ताज्या घडामोडी

गजानन महाराज, स्वामी समर्थांवर टीका करणारे ‘मानव’ कसे?

गजानन महाराज, स्वामी समर्थांवर टीका करणारे ‘मानव’ कसे?

Akluj Vaibhav News Network.

अकलूज दिनांक 27/07/2024 :

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा त्याग करून एक नवीनच मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम म्हणजे देवेंद्र फडणवीस या लोकनेत्याला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करणारे, त्याची निंदा-नालस्ती करणारे कारस्थान आहे. याच फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला बळ दिले, भरघोस निधी दिला, या कायद्याच्या समितीच्या सहअध्यक्षपदी श्याम मानवांची नियुक्ती केली. एवढेच नाही तर, फडणवीस उपमुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारने अलिकडे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना हेच श्याम मानव महाराष्ट्रातील पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे प्रशिक्षण देत फिरत होते. तेव्हा फडणवीस त्यांच्या लेखी खलनायक नव्हते. आता अचानक मानवांना झालेला हा साक्षात्कार ते कुणाचे तरी बाहुले आहेत, हे सिद्ध करणारे आहे.
लोकसभा निवडणुकीत याच श्याम मानवांनी कॉंग्रेसप्रणित महाविकास आघाडीचा प्रचार केला होता. आता ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ शेकडो जाहीर सभा घेणार आहेत म्हणे! मानव आता सामाजिक कार्यकर्ते राहिलेले नाहीत, ते महाविकास आघाडीचे प्रचार प्रवक्ते झालेले आहेत. त्यांना महायुतीचे सरकार सत्तेखाली खेचायचे आहे.
अचानक सामाजिक चळवळ सोडून मानवांनी महाविकास आघाडीचा प्रचार करण्याची जबाबदारी स्वत:हून स्वीकारलेली आहे. त्यामागे असंख्य कारणे असू शकतात. ते मानवांनाच ठाऊक! पण मानवांसारखे ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते एखाद्या पक्षाला निवडून आणण्याचा, दुसऱ्याला पराभूत करण्याचा विडा उचलतात तेव्हा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील भूमिकेची सार्वजनिक व्यासपीठावरच चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते.
श्याम मानव यांची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ एका मर्यादेपलिकडे यशस्वी होऊ शकली नाही. त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना नेहमी हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा दिसतात आणि त्यावर ते तुटून पडतात. इतर धर्मियातील अंधश्रद्धेबद्दल मानव कधीच काही बोललेले नाहीत. कारण त्याचे संभाव्य परिणाम त्यांना ठाऊक आहेत. हिंदूधर्मीय संयमी आहेत. आपल्यावरील टीकेला ते संयमाने उत्तर देतात. हे मानवांना ठाऊक आहे. हिंदू धर्मावर आणि या धर्मातील अंधश्रद्धेवर टीका करणे हेच पुरोगामित्व आहे, ही मानव यांची ठाम समजूत आहे. हेच पुरोगामित्व घेऊन ते आता कॉंग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पण, आपले पुरोगामित्व आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला पुढे नेताना मानव यांनी हिंदू धर्मातील काही श्रद्धास्थानांवर केलेल्या टीकेची येथे चर्चा करणे आवश्यक आहे. आणि त्या टीकेबद्दल महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांनी त्यांना जाब विचारणेही गरजेचे आहे.
श्याम मानव यांच्या दोन व्हिडीओची लिंक सोबत दिली आहे. या दोन्ही व्हिडीओमध्ये शेगावचे श्री संत गजानन महाराज आणि स्वामी समर्थ या दोन संतावर त्यांनी टीका केलेली आहे. ‘‘गजानन महाराज यांना बोलता येत नव्हते, त्यांना लोकांनी बाबा बनविले’’ तसेच ‘‘स्वामी समर्थ हे खोटारडे होते’’, अशी मुक्ताफळे मानव यांनी उधळली आहेत. मानव यांची ही वैयक्तिक मते असली तरी, श्रीसंत गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यावर त्यांनी केलेली ही टीका महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मान्य आहे का? उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे ज्येष्ठ नेते स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांच्या दर्शनाला जात असतात. ज्येष्ठ नेते शरद पवार नियमित संतनगरी शेगाव येथे येतात. काही वर्षांपूर्वी प्रस्तूत लेखकाने पुण्यातील एका वार्तालापात पवार साहेबांना या अनुषंगाने प्रश्न विचारला. ‘‘तुम्ही कुठल्याही मंदिरात जात नाहीत, आयुष्यात कधी कुणापुढे नतमस्तक व्हायची इच्छा झाली तर कुणापुढे व्हाल’’ यावर पवार साहेब तत्काळ म्हणाले, ‘‘मला शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या समोर नतमस्तक व्हायला आवडेल’’. अशाच आशयाचे विधान पवार साहेबांनी मुंबईतील एका दैनिकाच्या कार्यक्रमातही केले होते.
श्री संत गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि हिंदूच्या श्रद्धास्थानांवर टीका करणे हेच मानवांच्या आयुष्याचे इप्सित आहे. लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना त्यांनी त्यांच्या या भूमिकेबद्दल लोकांना सांगायला हवे. ते जर सांगत नसतील तर त्यांच्या सभेत येणाऱ्या सश्रद्ध माणसांनी त्यांना या अनुषंगाने काही प्रश्न विचारायलाच हवेत. मानव यांना प्रश्न विचारायला आवडते, किंबहुना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा तसा आग्रहही असतो.
मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला काही वर्षांपूर्वी तीव्र विरोध होऊ लागला तेव्हा मानवांनी ‘‘आमचा देवा-धर्माला विरोध नाही’’ असे जाहीर केले होते. मग गजानन महाराज, स्वामी समर्थ यांच्यावर ही टीका कशासाठी? मानवांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही. आणि ते तसे करत असतील तर, त्यांना विवेकी मार्गाने प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकशाहीने आपल्यालाही दिला आहे. मानवांची अंधश्रद्धा निर्मूलनाची भूमिका एका विखारी चौकटीतच बंदिस्त राहिलेली आहे. पालघरला साधूंचे हत्याकांड झाले तेव्हा मानव काहीच बोलले नाहीत. साधा निषेधही त्यांनी केला नाही. संभाजीनगरात जातीय दंगली उफाळून आल्या तेव्हाही मानव शांत होते. कोपर्डीतील आमच्या निष्पाप भगिणीवर अत्याचार झाला, त्यावेळीही मानव गप्प होते. केतकी चितळेंना तीन महिने तुरुंगात डांबण्यात आले, त्यावेळी तत्कालीन सरकारला प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांनी दाखविले नाही. खासदार संजय राऊत यांनी एका महिलेला फोनवर शिविगाळ केली त्याचाही मानवांनी कधी निषेध केला नाही. राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा प्रकरणात अटक करण्यात आली त्यावेळीही मानव कुठे दिसले नाहीत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून या घटनांनी मानव अस्वस्थ व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही, आता ते महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्यामुळे त्यांच्या आजपर्यंतच्या या घटनांवरील मौनाबाबत कुणी शंका घेत असेल, प्रश्न उपस्थित करीत असेल तर ते चुकीचे कसे म्हणता येईल?
श्याम मानव यांच्या सामाजिक, राजकीय भूमिकेबद्दल आम्हाला काहीच देणे-घेणे नाही, पण ते एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन श्री गजानन महाराज, स्वामी समर्थ या संतांवर टीका करीत असतील तर त्यांना पाठबळ देत असलेल्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना मानवांची ही गलिच्छ टीका मान्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर सामान्य माणसांना मिळायलाच हवे.

गजानन जानभोर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.