे आर्थिक पालनपोषण. उदा., मुलांचे शिक्षण, घर खरेदी, किंवा निवृत्तीनंतरची सुरक्षितता. गुंतवणुकीच्या माध्यमातून निर्माण झालेला निधी योग्य प्रकारे व्यवस्थापित करून त्याचा उपयोग करणे हे महत्त्वाचे आहे.
3. नाश आणि पुनर्निर्मिती (महेश तत्व):
मिळालेली रक्कम खर्च करणे म्हणजे सृष्टीचा नाश. परंतु, या नाशातून शिल्लक रक्कम पुन्हा गुंतवणूक करणे आवश्यक आहे, म्हणजे ती सृष्टी पुनःनिर्मित होऊ शकते. जर आपण सर्वच रक्कम खर्च केली, तर भविष्यातील आर्थिक गरजा भागवणे कठीण होईल.
* गुंतवणुकीत सातत्य राखणे
गुंतवणुकीतून लाभ मिळवण्यासाठी सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही गुंतवणूक योजनेत नियमित पैसे गुंतवले, तर चक्रवाढीच्या (compound interest) जादूमुळे मोठा निधी तयार होतो.
– सुरुवात लवकर करा: जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करता, तितके अधिक फायदे मिळतात.
– योग्य साधने निवडा: मुदतठेवी, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, पीपीएफ, किंवा सोन्याची गुंतवणूक – आपल्या गरजेनुसार गुंतवणूक साधन निवडणे गरजेचे आहे.
– जोखीम व्यवस्थापन: आपले पैसे वेगवेगळ्या योजनेत गुंतवा जेणेकरून जोखीम कमी होईल.
* बचत आणि लाभांचे पुनर्गुंतवणूक
गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभांचा योग्य उपयोग करून पुन्हा गुंतवणूक करणे गरजेचे आहे. उदा., शेअर बाजारातून मिळालेला नफा किंवा म्युच्युअल फंडचे डिव्हिडेंड पुन्हा गुंतवणुकीसाठी वापरल्यास तुमच्या निधीत सातत्याने वाढ होईल.
*गुंतवणूक आणि आत्मिक शांती
दत्तगुरुंच्या उपदेशाप्रमाणे जीवनातील प्रत्येक कृती संतुलित आणि नियोजित असावी. आर्थिक जीवनातही हेच लागू होते. योग्य नियोजन, सातत्य, आणि संयम ठेवून केलेली गुंतवणूक तुम्हाला केवळ आर्थिक सुरक्षितता नव्हे, तर मानसिक शांतीही प्रदान करेल.
निष्कर्ष:
दत्तगुरुंच्या त्रिगुणात्मक तत्वाचा उपयोग प्रत्येक व्यक्तीला आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. गुंतवणुकीच्या या त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रत्येकजण आपले आर्थिक भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित करू शकतो.
“त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा!”
हे तत्व केवळ आध्यात्मिक जीवनासाठीच नव्हे, तर आर्थिक नियोजनासाठीही प्रेरणादायक आहे. दत्त जयंतीनिमित्त या तत्वांचा अंगीकार करावा आणि आर्थिक स्थैर्याचा मार्ग स्वीकारावा.

लेखक:श्री नंदन पंढरीनाथ दाते
Professional Financial Advisor,
Financial Risk Advisor, Digital Transformation Consultant BFSI.

साप्ताहिक अकलूज वैभव

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button