गावावरुन हायवे गेला!
गावावरुन हायवे गेला!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 5 डिसेंबर 2024 :
गावावरुन हायवे गेला,
तसं, गाव सुधारलं
गाव वधारलं, गाव पुढारलं
गावा-गावात डाॅन
युवकांचे आशास्थान
दादा, पप्पू, भाई,
देश की शान, गोल्डमॅन,
जाकीट, लाकीट, कोट,
ढिली झाली गुंडी.
केस कापून घरंदाज
बाईल झाली भुंडी
घर सोडून नवरा
बारमध्ये घुसला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला!
गावावरुन हायवे गेला,
तशी गावात शिरली हवा.
धूर आणि धुराळा
रोग आला नवा
इनोव्हा, र्स्कापिवो,
बुलेट आणि होंडा,
स्विप्ट, झिन, मांझा
घोळत आल्या गोंडा.
पोलिस स्टेशन खुशित
ठोकाया वर्दी
स्टेशनात गर्दी
खादीच्या कपड्यात
नको त्या लफड्यात
जेलमध्ये आता
खातोय डाळ काला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला!
गावावरुन हायवे गेला, तशी
सोनाराच्या दुकानाला,
खाटकाच्या गल्लीला,
परटाच्या भट्टीला,
बुवाच्या पानपट्टीला बरकत आली.
सोन्याहून पिवळी
मातीवर लेकरं झाली
नटरंगी बारवर
नवी नवी पाखरं आली
गावशिवात गलबला झाला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला!
गावावरुन हायवे गेला, तसा
चळ भरला अंगात,
कुठल्याच पुढार्याचं
कुंकू नाही भांगात.
इलेक्शन विलेक्शन
हातावर झेलायचं
सारे रिती रिवाज
लाखावर बोलायचं
कोण खातंय पैशाला !
लाख उधळलं बारशाला !
परिवर्तनाची
हीच खरी नांदी आहे,
भरलेल्या खिशाला
फुटलेली फांदी आहे
पुढार्याच्या नादी लागून
पैशाचा घोळ झाला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला!
गावावरुन हायवे गेला
तशी माणसं,
लाखावर बोलू लागली!
कोटीवर झुलू लागली!
माणसांत माणसांची
राहीली नाहीत नाती,
गावावरुन हायवे गेला!
मातीचं सोनं झालं
अन, माणसांची माती!
एक सत्यकथा
श्री संजय कांदळकर
09960465136