ओबीसी-मराठा संघर्षाचे चौथे पर्वः हाके, वाघमारे व ससाणे, दुसरे पर्वः मराठा सेवा संघ
ओबीसीनामा-23 लेखकः -प्रा. श्रावण देवरे

ओबीसी-मराठा संघर्षाचे
चौथे पर्वः हाके, वाघमारे व ससाणे
दुसरे पर्वः मराठा सेवा संघ
ओबीसीनामा-23 लेखकः -प्रा. श्रावण देवरे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक:भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे.
अकलूज दिनांक 14 ऑगस्ट 2024:
ओबीसीविरूद्ध मराठा संघर्षाच्या पहिल्या पर्वात संघ-भाजपाच्या मदतीने मराठायांनी ‘मराठा महासंघ’ स्थापन करून मंडल आयोगाला कसून विरोध केला. परंतू ब्राह्मण फक्त ईशारे करतात व प्रत्यक्ष मैदानात कधीच उतरत नाहीत. त्यामुळे आपण मराठे एकट्याने ओबीसींना पराभूत करू शकत नाहीत, याची पूरेपूर खात्री मराठ्यांना झाली आणी त्यांनी आपले मंडलविरोधाचे शस्त्र मॅन करून टाकले. ओबीसींनी एकजूटीने सामाजिक-राजकीय लढा उभा करून 1990 ला मंडल आयोगाची लढाई जिंकली.
महाराष्ट्रात शेतकरी कामकरी पक्षाला सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा वारसा असल्याने या पक्षातील खासदार दि.बा. पाटील, आमदार दत्ता पाटील, गणपतराव देशमूख, भाई बंदरकर तसेच कॉंग्रेसचे शामराव पेजे (कोकण, आमदार) व विदर्भातून नागेश चौधरी, विजय बाभूळकर, नितीन चौधरी, अशोक चोपडे, दिलीप घावडे यासारख्या अनेक ओबीसी नेत्यांनी मंडल आयोगाचा सामाजिक व राजकीय लढा उभा केला. लोहियावादी एड. जनार्दन पाटील हे आणखी एक आघाडीचे ओबीसी नेते. कर्मवीर जनार्दन पाटील हे ओबीसी आरक्षणासाठी आजन्म अविवाहित व ब्राह्मचारी राहीलेत. डॉ. बाबा आढाव हे मराठा असले तरी ते एक सच्चे फुलेवादी असल्याने त्यांनी मंडल आयोगाच्या लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. भाई वैद्य, एस.एम. जोशी हे नेते ब्राह्मण असले तरी ते सच्चे लोहियावादी असल्याने त्यांनी मंडल आयोगाची बाजू भक्कमपणे उचलून धरली. रामविलास पास्वान, कांशीराम, रामदास आठवले व प्रकाश आंबेडकरांसारख्या दलित नेत्यांनी मंडल लढ्यात मदत केलेली आहे. नव्वदीपूर्वीचे म्हणजे मंडल-पूर्व नेते हे सच्चे प्रामाणिक तसेच जातीविरोधी होते. या सर्वांच्या मदतीने ओबीसींनी मंडल आयोगाची लढाई जिंकली.
परंतू शत्रूला पराभूत करून लढाई जिंकली म्हणजे शत्रू कायमचा नामशेष होतो, हे वर्गव्यवस्थेत शक्य असते. वर्ण-जातीव्यवस्थेत जोपर्यंत जात्यंतक लोकशाही क्रांती होत नाही, तोपर्यंत जात-शत्रू नष्ट होत नाही व जातीयुद्धही थांबत नाही.
