ताज्या घडामोडी

रानभाजी – मायाळू

रानभाजी – मायाळू
शास्त्रीय : बेसिला ॲल्बा
कुळ : बॅसिलेसी
इंग्रजी : इंडियन स्पिनॅच

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/8//2024 :
मायाळू हा बहुवर्षायू वेल असून या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात. मायाळू वनस्पती आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते. या वनस्पतीला वेलबोंडी असेही काही ठिकाणी म्हणतात. इंग्रजीत मायाळूला ‘इंडियन स्पिनॅच’ व ‘मलबार नाईट शेड’ अशी नावे आहेत. मायाळूचे तांबडा व पांढरा असे दोन प्रकार आहेत.
खोड – नाजूक, खूप लांब, बारीक, उजव्या बाजूस गुंडाळणारे, मांसल, जांभळट, करड्या अथवा हिरव्या रंगाचे असते.
पाने – साधी, एका आड एक, मांसल-जाड ५ ते १५ सेंमी लांब २.५ ते ७.५ सेंमी रुंद, अंडाकृती, तळाकडे अंडाकृती, हिरव्या किंवा तांबूस जांभळट रंगांची.
फुले – पांढरी किंवा लाल रंगाची, लहान, देठरहित, पानांच्या बेचक्यातून येणाऱ्‍या, खाली झुकलेल्या लहानशा पुष्पमंजिरीत येतात. पाकळ्या ५, जाड, मांसल, लंबवर्तुळाकार, विशालकोनी.पुंकेसर ५.
फळे – गोलाकार, लहान वाटाण्याएवढी, लाल काळसर किंवा पांढऱ्‍या रंगाची. बी एक.
औषधी उपयोग
# मायाळूचे वेल कोेकणात सर्वत्र आढळतात. मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात. रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देतात. गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे. मायाळूची भाजी पालका प्रमाणे जिरण्यास हलकी आहे.# सांध्यांच्या ठिकाणच्या वेदना व सूज कमी होण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे.# रक्तविकारात वाढलेली रक्तातील उष्णता या भाजीमुळे कमी होते व रक्तशुद्धी होते. त्यामुळे त्वचाविकारही कमी होतात.# फिरंग, उपदंश (गोनोरिया) अशा गुप्तरोगांमध्ये मूत्रमार्गात तसेच शरीरात उष्णता वाढलेली असते, अशावेळी या भाजीच्या नियमित वापराने दाह व वेदना कमी होतात. ही भाजी मूळव्याधीवरही उपयोगी आहे.# मायाळू ही औषधी वनस्पती असून, ती शीतल व स्नेहन आहे.# ही वनस्पती तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, मादक, कामोत्तेजक, चरबीकारक, विरेचक व भूकवर्धक आहे. मायाळू पित्तशामक असून त्वचारोग, आमांश, व्रण यांवर उपयोगी आहे. ही कफकारक, मादक, पौष्टिक व ज्वरनाशक आहे.# मायाळूचा अंगरस पित्त उठल्यानंतर अंगावर चोळतात. यामुळे आवा व खाज कमी होते.# परमा रोगामध्ये पानांचा रस देतात.# पानांचा लगदा केस तूट आणि गळू लवकर पिकण्यासाठी बांधतात. # मायाळू शोधशामक आणि मूत्रवर्धक आहे. मायाळूच्या पानांचा रस लोण्याबरोबर मिसळून भाजण्यावर व गरम पाण्याने पोळण्यावर आरामदायक उपाय आहे. # या वनस्पतीच्या खोडापासून निघणारे श्‍लेष्मल द्रव वारंवार डोके दुखण्यावर प्रसिद्ध उपाय आहे.
पाककृती-१
# साहित्य – मायाळूची पाने, चणाडाळ, मीठ, हिरवी मिरची किंवा तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ.
# कृती – मायाळूची पाने स्वच्छ धुवून नंतर चिरून घ्यावीत. त्यात चणाडाळ घालून एक वाफ आणावी. मिरची चिरून किंवा तिखट घालावे. चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून शिजवावी. प्रथम मीठ व नंतर गूळ घालून भाजी परतावी.
पाककृती-२
# साहित्य – मायाळूची पाने, एक वाटी शिजवलेली तूरडाळ, एक वाटी चिरलेला कांदा, एक वाटी ओले खोबरे, धने, मीठ, हळद, चार सुक्या मिरच्या, गूळ, चिंच, तेल इ.
# कृती – मायाळूची पाने धुवून चिरून घ्यावीत. मायाळूची चिरलेली पाने, अर्धी वाटी कांदा व पाणी घालून शिजवून घ्यावी. नंतर शिजवलेली तूरडाळ घालावी. धने, मिरची व खोबरे वाटून घ्यावे. वाटण, हळद, मीठ, गूळ व थोडी चिंच असे मिश्रण उकळून घ्यावे व शिजवलेल्या भाजीत घालावे. वरून कांदा घातलेली फोडणी द्यावी.
पाककृती-३
# साहित्य – मायाळूची देठासहित पाने, एक जुडी आंबट चुका, ३ ते ४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, गूळ, शेंगदाणे, हरबरा डाळ, काजू, मीठ, तेल,तिखट,मोहरी,हळद,कडीपत्ता इ.
# कृती – मायाळूची पाने बारीक चिरून घ्यावीत. आंबट चुका निवडून चिरावा. शेंगदाणे, हरभरा डाळ एक तास पाण्यात भिजवावी. कुकरमध्ये मायाळू व चुका एकत्र शिजवावा. शेंगदाणे व हरभरा डाळही त्याच कुकर मध्ये दुसऱ्‍या भांड्यात शिजवावी. पालेभाज्या कोमट झाल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक वाटाव्यात. कढईत तेलाची फोडणी करून (मोहरी, कडीपत्ता, मिरच्या, हळद) त्यात काजू परतून घ्यावेत. नंतर पालेभाज्यांचे वाटण त्यात ओतावे. मीठ व गूळ घालावा. भाजी ढवळू घ्यावी. शिजवलेले शेंगदाणे व हरभरा डाळ घालावी व पुन्हा ढवळावे. चांगली उकळी आल्यावर झाकण ठेवून आच बंद करावी. अशाप्रकारे मायाळूची पातळ भाजी तयार करता येते.
संदर्भ : विकासपीडिया/अ‍ॅग्रोवन
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button