ताज्या घडामोडी

रानभाजी – माचोळ

रानभाजी – माचोळ

शास्त्रीय : ऍरथ्रोसिनीमम इंडिकम
कुळ : चिनोपोडीएसी
स्थानिक : मचूर, माचूर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : प्रविण सरवदे /आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 12/9// 2024 : माचोळ ही वनस्पती मांसल, बहुवर्षायू लहान झुडुपवर्गीय पर्णरहित वनस्पती आहे. ही वनस्पती भारत, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ट्युनेशिया या देशात आढळते. भारतात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओरिसा या राज्यात आढळते. माचोळ वनस्पती कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सर्वत्र दिसून येते. ही वनस्पती समुद्र किनाऱ्यावरील खारट जमिनीत, वाळूत वाढते. माचोळ ही वनस्पती वसई, कल्याणच्या बाजारात आदिवासी लोक विकण्यासाठी काही वेळा आणतात.
खोड – मांसल, हिरवे पसरत वाढणारे.
फांद्या – अनेक, ताठ सरळ वाढणाऱ्या किंवा खाली झुकलेल्या जाड रसरशीत, मांसल, हिरव्या रंगाच्या फांद्याना अनेक सांधे, जाडसर, सांधे आसूड, फांद्या टोकांकडे विभागलेल्या या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर पाने नसतात. फांद्यामध्ये जाड, नरम गर असतो.
फुले – लहान नियमित, द्विलिंगी, हिरवट- पिवळी, छोट्या दंडगोलाकार ते २ सेंमी लांब पुष्प मंजिरीत येतात. फुलांभोवती एक ते तीन लहान पुष्पपर्णे असतात. पाकळ्या तीन चे पाच जाडसर, पुष्पपर्णे व पाकळ्या मांसल, पुंकेसर एक परागकोष जाड व मोठा. बीजांडकोश अंडाकृती, एक कप्पी, बीजांड एक, परावावाहिनी एक. परागधरिणी दोन, गोलाकार.
फळे – गोलाकार टोकाकडे निमुळती, दोन्ही बाजूस साधारण चपटी जाड पाकळ्यांनी झाकलेली असतात.
बी – एक, त्रिकोणी आकाराची, बियांवरील आवरण खडबडीत.
औषधी गुणधर्म
माचोळ ही वनस्पती पित्तशामक आहे. पित्त कमी होण्यासाठी माचोळाचा गर देतात. किंवा गरापासून शरबत करून देतात. यकृताच्या रोगात ही माचोळच्या खोडातील व फांद्यांतील गर देतात.
भाजीचे औषधी गुणधर्म
# यकृताच्या रोगात माचोळची भाजी देतात. # माचोळची भाजी जुने आमवात असलेल्या रोग्यास देतात. # माचोळ खाऱ्या जमिनीत वाढते म्हणून ती खारट असते. माचोळच्या फांद्या शिजवून त्यातील गर काढतात व त्याची भाजी करतात.
पाककृती – भाजी
# साहित्य – दोन वाट्या माचोळच्या फांद्या, एक चमचा लसूण, आले पेस्ट, एक वाटी चिरलेला कांदा, चिरलेल्या दोन-तीन हिरव्या मिरच्या, बारीक तिरलेली कोथिंबीर, किसलेले ओले खोबरे, तेल, हिंग, मोहरी, हळद, मीठ इ.
# कृती – माचोळच्या बारीक कापलेल्या फांद्या पाण्याने स्वच्छ धुवाव्यात. पाण्यात शिजवून घ्याव्यात. थंड झाल्यानंतर त्यांचे मधले दोर काढावेत व फक्त गर घ्यावा. हिंग, मोहरी, हळद, तेल घालून फोडणी करून घ्यावी. नंतर चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा. त्यावर हिरव्या मिरच्यांचे तुकडे व लसूण-आले पेस्ट घालून सर्व मिश्रण परतून घ्यावे. त्यावर नंतर वरील शिजवलेली भाजी (गर) घालावी. ही भाजी मूळचीच खारट असल्याने मीठ घालू नये. किंवा चव पाहून आवश्‍यकतेनुसार मीठ घालावे. भाजी शिजल्यानंतर कोथिंबीर व ओले खोबरे घालावे.
पाककृती – रायते
# साहित्य – दोन वाट्या माचोळच्या फांद्या, दोन चमचे तूप, एक वाटी दही, पाव वाटी ताक, जिरे, हिंग, हिरवी मिरची, एक चमचा दाणेकूट, ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ, साखर इ.
# कृती – माचोळच्या फांद्या शिजवून गर काढून घ्यावा. तुपात जिरे, हिंग, मिरची घालून फोडणी करावी, नंतर त्याच गर घालून चांगले परतावे. ताक घालून शिजवून घ्यावे. नंतर त्यात साखर, दाणेकूट, कोथिंबीर, ओले खोबरे घालावे. चवीनुसार, आवश्‍यकता वाटल्यास मीठ घालावे.
डॉ. मधुकर बाचूळकर
संदर्भ : विकासपीडिया/अ‍ॅग्रोवन
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.