डॉ.बाबा आढाव यांना पवारसाहेबांनी केले हॅक
डॉ.बाबा आढाव यांना पवारसाहेबांनी केले हॅक
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 02/12/2024 :
पुण्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील जेष्ठ सामाजिक नेते व समाजसुधारक डॉ.बाबा आढाव यांना आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यासाठी दस्तूरखुद्द शरदचंद्र पवारसाहेब यांनी ईव्हीएम मशीनमध्ये कथित तांत्रिक घोटाळा असल्याचे भासवून चक्क त्यांनाच हॅक केले आहे , अर्थात यापूर्वी त्यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तीस वर्षांपूर्वी युतीचे सरकार असताना या सरकारच्या विरोधात असेच हॅक केले होते , त्यामुळे संतापलेल्या शिवसेनाप्रमुख व हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णांचा उपमर्द करताना त्यांना वाकड्या तोंडाचा गांधी असा खास ठाकरे शैलीतला जोडा मारला होता परिणामी किमान बाबा आढाव यांचा असा उपमर्द होणार नाही कारण
शिवसेनाप्रमुख यांचे विद्वान सुपुत्र माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच बाबांना टाॅनिक देण्यासाठी पुण्यात येणार आहेत .
आजपर्यंत हेच महा विद्वान राजकीय जाणते नेते सातत्याने ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड होत नसल्याचे मोठ्या फुशारकीने सांगत होते पण आता तेच मशीन हॅक केले जाते असे सांगणारे अनेक विद्वान माझ्याकडे आले त्यावेळी मी दुर्लक्ष केले ही माझी चूक होती असे पवारसाहेब निखालसपणे खोटे बोलत आहेत , वास्तविक खोटे बोलूनच त्यांनी आपले राजकीय आयुष्य आजपर्यंत व्यथित केले आहे त्यात काही नवीन नाही कारण लोकसभा निवडणुकीत हेच यंत्र सुरुळीत होते आणि आता ते विधानसभा निवडणुकीत हॅक झाले आहे असा त्याचा अर्थ होतो .
जर लोकसभा निवडणूकीत हे मशीन हॅक झाले असते तर सुप्रियाताई सुळे यांचा अडीच लाख मतांनी सुपडा साफ झाला असता किंवा आताच झालेल्या वायनाडच्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी यांच्या पदरी निराशेचा गोटा पडला असता पण तसे काही झाले नाही याची जाणीव शरदचंद्र पवारसाहेब यांना आहे का ॽ का उगाच महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकास आघाडीचा पुरता बोजवारा उडवला आणि यांची मग्रुरी व माज मतदानातून उतरवला याची यांना लाज वाटते म्हणून हे सारे एकजात बहुरूपी ईव्हीएमच्या नावाने शंखनाद करत आहेत ,
वास्तविक हे सर्व काही आलबेल आहे त्यामुळे जनता आपल्यावर काडीचाही विश्वास ठेवणार नाही म्हणून शरदचंद्र पवारसाहेब यांच्या सुपिक मेंदूतून डॉ.बाबा आढाव यांना आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यासंदर्भात नापिक धमाल आयडिया आली , अर्थात यातून काही सुध्दा निष्पन्न होणार नाही कारण बाबा हे कितीही जेष्ठ समाजसेवक असले तरी ते वयोमानानुसार अडगळीत पडलेले व्यक्तीमत्व आहे हे कसे नाकारून चालणार नाही का ॽ पण पवारसाहेब हे कुणाचा कधी गेम करतील व कुणाला कधी वापरून फेकून देतील याचा काही नेम नाही अर्थात साहेबांचाच गेम झाला असून मतदारांनी त्यांना वापरून कायमचे राजकारणातून तडीपार केले आहे हे खरे तर डॉ.बाबा आढाव यांनी सांगण्याची गरज आहे .
या नवटंकीत डॉ.बाबा आढाव म्हणतात की यंदाच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करून महायुती सरकार सत्तेवर आली आहे पण बाबा तुम्ही कधी परदेशात वास्तव्याला गेला नाही कारण तुम्ही तर पुणे जिल्ह्यात राहत असताना निवडणुकीत कधीतरी बारामती तालुक्यात गेला असता तर तुम्हाला पवारसाहेब आणि त्यांच अख्खं कुटुंब तेथील मतदारांना घरोघरी जाऊन कशी पैशाच्या धो धो पावसात अंघोळ घालत ते कळलं असत , पण तुम्ही पडला जेष्ठ विचारवंत त्यामुळे महात्मा फुले पगडी घालत होते का पागोटं यातील तारतम्य पवारसाहेबां प्रमाणे तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही सारे पुरोगामी त्यामुळे तुम्ही बारामतीच्या वारीला गेला नसावा .
परिणामी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत तुमचा अण्णा हजारेंच्या सारखा वाकड्या तोंडाचा गांधी होऊन देऊ नका इतकीच माफक अपेक्षा आहे कारण तुम्ही उभी केलेली हमाल पंचायत असो किंवा गरिबांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी झुणका भाकर असो किंवा घरेलु मोलकरीण व गोरगरीब जनतेसाठी केलेल्या चळवळी याची महती मला आहे कारण कधीकाळी मी तुमचा शिष्य होतो याची मला जाण आहे.
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
दिनांक – ३०/११/२०२४ .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक