ताज्या घडामोडी

रानभाजी – चाई

रानभाजी – चाई

शास्त्रीय : Dioscorea Pentaphylla
कुळ : Discoreaceae
स्थानिक : शेंडवेल, शेंदूर वेल, मांदा, करांदा
इंग्रजी : Five Leaf Yam, Mountain yam, Prickly yam, Wild yam

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक28/9/ 2024 : चाई हि एक वेलवर्गीय वनस्पती आहे. याला मोहोर व कंद येतो. मोहोराची भाजी म्हणून उपयोग होतो. जमिनीखाली १ फुटावर कंदमूळ येते. पावसाच्या सुरवातीला डोंगरकपारीला या वनस्पतीच्या वेली दिसतात. प्रामुख्याने कोकण, पश्चिम घाट या परिसरात मोठ्या प्रमाणावर ही वनस्पती वाढलेली दिसते. कोकणात पालघर जिल्ह्यात मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड डहाणू तसेच नाशिक जिल्ह्यातील हर्सूल, पेठ, सुरगाणा व नगर जिल्ह्यातील अकोले तसेच पुण्यातील जुन्नर, मावळ या भागातील जंगलात ही वनस्पती मुबलक प्रमाणात वाढते. पावसाच्या सुरवातीला नाशिक- जव्हार- डहाणू महामार्गावर आदिवासी लोक या वेलीची कोवळी डिरे विकायला घेऊन बसतात. पावसाळ्यात साधारण १५ ते २० दिवसांनी जंगलात चाईचे कोवळी डीरे उगवलेली असतात. जंगलातील मोठ्या वाढ झालेल्या वेलींना ५ ते ६ फूट लंबगोलाकार कंद जमिनीत खोलवर वाढलेले असतात. पावसाळा संपल्यावर काही महिन्यांत कंद पूर्णपणे वळून जातो, पण वेलीच्या खाली कंद तसाच असतो. पुढील वर्षी पाऊस सुरू होताच जमिनीतून पुन्हा हा वेल उगवू लागतो. हीच ती कोवळी डीर आदिवासी लोक तोडून आणून आपल्या आहारात वापरतात.
खोड
या वनस्पतीचे खोड नाजूक व आधाराने वाढणारे असते. दुसऱ्या मोठ्या झाडांना गुंडाळत हा वेल १५ ते २० फुटांपर्यंत वाढतो. जुन्या झालेल्या खोडास खालील भागात लहान काटे वाढतात.
पाने
पाने संयुक्त, एका आड एक, ३ ते ५ पर्णिका, टोका कडील पर्णिका मोठी असते. पानाचा देठ २.५ ते ७.५ सेंमी लांब, पण पर्निकांचे देठ अगदी लहान. ५ ते १०.५ सेंमी लांब व २.४ ते ५.० सेंमी रुंद, गुळगुळीत.
फुले
लहान, एकलिंगी, नियमित, हिरवट पांढरी, लांब लोंबणाऱ्या पुष्प मंजिरीत झुपक्यानी येतात. नर फुले व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. नरफुले लहान, पांढऱ्या रंगाची, पानांच्या बेचक्यातून खाली लोंबणाऱ्या लहान लहान मंजिऱ्यातून येतात. फुलांच्या मंजिरी शाखा २.५ ते ३.८ सेंमी लांब, झुपक्यानी येतात. मुख्य पुष्प मंजिरी ०.५ ते १ फूट लांब असते. तीन वांझ पुकेसर मध्ये वांझ बीजांड कोशाची विभागणी असते. मादी फुले हिरवट रंगाची व पानाच्या बेचक्यातून खाली लोंबणाऱ्या ५ ते १५ सेंमी लांब पुष्पमंजिरीत येतात. बीजांडकोश लंबगोलाकार, तीन विभागी व तीन कप्पी असतात.
फळे
त्रिकोणी आकाराची, पंखधारी. बिया अनेक १.२ ते १.५ सेंमी लांब, चापट्या व पातळ असतात.
औषधी उपयोग
या वेलीचे कंद कापून सूजेवर बांधतात, यामुळे सूज कमी होते. आजारपणात कंद शक्ती येण्यासाठी भाजून खायला देतात.
पाककृती
साधारण सप्टेबर ऑक्टोबर मध्ये चाईच्या वेलाला मोहोर यायला सुरवात होते. या फुलांची भाजी अतिशय रुचकर लागते.
कोवळ्या डिराची भाजी
# साहित्य- चाईची कोवळी डीरे, २-३ बारीक चिरलेले कांदे, ३-५ बारीक चिरलेल्या लसून पाकळ्या, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ, तेल, जिरे, मोहरी.
# कृती- प्रथम चाईचे कोवळी डीरे स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक चिरून घ्यावे. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून बारीक चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या, हळद व लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यावे. त्यात बारीक चिरलेले चाईचे डिरे घालून शिजवून घ्यावे. नंतर चवी प्रमाणे मीठ घालावे.
मोहोरची भाजी
# साहित्य- चाईचा मोहोर, २-३ उभे चिरलेले कांदे, ३-५ बारीक चिरलेल्या लसून पाकळ्या, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, तेल, जिरे, मोहरी.
# कृती- प्रथम चाईचा मोहोर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. देठे काढून टाकून मंजिऱ्या काढून घ्याव्या. एका पातेल्यात पाणी गरम करून वाफवून घ्याव्यात. गार झाल्यावर मोहोर पिळून, फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून उभा चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या हळद व लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यावा. त्यात मोहोर घालून चांगले शिजवून घ्यावे. नंतर चवी प्रमाणे मीठ घालावे. भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी.
कंदाची भाजी
# साहित्य- चाईचे कंद, ३-४ काकड ची फळे किंवा बोंडाऱ्याचा पाला, २-३ बारीक चिरलेले कांदे, ३-४ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, कोंथिबीर, चवीपुरते मीठ, तेल, जिरे, मोहरी.
# कृती- प्रथम चाईच्या कंदावरची साल काढून टाकावी व त्याचे बारीक तुकडे करून पाण्यात शिजवून घ्यावेत. नंतर फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून बारीक चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या हळद व लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यावा व त्यात शिजवलेले कंदाचे तुकडे घालून चांगले परतून घ्यावे. नंतर चवी प्रमाणे मीठ मिसळावे. भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी. ही भाजी बटाट्याच्या भाजी प्रमाणे लागते.

अश्विनी चोथे
७७४३९९१२०६
क.का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय,नाशिक
संदर्भ : अ‍ॅग्रोवन
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button