वर्णजातीयुद्धात शत्रू हा सरड्याप्रमाणे रंग बदलतो, रुपही बदलतो. ब्राह्मण सुरूवातीला ‘आर्य’ म्हणून तुमच्या विरोधात उभा ठाकला. नंतर तो ब्राह्मण ‘वर्ण’, व ब्राह्मण ‘जात’ या नावाने शत्रूरुपात पुढे आला. आणी आता तो ‘हिंदू’ नाव धारण करून तुमच्यात धार्मिक घुसखोरी करून तुम्हाला उध्वस्त करीत आहे. मराठा जातही ब्राह्मणांप्रमाणे नवनवे मायावी रूप घेऊन तुमचे ओबीसींचे आरक्षण खतम करीत आहे. 1990 ला मंडलविरोधी लढाई मराठे हारले आणी त्यांनी मराठा महासंघाचं ‘ब्राह्मणवादी’ रंग-रूप बदलून ‘‘मराठा सेवा संघ’’ नावाचं नवं ‘ब्राह्मणविरोधी’ रूपडं धारण केलं. मराठा सेवा संघाने ब्राह्मणांच्या विरोधात पुस्तके लिहीलीत, भाषणे केलीत, दलित-ओबीसी संघटनांकडून स्टेज मिळवलं व टाळ्याही मिळवल्या!
भांडवलदार कारखानदार आपल्या कारखान्यात कामगारांची संघटनाच उभी राहू नये म्हणून कसून प्रयत्न करतात. त्यासाठी दहशत, जाळपोळ, गुंडगिरी अशा हुकूमशाही व अनैतिक मार्गांचा वापर करतात. परंतू कामगारांच्या एकजूटीपुढे व संघर्षापुढे कारखानदार-भांडवलदाराला पराभूत व्हावे लागते. कामगार संघटना स्थापन होते व कामगारांचा विजय होतो. आता कारखान्यात संघर्षाचे नवे पर्व सुरू होते. कामगार संघटनेला विरोध करून उपयोग नाही, कारण ती स्थापन झालीच आहे. म्हणून संघर्षाच्या दुसर्या पर्वात कारखानदार घुसखोरीचे नवे शस्त्र उपसतो व कामगार संघटना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करतो. कामगार संघटनेत आपले भाडोत्री दलाल घुसवतो. कारखानदारांचे भाडोत्री दलाल गुंडच असतात परंतु ते कामगारांचा वेष परिधान करून कामगार संघटनेत घुसतात व संघटना ताब्यात घेऊन ती उद्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. राजेश खन्नाचा ‘नमकहराम’ सिनेमाची हीच स्टोरी आहे.
ओबीसींना मंडल आयोग मिळूच नये यासाठी मराठा महासंघ स्थापन करून संघर्ष केला. मराठा महासंघाचे बॅनर घेऊन मंडल आयोगाला विरोध केला, परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 1990 साली ओबीसींनी मंडल आयोग मिळविलाच! म्हणून 1991 पासून नवं ‘मराठा सेवा संघाचे’ बॅनर घेऊन मंडल आयोगाच्या जात-यादीत घुसखोरीचे षडयंत्र रचण्यात आले. घुसखोरीचे शस्त्र उपसून ओबीसींच्या विरोधात नवी लढाई सुरू झाली. या नव्या लढाईत मराठा एकटेच ओबीसींच्या विरोधात लढलेत तर पराभव निश्चित होईल, हा पुर्वानुभव घेऊन मराठ्यांनी नवी खेळी करायला सुरूवात केली.
मराठा महासंघ उघडपणे ब्राह्मणवादी होता हे त्याने 1987-88 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘‘रिडल्स इन हिंदूझम’’ची होळी करून सिद्धच केले होते. मंडल आयोगाला विरोध हे त्याचे मुख्य ध्येय्य होते. मराठा सेवा संघाचं नवं रूप धारण करतांना मराठ्यांनी आपला मराठा जातीयवाद लपविण्यासाठी त्यावर ब्राह्मणविरोधी पांघरूण घातलं, कारण ओबीसींच्या विरोधात लढतांना त्यांना दलितांची साथ मिळवायची होती. दलित सोबत असतील तरच ओबीसींच्या विरोधात आपण मराठे लढू शकतो, याची त्यांना खात्री होती.
