ताज्या घडामोडी

रानभाजी – शेवळा

  1. रानभाजी – शेवळा
    शास्त्री : ऍमोरपोफॅलस कम्युट्यॅटस
    कुळ : ऍरेसी
    इंग्रजी : एलिफंट फूट याम, ड्रॅगन स्टॉक याम
    इतर नावे : शेवळे, शेवरा, रानसुरण
    अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
    संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
    अकलूज दिनांक23/9/ 2024 : शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतील जंगलात आढळते. महाराष्ट्रामध्ये कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. ही पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी रानभाजी आहे. २, ३ आठवडेच मिळते. ही भाजी साफ करणे किचकट काम
    कंद – रोपवर्गीय वनस्पतीचा कंद जमिनीत असतो. त्याचा आकार गोल चपटा किंवा गोलाकार उभट असतो. साधारणपणे १० ते १२ सेंमी व्यास व ४ ते ५ सेंमी उंचीचा असतो. कंद गडद करड्या किंवा तांबूस करड्या रंगाचा असतो. कंदावरची साल काढून, तुकडे करून ते सुकवितात. तुकडे दोरीत ओवून ‘मदनमस्त” या नावाने बाजारात विकतात. हे तुकडे उदी रंगाचे, सुरकुतलेले असून, त्यावर पुळ्या असतात. पाण्यात भिजविल्यावर हे तुकडे फुगतात, नरम होतात. त्यांची चव पिठाळ, जरा कडू व तिखट असते.
    पान – पावसाळ्यात जमिनीत असणाऱ्या कंदापासून एक पान तयार होते. पानाचा देठ ६० ते ८० सेंमी लांब व १.८ ते २.२ सेंमी रुंदीचा असतो. देठाचा वरील भाग निमुळता. देठ भरीव व त्वचेवर काळसर गडद हिरवे डाग असतात. देठाच्या टोकांवर त्रिविभागी संयुक्त पान असते. या पानांचा गोलाकार घेर ६० ते ७० सेंमी इतका असतो. पर्णिका ५ ते १२.५ सेंमी आकाराची, पसरट.
    पुष्पमंजिरी व फुले – कंदापासून पान तयार होण्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर मे महिन्यात शेवळा वनस्पतीला कंदापासून पुष्पमंजिरी तयार होते. या वनस्पतीची मंजिरी लंबगोलाकार आकाराची असते. पुष्पमंजिरीचा देठ ३० ते ९० सेंमी लांब व १.८ ते २.२ सेंमी रुंद असतो. त्याच्या त्वचेवर काळसर गडद हिरवे डाग असतात किंवा संपूर्ण त्वचा काळसर तपकिरी रंगाची असते. पुष्पदांड्याच्या टोकावर १५ ते २५ सेंमी लांब व ५ ते १२.५ रुंद, टोकाकडे निमुळते होणारे जांभळट तपकिरी रंगाचे जाड आवरण असते. आवरणाच्या आतील बाजूस गुलाबी पांढरट रंगाच्या पुष्पदांड्यावर लहान, देठरहित नर व मादी फुले असतात. नर फुले तपकिरी, जांभळट रंगाची, वरील बाजूस, पुंकेसर २ ते ४, मादी फुले लालसर तांबूस रंगाची. बीजांडकोश एक कप्पी. फळे लहान, गोलाकार, लालसर, गुच्छाने पुष्पदांड्याच्या टोकांवर येतात. बी एक, गोलाकार, लाल रंगाची. शेवळ्याला मे-जून महिन्यात फुले येतात. त्यावेळी पाने नसतात. फुलांना मांस कुजल्या सारखा अत्यंत घाणेरडा वास येतो.
    औषधी गुणधर्म
    # शेवळ्याचा कंद औषधात वापरतात. याच्या कंदाची पाने दूध आणि साखरे बरोबर वाजीकरणासाठी देतात. यामुळे मूत्रमार्गास उत्तेजन येते. # शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात. शेवळा थोडा खाजरा असतो, म्हणून सोबत काकड या वनस्पतीची आंबट फळे घालतात. शेवळा भाजी पौष्टिक असते. काकड फळांचा रस काढतात. या रसामुळे भाजी खाजत नाही. ही फळे आवळ्या सारखी दिसतात.
