ताज्या घडामोडी

खरे भिकारी… आणि आमचे दरिद्री नारायण !!!

खरे भिकारी… आणि आमचे दरिद्री नारायण !!!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/11/ 2024 :
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट पुणे चे ट्रस्टी आदरणीय श्री प्रताप भोसले सर, यांचा एके दिवशी मला फोन आला आणि म्हणाले, ‘तुमच्या याचक मंडळींना प्रत्येकी दहा किलो साखर; दिवाळीच्या मुहूर्तावर द्यायची आम्हाला इच्छा आहे.’
मी हरखुन गेलो…!
तरीही भोसले सरांना मी म्हणालो, ‘सर आपण हे दान त्यांना मोफत नको देऊयात… त्यांच्याकडून काहीतरी छोटं मोठं काम करून घेऊया आणि मग त्यांना हि साखर देऊया… !
ते म्हणाले, ‘तळजाई टेकडी साफ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, आम्ही ते रोज करतो, यात तुमच्या खराटा पलटणचे लोक येतील का ?
आणि मग आमच्या खराटा पलटण मधील वीस लोकांना आम्ही घेऊन गेलो… तळजाई टेकडी आम्हाला जमेल तशी आम्ही स्वच्छ केली…


यानंतर ट्रस्टच्या मार्फत, श्री प्रताप भोसले सर यांच्या हस्ते आम्हाला एक किलो ? दोन किलो ? नाही…. तर तब्बल 500 किलो साखर मिळाली… !
यापैकी ज्यांनी स्वच्छतेचं काम केलं होतं, अशा वृद्ध याचकांमध्ये 26 ऑक्टोबर रोजी 350 किलो साखर आम्ही श्री शंकर महाराज मठामध्येच वाटून टाकली… !
सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या समक्ष…. !!!
यानंतर श्री प्रताप भोसले साहेब आणि त्यांच्या सेवेकर्‍यांनी आम्हाला आदराने बसवून जेवू घातले…. महाप्रसाद दिला… !
VIP कोट्या मधून आम्हाला सन्मानाने श्रीं चे दर्शन घडवले… !
तुम्ही भिकारी किंवा भिक्षेकरी किंवा याचक नसून माणसं आहात…. याची आम्हाला त्यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली… !
यावेळी माझ्या डोळ्यात पाणी होतं…!
भिक्षेकरी वर्गाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी आदरणीय सद्गुरु श्री शंकर महाराज याच्या पायाशी नतमस्तक होत आहे…. !
ज्या भोसले सर आणि त्यांच्या सेवेकर्‍यांनी आम्हा सर्वांना मानाची वागणूक देऊन, माणुसकीचे दर्शन घडवले, अशा सर्वांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना प्रणाम करतो… !!!
भिकारी / भिक्षेकरी म्हणजे गलिच्छ लोक… घाण आणि कचरा करतात…. असा एक समज आहे !


आज माझ्या या याचक मंडळींनी; माझ्या एका शब्दावर, “तथाकथित उच्च वर्गीय (??) लोकांनी” तळजाई टेकडीवर पिलेल्या दारूच्या बाटल्या उचलल्या… सोबत लेज, कुरकुरे आणि इतरही काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या उचलल्या आहेत…. !
मी लहान असताना, आमच्या घरात कचरा उचलायला एक मावशी आली होती… तिने घराची बेल वाजवली आणि मी आईला म्हणालो, ‘कचरा दे… कचरेवाली मावशी आली आहे….’
माझ्या आईने घरातला कचरा देत, त्या मावशीच्या हातात काही खायच्या वस्तू ठेवल्या आणि मला म्हणाली, ‘कचरेवाली ती मावशी नाही… कचरेवाले आपण आहोत बाळा ..!’
या शब्दांचा अर्थ तेव्हा मला कळला नाही; परंतु आता कळतो आहे…!
पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या टाकणाऱ्या श्रीमंत लोकांना मला सांगायचं आहे… “खऱ्या अर्थाने तुम्ही भिकारी आहात… !”
मी भिकारी हा शब्द वापरत नाही, भिक्षेकरी किंवा याचक हा शब्द वापरतो…
परंतु त्यांच्यासाठी भिकारी हाच शब्द योग्य आहे… !!!
पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या फेकणे, प्लास्टिकचे पिशव्या फेकणे, प्लास्टिक बाटल्या फेकणे आणि त्या न उचलणे…
हे सर्व करणारे लोक, कदाचित सुशिक्षित असतील, परंतु सुसंस्कारित नाहीत…. !
आणि म्हणून बुद्धी, मन, अंत:करण पैशाला विकणारे… हे लोक खरे भिकारी आहेत… !!!
इथे या लोकांसाठी मला *भिकारी* हाच शब्द वापरायचा आहे… !
असो “या भिकाऱ्यांनी” केलेली घाण… माझ्या दरिद्रीनारायणाने आज साफ केली आहे… !
या बदल्यात सद्गुरु श्री शंकर महाराज यांनी मात्र प्रत्यक्ष आम्हाला आशीर्वाद देऊन, आज खऱ्या अर्थाने आम्हा दरिद्रीनारायणांना श्रीमंत केलं आहे…. !!!
नतमस्तक !!!
२७ ऑक्टोबर २०२४

*डॉ अभिजीत सोनवणे
*डॉक्टर फॉर बेगर्स
*सोहम ट्रस्ट पुणे
*9822267357

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button