“अरे संसार संसार, जसा तावा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तव्हा मियते भाकर।” – बहिणाबाई चौधरी

“अरे संसार संसार, जसा तावा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तव्हा मियते भाकर।” – बहिणाबाई चौधरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 03/12/2024 :खान्देशातील बोलीभाषा लेवा गणबोलीतून अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे.खानदेशातील आसोद हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता वाटणारे काव्य सहजसोप्या बोलीत लिहिणार्या कवयित्री #बहिणाबाई_चौधरी यांचा आज स्मृतिदिवस.
बहिणाबाई या निरक्षर होत्या, तथापि त्यांच्यापाशी काव्यरचनेची प्रतिभा होती. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या मराठी कवितेत त्यांच्या कवितेचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतल्या, एका अशिक्षित, शेतकरी कुटुंबातल्या स्त्रीच्या अंगभूत प्रतिभेचा आविष्कार म्हणजे त्यांची कविता आहे. त्या काळच्या साहित्यिक घडामोडींचा किंवा आधुनिक जाणिवांचा कुठलाही प्रभाव त्यांच्या कवितेवर पडलेला दिसून येत नाही. कुठल्याही साहित्यिक संस्कारांपासून दूर, स्वतःच्या आणि स्वतःभोवतीच्या माणसांच्या जगण्यात जन्मलेली, वऱ्हाडी खानदेशी बोलीतली बहिणाबाईंची कविता आहे. म्हणूनच या कवितेचं एक वेगळं असं स्वतंत्र विश्व आहे. तिला मौखिक परंपरेतल्या ओवी या प्रकाराचा बाज आहे. ग्रामीण भागातल्या दैनंदिन जीवनक्रमाशी बांधलेल्या साध्यासुध्या, कष्ट करणाऱ्या कुटुंबात रमलेल्या पण स्वतःच्या नि इतरांच्या जीवनाकडे डोळसपणे पाहणाऱ्या स्त्रीचं भावविश्व त्यांच्या कवितेतून व्यक्त झालं आहे.
खानदेशात जळगाव जिल्ह्यातल्या असोदे या गावी बहिणाबाईंचा महाजन कुटुंबात जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा जळगावातल्याच नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला; मात्र तरुण वयातच त्यांना वैधव्य आलं. पतीच्या मृत्यूनंतर त्यांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून जावं लागलं. त्यांचं एकत्र असलेलं सासरचं कुटुंब विभक्त झालं. या परिस्थितीलाही मोठ्या धीराने आणि लढवय्या वृत्तीने सामोरं जात त्यांनी मुलगी काशी आणि मुलं सोपान आणि ओंकार यांना वाढवलं. त्यांचा थोरला मुलगा ओंकार याला त्या काळी मोठ्या प्रमाणात पसरलेल्या प्लेग रोगाशी सामना करावा लागला. त्यातून तो वाचला, पण त्याला अपंगत्व आलं. आयुष्यातल्या अशा संकटांतूनही बहिणाबाईंच्या वृत्तीतला टिकून राहिलेला आशावाद आणि शहाणपण अजूनच उजळलेलं दिसतं. शेतीचं आणि घरातलं काम करता करता बहिणाबाई उत्स्फूर्तपणे ओव्या रचत आणि गात असत. त्यांचे पुत्र सोपानदेव आणि त्यांचे मावसबंधू पीतांबर चौधरी यांनी त्या ओव्या वेळोवेळी उतरवून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी जळगावात मृत्यू झाला. त्यानंतर सोपानदेव यांनी आपल्या आईच्या टिपून ठेवलेल्या या कविता आणि ओव्या आचार्य अत्रे यांना दाखवल्या, तेव्हा अत्र्यांनी ‘हे तर बावनकशी सोनं आहे’ अशी उत्स्फूर्त दाद देत या कविता प्रकाशात आणण्यात पुढाकार घेतला.
स्वतः कवी असलेले सोपानदेव यांनी आचार्य अत्रे यांच्या मदतीने १९५२ मध्ये ‘बहिणाईची गाणी’ या संग्रहरूपात बहिणाबाईंची कविता प्रकाशित केली. या संग्रहाला आचार्य अत्रे यांनी एक नेटकी प्रस्तावना लिहिली. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे, आणि मौज ही आहे, की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे.’
बहिणाबाईंचं सूक्ष्म निरीक्षण आणि कल्पनेची प्रतिभा त्यांच्या कवितेतल्या ओळीओळींतून आपल्याला जाणवते.
‘ माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत
पावसात समावतं, माटीमधी उगवतं। ’
कृषिजीवनाशी समरस झालेलं, त्यावर नितांत प्रेम असलेलं आणि त्यातच ईश्वराचं अस्तित्त्व आहे अशी श्रद्धा बाळगणारं बहिणाबाईंचं मन या ओळींमधून प्रकट झालेलं आहे.
त्यांची ‘घरापासून मळ्याकडे’ ही घरातून निघून मळ्याकडे जाताना त्यांना जे जे दिसतं ते ते व्यक्त करणारी कविता मुळातून वाचण्यासारखी आहे.
‘ देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते। ’
असं सासर आणि माहेर या परिघातलं स्त्रीविश्वही त्यांच्या कवितेत आपसूक येतं. मात्र, त्यातला आशय हा परिघ ओलांडून जाणारा आहे.
‘नाही वाऱ्यानं हाललं, त्याला पान म्हनू नही’ यासारख्या काही सुभाषितांमधून त्यांची कविता कधी प्रकट होते, तर कधी ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस, लोभासाठी झाला, मानसाचा रे कानूस’ यासारखे तात्त्विक बोलही सुनावते.
‘ अरे संसार संसार, जसा तावा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तव्हा मियते भाकर। ’
अशा दृष्टान्त देणाऱ्या कवितांमधून स्वतःचं अनुभवविश्व मांडताना त्यांनी एकाच वेळी स्त्रीचं जगणं अधोरेखित केलंय तर दुसऱ्या बाजूला हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाची जगण्याची विदारकताही समोर आणली आहे. त्यांच्या शेतकरी असण्यातून, स्त्री असण्यातून अत्यंत सहजपणे येणारी कविता ही मानवी जीवनाकडे पाहण्याचं शहाणपण देते. हेच त्यांच्या कवितेचं मोठं वैशिष्ट्य ठरावं.
बहिणाबाईंच्याच भाषेत सांगायचं तर ‘अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गानं, पोटातून येतं व्होटी’ असं त्यांचं उत्स्फूर्त काव्य आहे. कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत लेवा गणबोलीत रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. अनुवादक माधुरी शानभाग आहेत. खान्देशी लोकांच्या मागणीला मान देत महाराष्ट्र शासनाने नुकतेच जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा केला आहे. एका निरक्षर पण सहजसोप्या पध्दतीने जीवनाचे तत्वज्ञान मांडणार्या कवयित्रीचे या भागावरील असलेले ऋण व्यक्त केले आहे.
– योगेश शुक्ल 9657701792