    पाककृती – कंदाची भाजी
    # साहित्य – शेवळ्याचे कंद, काकड फळे, चिरलेला कांदा, तिखट, हळद, लसूण पाकळ्या, हरभऱ्याच्या डाळीचा भरडा, तेल, मीठ, चिंच, गरम मसाला, कोथिंबीर.
    # कृती – हरभऱ्याची डाळ थोडी गुलाबी रंग येई पर्यंत भाजून मिक्‍सरवर जरासा जाडसर भरडा करावा. प्रथम शेवळा कंदावरची साल काढून त्याचा देठाकडचा केशरी रंगाचा भाग काढून टाकावा. कंदाचे चिरून बारीक तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर तेलावर बारीक चिरलेली भाजी थोडा वेळ परतून घ्यावी. नंतर काकड फळांतील बिया काढून टाकून फळांचा रस काढावा. तेलावर बारीक चिरलेला कांदा, लसूण फोडणीला घालावा. फोडणी परतल्यावर हळद, तिखट, गरम मसाला घालून परतावे. त्यात मीठ व काकडचा रस घालावा. दोन चमचे चिंचेचा कोळ घालून थोडी वाफ आल्यावर डाळीचा भरडा घालून चांगले परतावे. चांगली वाफ येऊ द्यावी, म्हणजे भरडा थोडा सुका होतो व शिजतो. भाजी शिजल्या नंतर वरून कोथिंबीर घालावी. कोळंबी किंवा खिमा घालूनही भाजी करता येते.
    पाककृती – कंदाची भाजी
    # साहित्य – शेवळाचे कंद, काकड फळे, शेंगदाणे, हरभरा डाळ, चिंचेचा कोळ, डाळीचे पीठ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला, ओले खोबरे, हिंग, मोहरी, हळद.
    # कृती – शेंगदाणे व हरभऱ्याची डाळ भिजवून नंतर शिजवून घ्यावे. साल काढलेल्या कंदाचे चिरून तुकडे करावेत. ते पाण्याने धुतल्या नंतर शिजवून पाणी काढून घोटून घ्यावेत. त्यात थोडे डाळीचे पीठ घालावे. नंतर त्यात भाजीचे पाणी घालावे. चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला घालून पळीवाढी भाजी करावी. ओले खोबरे घालावे. वरून तेलामध्ये हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. काही ठिकाणी ही भाजी तांदळाच्या धुवणात शिजविण्याची पद्धत आहे.
    पाककृती – पानांची भाजी
    # साहित्य – शेवळ्याची कोवळी पाने, मूगडाळ, लाल मिरच्या, आमसुले, दाणेकुट, नारळ चव, गूळ, मीठ, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट.
    # कृती – शेवळ्याची कोवळी पाने धुऊन बारीक चिरावीत. आमसुले पाण्यात भिजत ठेवावीत. तेलाच्या फोडणीत लाल मिरच्या व मूगडाळ घालावी. थोड्या वेळाने चिरलेली पाने घालावीत. नंतर आमसुलाचा कोळ घालावा. मीठ, तिखट, गूळ घालून भाजी शिजवावी, नंतर दाणेकूट व नारळचव घालावा.
    पाककृती – पानांची भाजी
    साफ करून कापलेली भाजी, कापलेला कांदा एकत्र कुकरला लावावी. सोबत मिळणारी फळं (काकडं) त्याच कुकर मध्ये वेगळ्या भांड्यात ठेवावी, २ शिट्या काढाव्या. फळांमधली बी काढून गर थोडे पाणी घालून वाटून घ्यावा आणि गाळून त्याचे पाणी घ्यावे, चोथा फेकून द्यावा. कढईत तेलावर कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण, तिखट, गरम मसाला किंवा चिकन मसाला, मीठ घालून परतून घ्यावे. त्यावर कोळंबी परतून घ्यावी. त्यावर कुकर मध्ये शिजलेली भाजी नि कांदा घालून परतावे. त्यात पाणी घालून दबदबीत रस्सा करावा. त्यात काकडांचा रस घालावा. २-३ आमसुलं किंवा चिंचेचा कोळ घालावा. आणि उकळी आणावी. चव बघून तिखट, मीठ, आंबट करावे. तांदळाची भाकरी किंवा आंबोळी सोबत भाजी खावी.
    डॉ. मधुकर बाचूळकर
    संदर्भ : विकासपीडिया/अ‍ॅग्रोवन
    संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button