मराठा सेवा संघाला दलितांमधून मुख्यतः बामसेफ नावाच्या दलित संघटनेची साथ मिळाली. मराठा सेवा संघांच्या नव्या मायावी रूपाला भाळून आमच्यासारखे काही कार्यकर्ते मवाळ झालेत व काही वर्षे त्यांच्यासोबत आम्हीही काम केलं. सुरूवातीला त्यांच्या मराठा आरक्षणाला पाठींबा दिला. परंतू पाठींबा देतांना तो बिन-शर्त दिला नाही. मराठा सेवा संघासोबत काम करीत असतांना त्यांच्यापासून सावधही राहीले पाहिजे, ही भुमिका सविस्तरपणे मांडण्यासाठी आम्ही त्यावर त्याचकाळी दोन पुस्तके लिहीलीत. या पुस्तकांमध्ये मराठ्यांची सरंजामी प्रवृत्ती गरीब झाल्यावरही कशी माजोरीची असते हे सिद्ध करणारी काही उदाहरणे दिलीत. मराठा जातीने सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीत घूसखोरी करून ती कशी ताब्यात घेतली व कॉंग्रेसी ब्राह्मणांकडे ती चळवळ गहाण टाकून महाराष्ट्राची सत्ता कशी प्राप्त केली, हेही संदर्भासह या पुस्तकात मांडले. मराठ्यांकडून ओबीसींना केव्हाही दगाबाजी होऊ शकते, असा स्पष्ट ईशारा या माझ्या पुस्तकांमध्ये देण्यात आला.
मराठा सेवा संघाच्या अनेक वक्यांनी, नेत्यांनी दलित-ओबीसींच्या स्टेजवर जाउन अनेक क्रांतीकारी ब्राह्मणविरोधी भाषणे केलीत व दलित-ओबीसींच्या टाळ्याही मिळवल्यात. परंतू मराठा सेवा संघाच्या स्टेजवर दलित-ओबीसी वक्त्यांना कधीच प्रवेश मिळाला नाही. याला एखादा अपवाद असू शकतो. मराठा सेवा संघांचं हे छुपे ब्राह्मणवादी रूप आमच्यापासून कधीच लपू शकले नाही. त्यामुळे ते माझ्या पुस्तकावर, माझ्या लेखांवर व माझ्या वक्तव्यांवर फार सावधपणे प्रतिक्रिया देत असत. आजही हा सिलसीला चालूच आहे.
ओबीसीत घुसखोरी करण्याचं मराठा सेवा संघाचं ब्राह्मणी षडयंत्र 2004 साली उघडपणे पुढे आले. हे षडयंत्र मराठा मुख्यमंत्री असतांना केलं जाऊ शकत नाही, हे ओळखून त्यांनी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर दबाव आणायला सुरूवात केली. मुख्यमंत्री शिंदेंकडून दादागिरीने जी.आर. काढून ‘कुणबी-मराठा’ व ‘मराठा-कुणबी’ या अस्तित्वात नसलेल्या जाती ओबीसींच्या यादीत घुसविण्यात आल्यात. अशाप्रकारे ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचे मराठा सेवा संघाचे षडयंत्र बामसेफी-दलित व दलित मुख्यमंत्र्यांच्या मदतीने यशस्वी झाले.
षडयंत्राचे हे दुसरे पर्व 2013 सालापर्यंत बिनदिक्कतपणे चालले. मात्र जात प्रमाणपत्रातील ‘मराठा’ शब्दामुळे अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना शूद्ध कुणबी प्रमाणपत्र हवे होते. कुणबी जात चोरूनच मराठ्यांना ओबीसीत घुसखोरी करणे शक्य होते. त्यासाठी त्यांना ‘ओबीसी-मराठा संघर्षाचे तिसरे पर्व’ सुरू होण्याची वाट पाहावी लागली. हे तिसरे पर्व सुरू होते 2013 सालापासून! याचा आढावा आपण लेखाच्या तिसर्या भागात घेऊ या!
तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
प्रा. श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270