जाळे पसरले आहे.. सावधान असा !
संपादकीय पान…….
जाळे पसरले आहे.. सावधान असा !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/11/ 2024 :
महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व ठरावा असा राजकीय निकाल काल लागला. भल्याभल्यांना चक्रावणारा हा निकाल दिर्घकाळ स्मरणात राहील. या निकालाचे कवित्व गाताना बहुतांशी राजकीय विचारवंत या अभूतपूर्व २३३ जागांच्या यशाचा सिंहांचा वाटा अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ” लाडकी बहीण योजना” देत आहेत. खरेच ही योजना एवढं अभूतपूर्व यश देऊ शकते का ? विचार व्हावा.
महाराष्ट्र… गेल्या पाच वर्षांत प्रचंड राजकीय उलथापालथी मध्ये गुंतलेला आहे. कधी नव्हे तेवढ्या राजकीय बातमीत सर्वसामान्य माणूस रस घेताना दिसत आहे. जे काही बरंवाईट या पाच वर्षांत घडत आलय त्यापैकी बरेच काही त्याला पटलेले नाही. महाराष्ट्र हा शिवछत्रपती, जोतीराव, शाहू, आंबेडकर, कर्वे , गोखले , प्रबोधनकार, यांचा वारसा सांगतो. अन्यायाला भिडणारा महाराष्ट्र ही त्यांची मुख्य ओळख. गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींवर तो बारकाईने लक्ष ठेवून होता हे अभ्यासकांचे निरीक्षण होते. लोकसभेत यांची पहिली चुणूक दाखवली महाराष्ट्राने. पण अवघ्या चारपाच महिन्यात लाडकी बहीण चमत्कार घडला आणि महाराष्ट्र सगळं काही विसरून सत्ताधाऱ्यांना एवढ्या अभूतपूर्व पध्दतीने शरण जातो हे ज्याला पटेल व पचेल त्याला पचो. मला हे पटण व पचण शक्य नाही. लाडकी बहीण योजना नक्की यशस्वी ठरली. पण ती सत्ताधाऱ्यांना अमर्याद यशापर्यत घेऊन जाऊ शकते यावर विश्वास ठेवता येत नाही. लोकसभेत पाठीमागे पडलेले सत्ताधारी पुन्हा एकदा रेसमध्ये उभे ठाकले ते लाडकी बहीण योजनेमुळे हे मलाही मान्य आहे. पण सत्ताधाऱ्यांची त्सुनामी निर्माण करेल एवढी ताकद या योजनेत नक्कीच नाही. महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेते मिळू नयेत एवढी चमत्कारी ओवाळणी होऊ शकत नाही. मग हे वास्तव असताना कालपासून या योजनेचे अति कवित्व का गायले जातय ? प्रश्न पडला पाहिजे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार घडले आहेत. मतदारयादीतून काही नावे जाणीवपूर्वक वगळणे पासून बरेच काही घडलंय. हे सगळं गैरप्रकार लोकांच्या ओठांवर शक्य तेवढे कमी पोचावेत याकरिता लाडकी बहीण योजनेचे कवित्व पुढे आणले जातय का ? एखादी योजना एवढं अभूतपूर्व यश येत देत असेल तर मग इतर सगळे थांबवून हेच करण राज्यकर्ते वर्गाला परवडणारे आहे. ज्या कुणा व्यक्तीला थोडेफार राजकारण समजते , थोडेफार महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय इतिहासाचे भान आहे ती प्रत्येक व्यक्ती सत्ताधारी वर्ग या योजनेमुळे जास्तीत जास्त १६० जागा मिळवेल पण … १६० ते २३४ एवढ्या वाढीव ७५ जागा यशमान होऊ शकतात यावर विश्वास ठेवणे कठीण आहे… काहीतरी नक्कीच अकल्पनीय घडलंय एवढेच सत्य आहे.
उमेश सूर्यवंशी
कोल्हापूर
९९२२७८४०६५