रानभाजी – कपाळफोडी

रानभाजी – कपाळफोडी
शास्त्रीय नाव : कार्डिओस्पर्मम हेलिकॅबम
कुळ : सॅपीनडिएसी
इंग्रजी नाव : हार्ट पी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक:आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16ऑगस्ट 2024 :
कपाळफोडी या वनस्पतीस कानफुटी, कर्णस्फोटा, फोफांडा अशीही स्थानिक नावे आहेत. भारतात काही ठिकाणी तिला ‘तेजोवती’ या नावाने ओळखले जाते. बियांचा आकार हृदया सारखा असल्याने इंग्रजी मध्ये ‘हार्ट पी’ असे म्हणतात. फळे फुग्यांसारखी दिसत असल्याने त्याला ‘बलून वाईन’ असेही म्हणतात. ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे वेल महाराष्ट्रातील जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. ही वर्षायू वेल आहे.
खोड – नाजूक, आधारास गुंडाळत वर चढणारे.
पाने – संयुक्त, एकाआड एक, कडूलिंबाच्या पानासारखी दिसतात. पानांचा देठ २.२ ते ३.८ सेंमी लांब, पर्णिका लांबट त्रिकोणी आकाराच्या, तळाशी निमुळत्या तर वरील बाजूस साधारण टोकदार, पर्णिकांच्या कडा कातरलेल्या, दंतूर.
फुले – लहान, पांढरी, द्विलिंगी, अनियमित, पानांच्या बेचक्यातून येणाऱ्या नाजूक छत्राकार पुष्पमंजिरीत येतात. पुष्पमंजिऱ्यांच्या टोकापासून प्रताने तायर होतात. प्रताने आधारास गुंडाळतात व वेलीला वर चढण्यास मदत करतात. पुष्पमंजिऱ्या ३.८ते १० सेंमी लांब असतात. पुष्पमुकुट चार दलांचा, दोन दले लहान, तर दोन मोठी. पाकळ्या चार, दोन लहान, दोन मोठ्या आकाराच्या असतात. पाकळ्यांची टोके गोलाकार. पुंकेसर आठ, पाकळ्यांपेक्षा लांब. बीजांडकोश तीन कप्पी. फळे त्रिकोणी, फुंग्या प्रमाणे हवेने भरलेली.
बिया – तीन, काळसर रंगाच्या. बियांच्यावर पांढरा ठिपका असतो. या वनस्पतीला ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत फूल व फळे येतात.
मूळ – मूळ पांढरे, जाड दोऱ्यासारखे असते. मुळांची रुची तिखट व कडवट तर वास किळसवाणा असतो.
औषधी गुणधर्म
# ही वनस्पती आमवातावरील उत्तम औषध आहे. आमवातामध्ये मुळांचा काढा करून देतात आणि पाने एरंडेल तेलात वाटून सुजलेल्या सांध्यावर बांधतात.
# काही वेळा पाने वाटून एंरडेल तेलाबरोबर पोटात देतात. यामुळे घाम सुटतो व ताप उतरतो. जुलाब होतात. सांधेदुखी कमी होते.
# केशसंवर्धनासाठी पानांचा वापर करतात.
# सांधेसुजीवर पाण्यात किंवा दुधात वाटतात व लेप करतात. यामुळे ठणका कमी होतो व सूज उतरते. कानदुखीत तसेच कानफुटीत कानात घालतात. यामुळे कानदुखी थांबते म्हणूनच या वनस्पतीला कानफुटी असेही नाव आहे.
भाजीचे औषधी गुणधर्म
कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. जीर्ण आमवातामध्ये पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलाविरोध यामुळे अंग जखडल्या सारखे वाटणे अशा विकारात या भाजीने चांगला गुण येतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल, अंगावरून कमी प्रमाणात जात असेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो. परमा तसेच गुप्तरोगामध्ये या भाजीचा उपयोग होतो. पानात अँटिबायोटिक व अँटिपॅरासायटिक तत्त्वे असल्याने जुनाट खोकला यावर तसेच छाती भरणे या विकारातही भाजी उपयुक्त आहे.
पाककृती १
# साहित्य – कानफुटीची पाने, लसूण, जिरे, तेल, मीठ, हिरवी मिरची इ.
# कृती – पानं स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. कढईत तेल, जिरे, लसूण यांची फोडणी द्यावी, हिरवी मिरची चिरून फोडणीत घालावी. नंतर चिरलेली भाजी घालून भाजीत मीठ घालून परतून घ्यावी. झाकण ठेवून भाजी मंद गॅसवर शिजवावी.
पाककृती २
# साहित्य – पाने, मूगडाळ, तेल, लसूण व ओली मिरची पेस्ट, मोहरी, मीठ इ.
# कृती – कढईत तेल, मोहरी, लसूण मिरची पेस्ट घालून फोडणी द्यावी. नंतर चिरलेली भाजी भिजवलेली मूगडाळ व मीठ घालून भाजी परतून घ्यावी. मंद आचेवर झाकून भाजी शिजवून घ्यावी.
संदर्भ : विकासपीडिया/ऍग्रोवन
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण