
रानभाजी – काटेमाठ
शास्त्रीय नाव : ॲमरेन्थस स्पायनोसस
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक:आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18ऑगस्ट 2024 :
पावसाळ्यात पडीक ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेस, शेतात, कचऱ्याच्या ढिगांवर, सर्वत्र तण म्हणून काटेमाठ ही वनस्पती आढळते. ही साधारणतः एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांत फुले व फळे येतात.
खोड – गोलाकार, सरळ उंच वाढणारे. फांद्या अनेक, हिरवट, लालसर पानांच्या बेचक्यातून काटे तयार होतात.
पाने – साधी, एका आड एक, २ ते ६ सेंमी लांब अंडाकृती
फुले – लहान, एकलिंगी, नियमित, हिरवट पिवळसर, फांद्यांच्या टोकांवर तसेच पानांच्या बेचक्यांतून तयार होणाऱ्या लांबट पुष्पमंजिरीत येतात. नरफुले व मादीफुले संख्येने विपुल, एकाच पुष्पमंजिरीत येतात. पुष्पकोष ५ पाकळ्यांचा, पाकळ्या तळाकडे चिकटलेल्या. पुंकेसर ५, बीजांडकोष एक कप्पी, परागवाहिन्या दोन.
फळे – लहान, बोंडवर्गीय लंबवर्तुळाकृती, वरचा भाग जाड, सुरकुतलेला. बिया २ ते ३, चकचकीत काळसर, गोल आकाराच्या.
औषधी गुणधर्म
# काटेमाठ शीतल, दीपक, संसर्गरक्षक, सारक, ज्वरशामक गुणधर्मांची आहे. # काटेमाठच्या मुळाचा रस सेवन केल्यास भूक वाढवण्यासाठी, पित्तप्रकोप, रक्तविकार, मूळव्याध या विकाराचा त्रास कमी होण्यासाठी होतो. # काटेमाठच्या मुळांचा काढा परम्यात देतात. यामुळे पुष्कळ लघवी होऊन परमा धुऊन जातो. # त्वचारोगात दाह कमी करण्यासाठी काटेमाठची पाने वाटून लेप करतात. # गळवे लवकर पिकण्यासाठी मुळाचा लेप करतात. # काटेमाठाची पाने व मुळे उकळून लहान मुलांना विरेचक म्हणून देतात. # मूळ ज्वरनाशक तसेच दुग्धवर्धक म्हणून वापरतात.
# काटेमाठाची कोवळी पाने व कोवळ्या फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात. ही भाजी पाैष्टिक असून, पचनास हलकी आहे.
पाककृती
# साहित्य – काटेमाठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथंबीर.
# कृती – एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळून घ्यावी. नंतर त्यातील पाणी नितळून घ्यावे. नंतर एक पातेले घेऊन त्यात पाहिजे तेवढे तेल, गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे. नंतर त्यामध्ये भाजी टाकून शिजू द्यावे. नंतर कोथंबीर टाकावी.
संदर्भ : विकासपीडिया
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण