ताज्या घडामोडी

हुडवा

हुडवा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/10/ 2024 : एकत्र कुटुंबपद्धती, वेळेवर पाऊसपाणी, मोठ्या प्रमाणात शेती, जितकी गोठ्यात जनावर , तितकीच घरात पोर, बाळ.! तवा ग्यास न्हवता, स्टो न्हवता,लायटीची शिगडी न्हवती, गोबर ग्यास न्हवता, राकील मोजकच मिळायचं आणि चुलीवरच दहा पंधरा खाणाऱ्या तोंडाच्या भाकरी थापल्या जायच्या. झाड ढीगभर त्यामुळं जळणाची चिंता न्हवती? कितीबी जळण जाळा.? जळणाला काय कमी न्हवती, आणि आहे म्हणून आताच्या लोकांगत सगळं जाळून पुढच्या पिढीच्या हातात कटोरा देण्याची पद्धत जुन्या लोकांच्याकडे न्हवती.! जळण चांगलं व कठीण आसल तर बायला सयपाक भराभरा उरकायचा, नायतर फुलबाजागत जळून जात बायांच धुराडीत डोळ जायाचं , तरीही बाया धुराला मेचत न्हवत्या..पण जळणाबरोबर शिंकुट ग्रामीण चुलीला व संसाराला हातभार लावायची.!
ही शिंकुट लावून त्याचा हुडवा करायची एक पद्धत हुती. हुडवा पावसाळ्याच्या अगोदर तयार हुन वाळायला लागतो. दिवाळी आली आणि पाची पांडव करायला सुरुवात किली की तिथून शिंकुट आणि हुडवा करायला गावोगावी बायका नादी लागायच्या. लोक कमी शिकली असली तरी व्यावहार रितभात हुती, घरात कामाचं वाटप व्ह्यायच जेला झेपल तीच काम दिल जायचं. प्रत्येकाच्या घरात एक बाय घर राखणीसाठी , दळन,कांडन, शिवण, टिपण, पापड भातुडया,सारवण, यांसह आल्या गेलेला पावना, खळ्यावर वाळत घातलेलं,धान्य, कोंबड्याची पिल्ल, भिकारी,आकारि, बयतकरी, आणि नंतर ही काम आवरून शिंकुट.!
आंन खाऊन बाराच्या टोल्याला घरातला कोणतर गडी किंवा बाय गोठ्यात जनावरांची बिरड फोडायची आणि मुतत शिंग हालवत जनावर माळाचा रस्ता धरायची. त्यात एकादी म्हस किंवा गईच्या पायाला खर यायची ती पाय वडत सर्वांच्या मागंन चालायची. जनावर गिली की शेणाची पाटी घिऊन बाय त्यांच्या पावटया गोळा करायची.! शेणात बी लय प्रकार कायच श्यान नुसतं बिरबीरीत ,हात घालून उचलोस्तर भुईला पडून रिकाम . आसल श्यान कलनचं भराय लागायचं , एकत्र पाठीत तळात चगाळ घालायचं जेणेकरून उचलल्यावर डोक्यात पडू नये. पाटी लांब आसल तर दुनि हातानी पू भरायचा आणि लांब ढेंगा करून पळत पाटिपर्यंत जायचं.! कायच शान अगदी गोलाकार शेंकुट जाग्याव लावल्यागत भारी असायचं,आणि बैलांची शेणाची पद्धत येगळीच असायची .
भरल्याली पाटी मग शेंकुट लावायच्या ठिकाणावर न्यायची, ठिकाण तस अडचणीतल, कुणी जाऊ नये,चोरू नये,आणि महत्वाचं कोंबड्या जाऊन इसकाटु नयेत आस असायचं. माती चिटकू नये म्हणून खाली टाकायला उसाचा पाला, नायतर बुस्काट असायचं. जागा नसल तर आगोदर लावल्याली व वाळल्याळी शिंकुट काढायची, आणि ग्रामीण लोकगीत गुणगुणत थापटया घालायचं काम अगदी आनंदान चालायचं. वाळल्याळी ही शिंकुट एकत्र करून त्याचा हुडवा केला जायचा, हुडवा पावसाळ्यात पाणी जाऊन भिजू नये अशा ठिकाणी असायचा . दगड मांडून किंवा आडवी चार लाकड टाकून त्यावर कडब्याच्या पेंढ्या किंवा पटकार टाकून जागा केली जायची.आणि गोलाकार पद्धतीने एकावर एक शिंकुट रचत हुडव्याला आकार दिला जायचा.!
दोनशे ते एक हजार शिंकूटाचा हुडवा असायचा. शिंकुट रचून झाली की त्याला शेणान सारवून लेप दिला जायचा जेणेकरून पावसाचं पाणी आत जाऊ नये.!अगदी बारकाईने हे केलं जायचं . एखादया अद्भुत वास्तुकलेप्रमाण हे काम चालायचं.! लीपलेला हुडवा वाळला की काम संपायच .! बायकांना हायस वाटायचं आता एवढ्यावर पावसाच पाच ते सहा महिन आरामात निघत्यात असा त्यांचा अंदाज असायचा. पावसात जळण भिजलेल असायचं पेटायच न्हाय म्हणून हुडवा.! पाऊस रातभर पडायचा आणि चुलीत लालभडक झालेली शिंकुट घराला ऊब द्यायची, व त्यावर चविष्ट रुचकर अन्न तयार केलं जायचं.! भाकरी ,कोरड्यास त्यावर लवकर तयार होत चवदार असायचं.! त्यात एखादि बाळातीन बाय आसल तर तिच्या शेगडीसाठी हुडवा मोठा केला जायचा.
बाळातीन व बाळाला धूर लागू नये म्हणून मग घराच्या भायर शेणकुट पेटवली की लालभडक शेंकुट लोकांडाच्या पाटीत घालून खाटखाली थंडीच्या दिवसात ठेवली जायची. त्यात आईच्या मायेची ऊब असायची सुख समाधानानं झोप व्हायची.ग्यासच्या काळात आता हुडवा नाहीसा झाला. शेणात हात घालन तर दूर पोरींना आता शेती व शेतकरी नवराही नकोय. मात्र शहरात राहून चुलीवरच मटन व भाकरी खायची तल्लफ होते. गांधीजींनी सांगितलं खेड्याकड चला मात्र आम्ही शहराकडे धावतोय.! आता ग्रामीणता जपताना आम्हाला कमीपणा वाटतोय हे दुर्दैव.! गावातल्या संतोष पाटील या मित्राच्या घरासमोर हुडवा दिसला आणि लिखाणाची वेडीवाकडी शिंकुट त्यात रचली…!

✍️ विनायक कदम.9665656723

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button