ताज्या घडामोडी

नाशिकच्या मोहाडीतील पुरातन अष्टभुज श्रीकृष्णाचे मंदिर

नाशिकच्या मोहाडीतील पुरातन अष्टभुज श्रीकृष्णाचे मंदिर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क.
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26 ऑगस्ट 2024 :मोहाडी (ता.दिंडोरी) येथे पुरातन असे श्रीकृष्णाचे मंदिर असून येथे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला गावात मोठा यात्रोत्सव असतो. ही श्रीकृष्णाची मूर्ती आठ हात असणारी असून अखंड शाळीग्रामात आहे. या मूर्तीचे वर्णन पुराणात सुद्धा आढळते.अशी अष्टभुजा असणारी मूर्ती भारतात वृंदावन (मथुरा) व मोहाडी (ता. दिंडोरी) या दोन मंदिरातच असल्याचे सांगतात.या दोन्ही मुर्त्या सारख्याच असून त्या एकाच मूर्तीकाराने बनवल्या असल्याची आख्यायिका आहे.

या मूर्तीच्या अष्टभुजा पैकी कृष्णाच्या दोन हातात गाईंना मुग्ध करणारी मुरली आहे.एका हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत तर इतर हातात शंख,चक्र, गदा, गोश्रृंगवाद्य आहे. भगवंताच्या चरण कमळाजवळ दोन गोपी असून पैकी एक सनई वादन तर दुसरी मृदंग वाजवत आहे. सवस्तधेनुसह भगवंताच्या अंगास कालियाने विळखा घातला असून तो भगवंताच्या कानास दंश करत आहे. कमरेस लंगोट असून त्यावर घागऱ्याचा दागिना आहे.
विभूतीयोग सांगताना भगवंताने सांगितले की गरुड पक्षात माझी विभूती आहे तो गरुड पक्षी चरण कमळाजवळ आहे. या मूर्तीची आख्यायिका अशी:पुरातन काळी एक मूर्तिकार श्रीकृष्णाच्या आठ भुजा असणाऱ्या दोन मूर्ती घेऊन मजल दरमजल करत मथुरेला निघाला होता.
प्रवासात एका सायंकाळी त्याचा मुक्काम त्याकाळी मोहाची झाडे असणाऱ्या छोट्या वाडीत म्हणजे आजच्या मोहाडी येथे पडला. सकाळी जेव्हा मूर्तिकार पुढील प्रवासासाठी निघाला तेव्हा त्यातील एक मूर्ती त्याला हलेचना.त्याने एवढ्या प्रवासात उचलून आणलेली मूर्ती त्याला उचलेना.
शेवटी उरलेली दुसरी मूर्ती घेऊन मूर्तिकार मथुरेला निघून गेला. म्हणजेच श्रीकृष्णालाही या वाडीत राहण्याचा मोह झाला. म्हणून गावाला मोह पाडणारी वाडी म्हणून मोहाडी हे नाव पडले.
या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला या पंधरा दिवसाच्या कालावधीत मंदिरात व गावात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात रक्षाबंधनाच्या अगोदर व्याख्यानमाला तर नंतर किर्तनमाला,झेंडाकाठी उभारणे, काकड आरती भागवत, भजन, हरिपाठ असे पंधरा दिवस विविध कार्यक्रम होतात.जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी तसेच कान्होबा मंदिरात वाद्यांचा कार्यक्रम तसेच दोन दिवस विराट कुस्त्यांची दंगल व गावात भव्य यात्रा भरते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button